"कसा येत आहे घों आवाज, आंतबाहेर एक आवाज ! अंतर्बाह्य एकच आवाज ! हीच का समाधि ? हाच का अनाहत ध्वनि ? हा कोणता ध्वनि ? विलक्षण ध्वनि ! घों घों !' असें म्हणत ती तेथें नाचत होती.
"वत्सले, अग ये लौकर, पोरी ! पाणी आलें वरून, ये. अशी नाचतेस काय ? मला येववत नाही तुला ओढायला. मी येईन तों पाणी येईल. ये, ये, वत्सले ये.' सुश्रुता आजी ओरडत होती, हांक तारीत होती.
तेथें कार्तिक आला, तो कावराबावरा दिसत होता. 'कार्तिक, आण पोरीला ओढून ! जा, बघतोस काय, तें बघ पाणी आलें ! धांव.' सुश्रुता म्हणाली.
"ये कार्तिक ये; माझ्याने येववत नाहीं; येथें जोराची धार आहे. माझे पाय पांगुळले आहेत. ये, धर माझे हात; ये.' वत्सलेनें हांक मारली.
"कार्तिक, नको जाऊं, आलें बघ पाणी, फीर मागें - तूंहिं मरशील, तूंहि बुडशील.' कोणी तरी म्हणाले.
"ये, कार्तिक ये, हातांत हात घालूं. नदी उचंबळून येत आहे. तूहि उचंबळून ये. माझ्या हृदयांत घों होत आहे. तुझ्या नाहीं का होत ?' वत्सला म्हणत होती.
आलें पाणी अपार लाल लाल पाणी कार्तिक मागें आला पटकन् आणि वत्सला ? कोठें आहे वत्सला ?
"अरे वत्सला माझी, अरे, वांचना कोणी वेडया पोरीला; अरे, टाका रे कोणी उडी ! नाहीं का कोणी येथें ? कार्तिक, कां नाहीं गेलास जरा पुढें ? तूं आणतोस तिला ओढून ? ती तुला बोलवीत होती. तूं बळकट हातानें आणतोस तिला धरून ? बोलव कोणाला, कर पुकारा, मार हांक; ती बघ, ती बघ, ती चालली ! अरेरे, एकुलती माझी नात, वाचवा रे ! हाय रे देवा ! अरे, नाही का रे कोणी ? सारे का भ्याड ? सारे का कापुरुष झाले ? नाही का कोणी तरुण ? अरेरे, ती बघा, तो तिचा हात, धरा कोणी जाऊन. तो तिचा पदर, ओढा रे तो धरून. ते पाहा तिचे केंस, येतील ते धरतां. जा रे कोणी, मारा उडी. अरेरे, चालली, वत्सला चालली !' असा सुश्रुतेचा विलाप चालला होता.
"'नागालाच वरीन' म्हणणरी मरूं दे. असेल कोणी नाग तर काढील तिला. आम्हीं आर्यकुमारांनी कशाला घ्याव्या उडया ? हिचा बाप नागांना वांचवायला गेला तर स्वत: मेला. 'मी नागालाच वरीन' असें हीहि म्हणत होती, तर हीहि चालली वाहत. आर्यांनी नागापासून दूर राहावें हा सृष्टीचा संदेश आहे.' तेथे एक नागद्वेषी बोलला.