सोनगावचे लोक हळहळले. गावची शाळा बंद झाली. पुन्हा कोठला एखादा शिक्षक मिळेपर्यंत ती बंदच राहाणार. सोनगावची मुले शेजारच्या गावच्या शाळेत जाऊ लागली. असेल कोसा-दीड-कोसावर ते गाव. त्या लांबच्या शाळेत जरा मोठी झालेली मुलेच जात. लहान मुले जात नसत. त्यांना भय वाटे.

गोपाळच्या आईची स्थिती आता वाईट होती. तिचा पती होता तोपर्यंत गावकरी जे लागेल ते आणून देत; परंतु आता तिच्याकडे कोणी लक्ष देईना. ती कोणाकडे दळण-कांडण करी, कोणाकडे धुणी धुवी; असे करून स्वत:चे व स्वत:च्या मुलाचे पोट भरी. गोपाळकडे पाहून ती सारे दु:ख गिळी. ती त्याला जवळ घेऊन म्हणे, 'माझा गोपाळ मोठा होईल व आपल्या आईचे कष्ट दूर करील.' चिमणा गोपाळ हसे व आई त्याचा मुका घेई.

गोपाळ आता मोठा झाला. पाच वर्षे संपून सहावे वर्षे त्याला लागले. गोपाळला आता शाळेत घातले पाहिजे असे आईच्या मनात आले. येत्या दसर्‍याला मुलाला शाळेत घालण्याचे तिने ठरविले. दसरा आला. गोपाळची आई आदल्या दिवशी गोपाळला म्हणाली, 'गोपाळ, उद्या दसरा. विजयादशमीचा दिवस. उद्यापासून तू शाळेत जा. तुझ्यासाठी माझ्या हाताच्या सुताचं कापड केलं आहे. ते धोतर अंगावर घे. लाकडाची धूळपाटी घे, पाटीवर धूळ पसरून तीत बांबूच्या काडीनं अक्षरं काढ. एक काढून झालं की पुन्हा साफ करावं, नवीन अक्षर काढावं, अशा रीतीनं शीक. शाळा जरा लांब आहे; परंतु तेथील शिक्षक चांगले आहेत असं म्हणतात, ते तुला नीट शिकवतील. गोपाळ, शीक व मोठा हो. विद्या मिळव. तेच तुझं धन, तोच तुझा मान. जाशील ना शाळेत?'

गोपाळ म्हणाला, 'जाईन, बाबांसारखा मी शहाणा होईन.'

मुलाला पोटाशी धरून सीताबाई म्हणाल्या, 'शहाणा आहे माझा बाळ. गुणाचा माझा राजा.'

दुसर्‍या दिवशी सीताबाईंनी गोपाळला लवकर उठविले. त्याला त्यांनी आंघोळ घातली. गोपाळने नमस्कार घातले. त्याने गंध लावले. आईने विद्यादेवीची पूजा करावयास बरोबर फुले दिली, अक्षता दिल्या. निघाला गोपाळ बाळ. सीताबाई उंबर्‍यात उभ्या होत्या. गोपाळ गेला व त्यांना हुंदका आला. आज पती जिवंत असता तर गोपाळ घरीच शिकता, त्याला इतक्या लांब जावे लागले नसते इत्यादी विचार त्यांच्या मनात आले; परंतु पदराला डोळे पुसून त्या कामाला लागल्या. गरिबीला रडावयाला वेळ नसतो, हे एकपरी बरे.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel