त्या दिवसापासून मोहन घरामध्ये फारच थोडा वेळ थांबे. जणू घर सोडून जाण्याचा तो अभ्यास करीत होता. तो कोणाजवळ बोलेना, हसेना, खेळेना. तो खिन्न व उदास दिसे. जाई त्याच्याजवळ जाई व गोड बोलण्याचा प्रयत्न करी; परंतु जाई जवळ येताच मोहन उठून जाई. जाईच्या डोळयांत पाणी येई. तिच्या जिवाची तगमग होई.
महिना संपला. पित्याने दिलेली मुदत संपली. एका सदर्यानिशी मोहन घरातून बाहेर पडला. सुखात वाढलेला मोहन! तो आता कोठे जाणार, काय खाणार, काय पिणार? तो एक लहानशा झोपडीत राहू लागला. तो मोलमजुरी करू लागला. तो उन्हातान्हातून श्रमे, खपे. कधी गवंडयाच्या हाताखाली काम करी, कधी शेतातील कुंदा खणायला जाई. त्याच्या कोमल हातांना फोड येत, परंतु हळुहळु सवय झाली. हातांना घट्टे पडले, उन्हातान्हात काम करून त्याचा चेहराही जरा राकट बनला.
मोहनने आता लग्न लावले. एका गरीब मजुराच्या मुलीशी त्याने लग्न लावले. तिचे नाव गजरी. मोहन व गजरी गरिबीत स्वर्ग निर्माण करीत होती. गजरीसुध्दा कामाला जाई. दोघे कष्टाने मिळवीत. परस्परांस प्रेम देत. मोहन गजरीला पाणी आणून देई. तिलाही घरी वेळ असला तर मदत करी. एखादे वेळेस दोघे पहाटे दळीत. मोहन म्हणे, 'ओव्या म्हण.' गजरी गोड ओव्या म्हणे.
मोहनने लग्न लावले ही गोष्ट रामजीच्या कानावर गेली. तो म्हातारा खवळला. त्याच्या तळपायांची आग मस्तकाला गेली. त्याने जाईला हाक मारून सांगितले, 'पोरी, त्या कारटयाकडे खबरदार कधी गेलीस तर. त्याच्याकडे कधी गेलीस असं जर मला कळलं, तर तुलाही हे घर सोडावं लागेल. विचार करून वाग. समजलीस?'
मोहनकडे जावे असे जाईच्या मनात कितीदा तरी येई, परंतु ती जावयास धजत नसे. मोहनही आपल्याजवळ धड बोलेल की नाही असे तिच्या मनात येई. ती मनातील दु:ख कोणाजवळ बोलणार? रामजी व मोहन दोघांकडे तिचा जीव ओढे. आपण गेलो तर वृध्द रामजीस तरी कोण?
जाईचा विवाह लांबणीवर पडला. तिचे लग्न करावे असे जणू रामजीच्या मनात येईना. जाई सासरी गेल्यावर मला म्हातार्याला कोण, असा स्वार्थी विचार त्याच्या मनात येई. शिवाय जाई मोहनशी जोडलेली आहे, असे स्वप्न आज दहा-बारा वर्षे तो मनात खेळवीत होता. ते स्वप्न आपल्या हातांनी त्याला मोडवेना. जाईचा विवाह दुसर्या कोणाशी करण्याचा विचारही त्याला सहन होत नसे. आणि जाई? तिच्या मनातही विवाहाचा विचार येत नसे. तिला रामजीची कीव येई. त्याची ती सेवा-चाकरी कृतज्ञतेने करी.