गोपाळ आईला म्हणाला, 'आई! शाळेत पंतोजींनी काही तरी घेऊन येण्यास सांगितलं आहे. त्यांच्या घरी मुंज आहे. दे काही तरी.' आई म्हणाली, 'बाळ! आपल्या घरात काय आहे द्यायला? आपण गरीब आहोत.' 'काही तरी दे. इतर मुलं नाही तर मला हसतील' गोपाळ रडवेला होऊन म्हणाला. सीताबाई म्हणाल्या, 'गोपाळ! दादाजवळ माग, तो देईल. जा.' खरंच. त्याच्याजवळ मागतो. तो काही तरी जम्मत देईल,' असे म्हणत गोपाळ निघाला.

गोपाळ दादाला म्हणाला, 'दादा, पंतोजींनी काही मदत घेऊन येण्याबद्दल सांगितलं आहे. काही तरी दे.' दादा म्हणाला, 'मी रे काय देऊ? मी गाईंचा गोवारी, म्हशींचा खिल्लारी. माझ्याजवळ रे काय आहे?' गोपाळ म्हणाला, 'हे रे काय असं? आई म्हणते, माझ्याजवळ नाही, तू म्हणतोस माझ्याजवळ नाही. मग मी मागू तरी कोणाजवळ? बाबा असते तर देते. दे? नाहीतर मी रडेन बघ.' दादा म्हणाला, 'रडू नको गडया. माझ्याजवळ दहयाचं एक गाडगं आहे ते देऊ? दहयाचं गाडगं नेशील?' गोपाळ म्हणाला, 'हो. काहीही चालेल. दे गाडगं.'

दादाने शिंकाळी बांधलेले, दहयाने भरलेले गाडगे गोपाळच्या हाती दिले. गोपाळ शाळेत गेला. तेथे मुलांची गर्दी होती. मळेवाल्याच्या मुलाने केळीचे लोंगर आणले होते. सावकाराच्या मुलाने पंचवीस रूपये आणले होते. मिठाईवाल्याच्या मुलाने पेढे आणले होते. कापडाच्या दुकानदाराने आपल्या मुलाबरोबर दोन ठाणे पाठविली होती. पंतोजी सारे घेत होते. गोपाळकडे कोणाचेच लक्ष जाईना. हातात गाडगे धरून तो कधीचा उभा होता. शेवटी तो मुसमुसू लागला.

पंतोजींचे लक्ष गेले. 'अरे, काय रे गोपाळ! काय झालं?' त्यांनी विचारले. गोपाळ स्फुंदत म्हणाला, 'माझं गाडगं कोणी नाही घेत.' पंतोजींनी विचारले 'काय आहे गाडग्यात?' 'दही' गोपाळ म्हणाला. पंतोजी म्हणाले, 'आण इकडे, ओतून घेतो.

एका पातेल्यात त्यांनी गाडगे ओतले; परंतु पुन्हा ते गाडगे भरलेले. पुन्हा त्यांनी ओतले. तर गाडगे पुन्हा भरलेले! घरातील सारी भांडी भरली तरी गाडगे रिते होईना. सार्‍या गावकर्‍यांनी दही भुरकले. देवाघरचे दही. अमृतासारखे ते गोड होते. किती खाल्ले तरी वीट येईना. पोट भरेना. हवे-हवेसेच वाटे. सारे लोक आश्चर्यचकित झाले.

पंतोजींनी गोपाळला विचारले, 'गोपाळ! कोणी दिलं बाळ हे गाडगं?' गोपाळ म्हणाला, 'माझ्या दादानं'. पंतोजींनी पुन्हा विचारले, 'मला दाखवशील तुझा दादा?' गोपाळ आनंदाने म्हणाला, 'हो. माझ्याबरोबर या, म्हणजे दाखवीन. किती छान आहे माझा दादा. डोक्यावर मोराची पिसं, तोंडात पावा, खांद्यावर घोंगडी. गोड बोलतो. गोड वाजवतो. दाखवीन तुम्हाला. तुम्हालसुध्दा आवडेल.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel