असे रामजी म्हणत होता. मुलाला त्याने गोडशी वडी दिली होती. बाळ वडी चघळीत होता. रामजीच्या गुंडयांजवळ खेळत होता. गजरी व जाई दारात उभ्या होत्या. दार लोटण्याचे धैर्य कोणासच होईना. शेवटी जाई पुढे झाली. गजरीने दार लोटले. दोघी न विचारता आत शिरल्या. म्हातारा चकितच झाला.

गजरीने बोलायला आरंभ केला. ती म्हणाली, - 'मामंजी! माझा मुलगा परत न्यावयास मी आल्ये आहे. तो तुमच्याकडे नको. तो तुमच्याजवळ तुमच्यासारखा कठोर होईल, दुष्ट होईल. आई-बापाची आठवण तो विसरेल. आई-बापाविरूध्द वाटेल ते त्याच्या मनात तुम्ही भरवाल. तो स्वत:च्या आई-बापाचा अपमान करावयास लागेल. छे. नकोच ते. द्या माझा बाळ. तो गरिबीत राहून मेला तरी चालेल; परंतु श्रीमंतीत वाढून फत्तर व्हावयास नको. त्याचं मन गरिबीत कोवळं राहील, प्रेमळ राहील. तो पित्याच्या स्मृती पुण्य मानील. आईला प्रेम देईल. माझा बाळ दीन-दरिद्री झाला तरी चालेल, परंतु मनानं तो श्रीमंत होऊ दे. द्या, खरचं द्या. त्याला नेण्यासाठी मी आले आहे.'

गजरीचा एकेक शब्द सुरीप्रमाणे म्हातार्‍याचे काळीज चिरून जात होता. तो पहाड पाझरला. तो पाषाण विरघळला. म्हातारा एकदम उठला. जाईला व गजरीला त्याने पोटाशी धरले व रडत म्हणाला, 'पोरींनो! नका माझा अंत पाहू. नका मला छळू. माझं हृदय किती जळतं आहे, तुम्हाला कसं दाखवू? परंतु खोटया अभिमानाला मी बळी पडलो. माझ्या अहंकारानं, हट्टानं मी माझा गुणी मुलगा गमावून बसलो. पुत्रघातकी आहे मी. तुम्ही माझ्यापासून दूर राहू नका. ह्या घरात राहा. ह्या बाळाला तुम्हीच वाढवा. इथं नांदा. मोहनच्या मरणानं आपण सारी जोडली गेलो. मोहन मेला व माझा अहंकारही मेला. प्राणांचं मोल देऊन माझ्या मुलानं मला पवित्र केलं आहे. प्रेमळ, कोमल निर्मळ केलं आहे. मुलींनो! रडू नका. झालं गेलं विसरा व म्हातार्‍याला क्षमा करा. मी अपराधी आहे.' असे म्हणून तो पहाड खरोखर त्या मुलींचे पाय धरण्यासाठी वाकला.

'हे काय भलतंच - आम्हीच तुमच्या पायांवर डोकं ठेवायचं. तुम्ही प्रेमाचे मंगल आशीवार्द द्या म्हणजे झालं.' असे म्हणून गजरीने म्हातार्‍याच्या पायांवर डोके ठेवले. तिने बाळ आजोबांच्या पायांवर घातला.

ती सारी आनंदाने एकत्र राहू लागली. जाईने लग्न केले नाही. म्हातारा त्या बाबतीत कधी काही बोलला नाही. गजरी त्या बाबतीत बोलली नाही. तो फार गंभीर, नाजूक, पवित्र प्रश्न होता. त्या बाबतीत बोलणे म्हणजे अपवित्रपणा होता.

एखादे वेळेस मोहनची सर्वांस आठवण येते व सर्वांना रडू येते; परंतु हसरा व खेळकर बाळ त्यांचे अश्रू ताबडतोब दूर करतो. मोठा जादूगार आहे तो.

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel