'सखू कसं सारं छान करते. आम्हाला नाही जमत.' रुपी म्हणाली.
'आणि तरी ती शाळेत जात नाही.' माणकी म्हणाली.

त्या आमोदे गावात देणग्या देण्याची लाट उसळली होती. नास्तिक व शंकेखोरसुध्दा देणग्या देऊ लागले! मोठेमोठे शेठसावकार, तेही पुढे सरसावले. कोणी आपल्या नावाने धर्मशाळा बांधली; कोणी एक विहीर बांधून तिच्या कट्टयात स्वत:च्या नावाचा दगड बसविला; असे प्रकार चालले होते.

होता होता दिवाळी आली. उजाडत्या पहाटे मंगलस्नाने करायची. आज रात्री ती माळ येणार! गावात उत्सुकता उचंबळली होती. लहान­-थोरांच्या तोंडी एकच विषय. जिकडे जाल तिकडे एकच बोलणे कानांवर येई. माळ येणार, कोणाला मिळणार?

सायंकाळ होत आली. त्या तीन मुलींचे आईबाप छानदार गाडीत बसून बाहेर फिरायला गेले होते. घरी मुलीच होत्या. त्यांनी घरासमोर सुंदर सडा घातला. त्यावर सुरेख रांगोळी काढली. सखू त्यांना मदत करीत होती. मातीच्या पणत्या तयार करण्यात आल्या. सखूने त्यांच्यात वाती घातल्या, तेल घातले.

दिवे लागायची वेळ झाली. एकाएकी चमत्कार झाला. आकाशात काळेकाळे ढग जमा होऊ लागले. फारच भयंकर काळोखी आली. विजा चमकू लागल्या कडकडाट, गडगडाट होऊ लागला. लहान मुले भिऊ लागली. प्रचंड वारा सुटला. मोठे वादळ होणार, प्रचंड तुफान होणार!

पाऊस पडू लागला. जोराचा पाऊस, मुसळधार पाऊस, पावसाळयात असा पाऊस पडत नव्हता. जिकडे तिकडे पाणीच पाणी. खळखळ पाण्याचे प्रवाह वाहात होते. पाऊस  थांबेना, वारा थांबेना. कडाड्कडा! अरे बाप रे! केवढा आवाज! कोठे तरी खास वीज पडली असावी. त्या तिन्ही मुलींच्या पोटात धस्स झाले! त्यांचे आईबाप बाहेर गेलेले होते. वादळात आईबाप सापडले!

गावात जिकडे तिकडे अंधार. दिवाळीचा दिवस, परंतु एकही दिवा बाहेर दिसेना, कारण त्या वार्‍यात एकही दिवा टिकेना. पणत्या लावून बाहेर आणाव्या तो विझून जात! सुखाची माळ, ती स्वर्गातील माळ येण्याचे दूरच राहिले. प्रलयकाळची रात्र आली असे सर्वांस वाटले. वेत्रवती नदीचे पाणी वाढू लागले. घो घो आवाज ऐकू येऊ लागला. गाव वाहून जाणार की काय? इतका का पापी झाला गाव? देवाला का नकोसा झाला हा गाव? की स्वर्गातील माळ पाठविण्यापूर्वी देव तो गाव धुवून टाकीत होता? त्या गावातील सारी घाण दूर करीत होता?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to घामाची फुले