चैतन्य: गदाधर, झालं ते ठीक झालं. तुझाच ग्रंथ जगात जगू दे. त्यातच मला आनंद आहे. ग्रंथ लिहीत असताना कितीदा तरी मनात येई, की मी हे काय करीत आहे, कशाला ग्रंथ लिहीत आहे? हृदयात कोणीतरी असं बोले;  परंतु तो गोड मंजुळ आवाज,  हृयातील खोल ईश्वरी वाणी, तिचा मी अव्हेर करीत असे. मला आसक्ती जिंकलीच पाहिजे. गदाधर, तुझ्यावर उपकार म्हणून नव्हे, तर माझा मोह जिंकण्यासाठी अशा शेकडो ग्रंथांचं मोल द्यावं लागलं तरी ते थोडंच होणार आहे! गदा, गडया, असा खिन्न होऊ नकोस. तुझ्या ग्रंथात मी आहेच. एका गुरूचेच आपण शिष्य ना? राहू दे, तुझाच ग्रंथ राहू दे. तुझ्या ग्रंथाचं अध्ययन केल्याशिवाय न्यायशास्त्र पुरं अभ्यासिलं असं म्हणण्यास कोणी धजणार नाही. तुझ्या ग्रंथाची पूजा होईल, पंडित त्याला डोक्यावर घेतील. हस, गदा, हस, तो पाहा सूर्यसुध्दा पुन्हा हसू-खेळू लागला. त्याच्यावरचे ढग गेले. माझ्या गदाच्याही तोंडावरचे दु:ख निराशेचे ढग वितळू देत. गदा पुन्हा हसू दे, खेळू दे. होय. ते पाहा तुला हसू येत आहे. तू ते दाबू नकोस. हास्याला कधी दाबू नये. जगात सार्‍यांच्या तोंडावर हसं खेळावं असं मला कधी कधी वाटत असत. कृपाळू परमेश्वराच्या हया जगात कोणीही दु:खी - कष्टी असू नये असं मला वाटत असतं, हस. गदाधर, हस. तुझ्या तोंडावर हसू यावं व डोळयातील आसू जावं म्हणून मी काय करणार नाही? हा ग्रंथच काय, पण माझे प्राणही फेकून देईन. पुढं मी सार्‍या जगाला सुखविण्यासाठी झटणार आहे. परंतु आज मित्राला तरी हसवू दे. तुझ्यापासूनच आरंभ करू दे. त्यागाचा व प्रेमाचा पहिला धडा आज मला शिकू दे. पहिलं पाऊलच कठीण असतं. गदा-!

असे म्हणून चैतन्यांनी प्रेमभराने गदाधरास मिठी मारली. गदाधराचे हृदय गहिवरून आले. डोळयांत आनंदाश्रू आले. दोघांच्या तोंडावर अपूर्व तेज चमकत होते. हातात हात घेऊन दोघे प्रवाहाकडे पाहत होते. 'तीर आलं, किनारा आला,' नावाडी ओरडू लागले. लोक सामान-सुमान बांधू लागले. लहान मुले उठून किनारा पाहू लागली. 'खाली बसा, पडाल!' असे म्हणून आई-बाप त्यांना दबकावीत होते. नावेवरचे शीड गुंडाळण्यात आले.

चैतन्य: गदाधर, हया जगाच्या मुशाफरीत आपण पुन्हा कधी भेटू?

गदाधर: चैतन्या, आता आपण भेटलो नाही तरी एकमेकांस थोडेच विसरणार आहोत? तुझी मला प्रत्यही आठवण येत जाईल व ती आठवण सांगताना माझे डोळे भरून येतील. प्रेमपूर्वक त्यागानं, प्रेमानं तू मला कायमचं बांधून टाकलं आहेस. त्यागपूर्वक मी जगाला न्यायशास्त्र शिकविणार; परंतु चैतन्या, तू निरपेक्ष प्रेमाचं शास्त्र शिकविणार! न्यायशास्त्र, ते नीरस घटपटाचं शास्त्र शिकविण्यासाठी तुझा अवतार नाही; परम मंगल प्रेम शिकविण्यासाठी तुझा अवतार आहे!

चैतन्य: प्रेम, प्रेम, प्रेम! होय, हया जगाला, हया दु:खी कष्टी जगाला प्रेमाची आवश्यकता आहे. प्रेम भरू दे; माझ्या हृदयात प्रेमाचा सागर भरू दे व तो जगाला देऊ दे. सुष्ट वा दुष्ट, सार्‍यांना प्रेमाचा मेवा मला नेऊन देऊ दे. होय गदाधर, हेच माझं काम, हेच माझं जीवितकार्य. सापडलं, माझं जीवितकार्य मला सापडलं.

गदाधर: जीविताचं कार्य मिळालं तो धन्य आहे, कृतकृत्य आहे तो.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel