चैतन्य म्हणून बंगाल प्रांतात एक फार थोर भक्त होऊन गेले. बंगाल प्रांतात वैष्णव धर्म त्यांनीच वाढीस लावला. त्यांनीच भक्तीभावाची गोडी लोकांस लावली; परंतु भक्त होण्यापूर्वी चैतन्य हे एक मोठे पंडित म्हणून प्रसिध्द होते. न्यायशास्त्रात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता.

एके दिवशी चैतन्य एका नदीतीरावर नावेत बसण्यासाठी आले होते. त्यांच्याबरोबर फारसे सामान नव्हते. एका पिशवीत ते मावले होते. नदीतीरावर जाणारांची खूप गर्दी होती. नाव लवकर सुटणार होती. लोकांची धावपळ सुरू होती. चैतन्यही नावेत जाऊन बसले. नाव सुटली. नदीच्या भव्य व विशाल प्रवाहावर नाव झरझर चालू लागली.

स्वच्छ सूर्यप्रकाश पडला होता. नदीतीरावरची प्रचंड झाडे दुरून सुंदर दिसत होती. वार्‍यावर माना डोलावून, माना वाकवून, नदीला जणू वंदन करीत होती. मध्येच विजेप्रमाणे तळपणारे मासे पाण्यात दिसत. काही-काही मासे चांगलेच मोठे होते. हळूच पाण्यातून डोके वर काढून बाहेरच्या सृष्टीचे ते दर्शन घेत. पाण्यातून वर येऊन बाहेरच्या जगाला जणू ते रामराम करीत. सूर्यकिरण त्यांच्या डोक्यावर पडून ते चमकत. त्या माशांना पाहून कोणी म्हणे, 'हयांच्यावर चांगली मेजवानी होईल--' दुसरा कोणी म्हणे, 'परंतु येथे मिटक्या मारण्यापलीकडे काय करता येणार?' तिसरीकडे कोणी म्हणाला, 'तुम्हाला खाण्याशिवाय दुसरं दिसतं आहे काय? खाणं-पिणं एवढंच का माणसाचं काम?'

अशा प्रकारची बोलणी चालली होती. सूर्याचे ऊन नावेत लागत होते. तरी गार वारा वाहात असल्यामुळे उन्हाचा एवढा त्रास होत नव्हता. चैतन्य नदीच्या तरंगांकडे पाहात होते. त्यांच्या हृदयसागरावर सुद्धा  तरंग उठत होते. इतक्यात एकाएकी कोणी तरी त्यांच्याजवळ आले. कोणी तरी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. चैतन्य आपल्या समाधीतून जागे झाले. त्यांनी वर पाहिले, तो त्यांच्या दृष्टीस कोण बरे पडले? त्यांचा बालपणाचा मित्र त्यांच्याजवळ येऊन उभा होता.

'गदाधर, किती वर्षांनी आपण भेटत आहोत? गुरूच्या घरून विद्या शिकून आपण गेलो, त्यानंतर आजच आपली गाठ पडली. ये, बैस. तुला पाहून मला किती आनंद होत आहे.' असे बोलून चैतन्यांनी गदाधरला आपल्याजवळ बसविले. ते दोघे तेजस्वी दिसत होते. विद्येचे तेज त्यांच्या तोंडांवर चमकत होते. पावित्र्याची व चारित्र्याची प्रभाही त्यांच्या मुखांभोवती पसरलेली होती. रविचंद्राप्रमाणे ते शोभत होते. गंगायमुनांच्या प्रवाहांप्रमाणे ते शोभत होते. चैतन्यांची अंगकांती दुधाच्या फेसाप्रमाणे पांढरी स्वच्छ होती. गदाधर काळे – सावळे होते. दोघांनी एकमेकांचे हात प्रेमाने धरले. थोडा वेळ कोणीच काही बोलले नाही. भावनांचा पूर ओसरला व संभाषणाला अवसर मिळाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel