लिली सासरी गेली. तो गाव सोडून, माहेर सोडून गेली. त्या दिवसापासून मन्याने बासरी वाजवली नाही. गुराखी त्याला विचारीत, 'मन्यादादा, बासरी वाजव ना.' मन्याचे रडवेले डोळे उत्तर देत. गुराखी खिन्न होऊन जात. मन्या हसेना, बोलेना, खेळेना; वाजवीना. तो जिवंत असून मेल्यासारखा झाला होता!

लिलीची तीच स्थिती होती. सासरचे सारे काम तिला करावे लागे. मोठया पहाटे ती उठे. पोतेरे घाली, चुली सारवी, अंगण झाडून सडा घाली, खटाळभर भांडी घाशी, पाणी भरी, धुण्याची मोट घेऊन तळयावर जाई. ती तळयावर जरा उशीरा जाई, त्या वेळेस तेथे कोणी नसे. ती तेथे बसून रडे. हृदयातील पाणी डोळयांवाटे तळयात पडे. दु:खी लोकांच्या अश्रूंचे तर ते तळे बनले नसेल ना? धुणी धुवून ती घरी येई. मग गोळाभर घास खाई, पुन्हा भांडी घाशी, धुणी वाळत घाली. दुपारी दळण, निवडणे वगैंरे असे. आज भाजणी, उद्या मेतकूट, परवा पापड, तेरवा मिरच्या कुटणे, कधी मसाला, कधी काही हे असेच.

लिलीचे फुलासारखे तोंड कोमेजून गेले. ती नीट खाईना, पिईना. नेहमी तिचे पोट भरलेले. त्या दिवसापासून आपण मन्याला भेटलो नाही याची रुखरुख तिला लागली होती. मन्याला कोण आहे? सार्‍या जगात त्याला कोणी नाही. ती नदी त्याची आई, गाईगुरे व पक्षी त्याची भांवडे, गुराखी त्याचे मित्र. त्रासलेल्या मन्याचे शब्द मी मनावर का घ्यावे? मी पुन्हा त्याच्याकडे का गेले नाही? सारे अभिमान खर्‍या प्रेमापुढे फिके पडतात. प्रेमाला 'अहं' ची बाधा कधी होत नाही. खरे प्रेम निरहंकारी असते. माझे प्रेम खरे प्रेम नव्हते म्हणून मी मनात अढी धरली. असे मनात येऊन लिली रडे.

शेवटी लिली आजारी पडली. ती अंथरूणाला खिळली. सासूसासर्‍यांनी तिला माहेरी पाठविली. आजारीपणात तिची सेवा कोण करणार? ती आता उपयोगी थोडीच पडणार होती! निरूपयोगी वस्तू माहेरी रवाना झाली.

लिलीची दैना पाहून तिच्या आईच्या ह्दयाचे पाणी झाले. लिलीचे लक्षण बरे दिसेना. एके दिवशी लिली म्हणाली, 'आई! मन्यादादाला बोलाव ग. त्याला डोळे भरून पाहीन. त्याचा हात हातात घेऊन त्याच्यावर दोन टिपे गाळीन. जणू माझ्या अश्रूंचे अर्घ्य त्याच्या हातावर सोडीन. आई बोलावशील का? नको मला हे दूध, नको हे पाणी. मला मन्याची तहान आहे ग, माझ्या मन्याची.' परंतु मन्याला कोणी बोलविले नाही, कारण मन्याच्या बापाची निक्षून सांगी होती की मन्याशी संबंध ठेवू नका. लिलीच्या बापाला लिलीच्या प्राणापेक्षा, तिच्या शेवटच्या इच्छेपेक्षा, सावकाराचे ऋण महत्त्वाचे वाटत होते; सावकाराची इच्छा महत्त्वाची वाटत होती.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel