भगवान श्रीकृष्ण गोकुळात अवतरले होते. नंदराजाच्या घरी गाईंचे मोठे खिल्लार होते. स्वत: कृष्ण गाईंना रानात चरावयास घेऊन जाई. त्या गाईंमध्ये बहुला नावाची एक सुंदर गाय होती. तिचा रंग काळासावळा होता. ती पुष्कळ दूध देई, म्हणून तिला बहुला म्हणत. तिची कृष्णदेवावर फार भक्ती होती. एक क्षणभरसुध्दा कृष्णदेवाला ती विसबंत नसे नेहमी कृष्णाच्या जवळजवळ असावयाची, मधून मधून त्याच्याकडे बघावयाची. कृष्णाची मुरली वाजू लागली, तर खाणेपिणे सारे ती विसरत असे व तिच्या डोळयांतून आनंदाश्रू घळघळ गळत.
एके दिवशी हया बहुला गाईचे सत्त्व बघावे अशी कृष्णदेवास इच्छा झाली. भक्तांचा अंकित होण्यापूर्वी परमेश्वर त्यांची परीक्षा घेत असतो. गाई घेऊन रोजच्याप्रमाणे श्रीकृष्ण परमात्मा वनात गेला. यमुनेच्या तीरावर गाई चरू लागल्या. गोपाळ खेळू लागले. त्या दिवशी बहुलेला श्रीकृष्णाने भूल पाडली. बहुला हिरवे हिरवे गवत पाहून चरत चरत लांबवर गेली. कृष्णापासून कधी दूर न जाणारी बहुला कृष्णाला सोडून दूर गेली. तिला स्थळाचे व वेळेचे भान राहिले नाही.
सायंकाळ होत आली. सूर्य मावळण्याची वेळी झाली. कृष्णदेवाने घरी परत जाण्याची खूण म्हणून मुरली वाजवली. सार्या गाई गोळा झाल्या. गुराखी कृष्णासह गाई घेऊन घरी निघाले. गोठयातून वासरे हंबरत होती. हंबरून गाई उत्तर पाठवीत होत्या. गाई गोठयात घुसल्या. वासरे कासेला लागली व ढुशा देऊन देऊन भरपूर दूध पिऊ लागली.
परंतु बहुला कोठे आहे? बहुलेचा बाळ घरी होता. तिच्या वासराचे नाव डुबा होते.
गोजिरवाणा। बहुलेचा बालक तान्हा॥
काळे त्याचे आंग सुंदर
कपाळावरी चांद मनोहर
जसा चन्द्रमा निळया नभावर
तैसा जाणा। बहुलेचा बालक तान्हा॥
खुंट रूप्याचा बांधायला
सोन-सांखळी घालायाला
डुबा आवडे अति सकळांला
मोहन साना॥ बहुलेचा बालक तान्हा॥