एका गावात एक विधवा बाई राहात होती. ती गरीब होती. तिला तीन मुलगे होते. ते तीन मुलगे हीच तिची काय ती इस्टेट, तोच तिचा आधार. आपली मुले मोठी होतील व आपले पांग फेडतील असे त्या कष्टाळू माउलीस वाटत असे. आशेने व श्रध्देने ती त्यांना वाढवीत होती, लहानांचे मोठे करीत होती. ती चार लोकांकडे चार धंदे करी व सर्वांचा सांभाळ करी. त्या मुलांची नावे गोपाळ, वामन व हरी अशी होती. गोपाळ हा सर्वांत मोठा. गोपाळ हा खेळात किंवा अभ्यासात, कशातच प्रवीण नव्हता; परंतु त्याचे हृदय थोर होते. जे हृदयाचे थोर असतात त्याना देव बुध्दी कमी का देतो? थोर हृदय व मोठे डोके क्वचितच एकत्र आढळतात. गोपाळचे भाऊ वामन व हरी हे मात्र फार हुषार होते. त्यांचे नंबर नेहमी वरती असावयाचे. गुरूजी त्यांना शाबासकी द्यावयाचे, वाहवा करायचे.

गोपाळला शाळेत गुरूजी नावे ठेवीत. मुलांना नावे ठेवू नये; हे शिक्षण-शास्त्रातले पहिले सूत्र, परंतु ते फार थोडया शिक्षकांस माहीत असते. शाळेतील इतर मुलेही गोपाळला चिडवीत, त्याची टर उडवीत. इतर मुले पाठीस लागतील एक, परंतु प्रत्यक्ष पाठचे भाऊ, ते सुध्दा गोपाळला घालूनपाडून बोलत व त्याच्या हृदयाला घरे पाडीत. एके दिवशी वर्गात गुरूजी गोपाळला म्हणाले, 'गोप्या, अरे, शाळेत कशाला येतोस, बैलोबा? तू शुध्द अडाणीच आहेस, नुसता दगड आहेस, दगड. अरे दगडाचा तरी उपयोग होतो. पायखान्याला तरी लावता येतो. तुझा काडीचा उपयोग नाही. उगीच आईला त्रास देतोस झालं. कुणाची धुणी धू, आचारी हो. हे शिकण्याचं तुझ्यानं काही होणार नाही.’

गुरूजींनी गोपाळाजवळ बुध्दी नाही हे पाहिले. परंतु त्याच्याजवळ हृदय होते हे त्यांनी पाहिले होते का? बुध्दीइतकेच किंबहुना अधिक हृदयाला महत्त्व आहे हे गुरूजी विसरून गेले होते. गोपाळाचा दिलदार स्वभाव, सर्वांना मदत करण्याची त्याची वृत्ती हे गुण का मोलाचे नव्हते?

गोपाळाला वाईट वाटले. आपण जीव द्यावा असे त्याला वाटले; परंतु जीव दिल्यावर आईला कोण? तिचे पाय कोण चेपील? तिला कामात कोण मदत करील? तिचे अंथरूण कोण घालील? हे त्याच्या मनात आले व त्याचा विचार बदलला. घरी येऊन गोपाळ आईला म्हणाला, 'आई, मी गुरूजींना आवडत नाही, भावांना आवडत नाही, माझा जगात काय उपयोग? भूगोल माझ्या ध्यानात राहात नाही, गणित मला समजत नाही. देवानं मला का ग बुध्दी दिली नाही? बुध्दी ही सर्वांत मोठी देणगी. तीच माझ्यापासून त्यांन का लपवून ठेवली?' आई म्हणाली, 'बाळ, असं मनाला लावून घेऊ नकोस. नाही आलं गणित तर नाही; परंतु चांगलं काय व वाईट काय हे समजण्याची बुध्दी देवानं तुला दिली आहे. विवेकबुध्दी तुला दिली आहे. तुझं मनही किती थोर आहे! गोपाळ, तू गुणांचा राजा आहेस. तू कोणाला आवडत नसलास तरी मला आवडतोस व देवालाही आवडशील. उगी, रडू नकोस.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel