म्हातार्‍याच्या बोलण्यातील दु:ख व निराशा जाई समजू शकत होती. ती म्हणाली, 'बाबा! तुमचं घर मला बंद झालं हे खरं; परंतु  ह्या बाळाला ते का बंद व्हावं? हया लहानग्याचा काय अपराध? या मोहनच्या मुलाला तुम्ही नाही का जवळ घेणार, नाही का नीट वागवणार? या बाळाची आबाळ का व्हावी? याला घ्या, तुमच्या घरी न्या. त्याला गरम कपडे करा, त्याला गाईचं दूध पाजा. या बाळाची उपासमार न होवो म्हणजे झालं. हा तुमचाच आहे. तुम्हीच लावलेल्या, वाढवलेल्या झाडाचं हे फळ आहे.'

रामजी ऐकत होता. त्या मुलाकडे तो पाहात होता. त्याने जरासे तोंड का तिकडे फिरविले? कापणारे कापीत आहेत की नाहीत हे का तो बघत होता? त्याने डोळयांवरून हात का फिरविला? घाम का त्याने पुसला? पुन्हा जाईकडे तो वळला. तो बोलेना. त्याच्याने बोलवत का नव्हते? का बोलण्याची त्याची इच्छा नव्हती?

'बाबा! घेता ना या बाळाला! घ्या, घ्या, घ्या-' जाई दगडालाही पाझर फुटेल अशा स्वरात म्हणाली.
रामजीचे ओठ हालले. म्हातारा बोलू लागला; परंतु त्याच्याने फार बोलवले नाही. 'दे!' एवढेच तो बोलला. त्याने आपले हात पुढे केले. जाईच्या तोंडावर कृतज्ञतेची कोवळीक होती. तिने बाळ बाबांच्या हातात दिला; परंतु बाळ म्हातार्‍याजवळ जाईना. तो जाईचा पदर सोडीना. बाळ रडू लागला. त्याच्या डोक्यावरचे हार खाली पडले; परंतु शेवटी जाईने बाळाच्या त्या चिमुकल्या घट्ट मुठी सोडविल्या व ती दूर झाली. रडणार्‍या मुलाला 'उगी उगी - तो बघ काऊ, ती बघ चिऊ, उगी हां- ही बघ फुलं - रडू नको असा!' अशा शब्दांनी उगी करीत रामजी निघून गेला.

देव मावळला. सांजावले. कामकरी निघून गेले. विळे थांबले. अंधकार पडू लागला. त्या बांधावर जाई तेथेच बसली होती. बाळाच्या डोक्यावरती पडलेली फुले तिच्या हातात होती. ती रडत होती. स्वत:चे सारे जीवन तिला आठवले. रामजीने तिचे किती लाड केले, कसे कौतुक केले, ते सारे डोळयांसमोर उभे राहिले. मोहनची मोहक व उंच मूर्ती डोळयांसमोर आली. त्याचे हाल, त्याचे मरण. सारे प्रसंग समोर उभे होते. 'मी दुदैवी आहे. खरंच दुदैवी. अशा दुदैवी माणसांना जन्माला घालण्यात प्रभूचा काय बरं हेतू असावा? परंतु आज बाबांनी बाळ नेला, एवढं तरी सुदैव माझं होतं, एवढं तरी पदरी सुकृत होतं म्हणायचं.' असे म्हणत ती उठली व आपल्या झोपडीकडे निघाली. गजरी कामावरून आली होती. पाण्याची घागर तिने भरून आणली व चूल पेटवून ती भाकर भाजीत होती. तो जाई आली. जाईला पाहून गजरी म्हणाली, 'बाळ नाही तो?'

'वैनी! बबांनी नेला हो बाळ. बरं झालं. बाळ सुखात राहील. त्याला थंडी बाधणार नाही, उपास पडणार नाहीत. आपण दोघी कशीही राहू!'


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel