एक प्रमुख मंत्री रथ घेऊन शुक्राचार्यांस आणावयास गेला. शुक्राचार्य येणार, ही वार्ता वा-यावर सर्वत्र गेली. स्त्री-पुरुषांत हीच एक चर्चेची गोष्ट झाली. शुक्राचार्यांच्या ज्ञानवैराग्याच्या कथा सर्वांच्या ओठांवर होत्या. परंतु डोळयांना त्यांचे दर्शन घडलेलें नव्हतें. कथांनी कांन कृतार्थ झाले होते. आतां दर्शनानें डोळे पावन होणार होते. खेडोपाडीं वार्ता गेली. स्त्री-पुरुष मुलांबाळांसह हस्तिनापुरांत जमूं लागले. सारें शहर गजबजलें. घरोघर गुढया उभारण्यांत आल्या. लतापल्लवांच्या, केळीकर्दळींच्या कमानी उभारण्यांत आल्या. माणिक-मोत्यांच्या व्यापा-यांनी रत्नांच्या, मोत्यांच्या कमानी उभारल्या. पाचू, इंद्रनील, लाल वगैरे शेकडों प्रकारचीं, शेंकडों रंगांची रत्नें. वैदूर्य रत्नांची प्रभा तर फारच खुलें. मोर, शुक, हंस वगैरेंच्या आकृति रत्नांनीं तयार केलेल्या तोरणांतून दाखविल्या होत्या. वस्त्रागारांच्या समोर महार्ह वस्त्रांच्या कमानी होत्या. चांदीसोन्यांच्या भांडीवाल्यांनी त्यांच्या कमानी उभारल्या. अपार उत्साह, अपूर्व शोभा !

आज प्रभातसमयीं रथ येणार होता. उदयाचलावर सूर्य वर येत होता व तिकडून शुकाचार्यांचा रथ धडधडत येत होता. रथ दुरून दिसतांच एकच जयघोष झाला. आकाश खालीं पडतें कीं काय असें वाटलें. नगराच्या महाद्वाराला फारच शोभविलें होतें. वर गच्चींत फुलें घेऊन भृत्य उभे होते.  द्वारांत येतांच पुष्पवृष्टि होणार होती. वाद्ये वाजूं लागलीं. त्यांचा समिश्र आवाज फारच आनंद देत होता. परीक्षिति सामोरा गेला. शुक्राचार्य बाहेर पडले. परीक्षितीनें लोटांगण घातलें. शुक्राचार्यांनी त्याला हृदयाशी धरिलें.

एका शृंगारलेल्या मोकळया रथांत शुक्राचार्य बसले. वर सुवर्ण-छत्री होती. रथ चालूं लागला. वाद्यें झडूं लागलीं. पुष्पवृष्टि होऊं लागली. कोणीं सोन्याचांदीचीं फुलें उधळलीं. कोणी हिरेमोतीं उधळलीं. गरीब पौरजनांनीं लाह्या उधळिल्या. ज्याच्याजवळ जें होतें तें त्यानें आनंदानें उधळलें. हजारोंचे हात जोडले जात होते. डोळयांत भक्तिप्रेमाचे अश्रु येत होते. शुक्राचार्य शांत होते. सन्मानाचें मंद स्मित त्यांच्या मुद्रेवर झळकत होतें. त्यांचे डोळे किती शांत, पवित्र व गंभीर दिसत होते ! जणूं आकाशांतले दोन तारेच. त्यांचे कपाळ रुंद होतें. ज्ञानाची प्रभा तेथें फांकली होती. किती कोमल दिसत होतें तें मुखमंडळ ! त्यांची गौर अंगकांती होती. चंद्र व सूर्य यांची संमिश्र प्रभा त्यांच्या अंगावर होती. सूर्याचें तेच व चंद्राची रमणीयता ! किती पाहिलें तरी तृप्ति होत नव्हती डोळयांची.

राजप्रासादांत शुक्राचार्य आले. जनसंमर्द दूर गेला.

तिसरें प्रहरीं राजा परीक्षिति शुक्राचार्यांजवळ गेला व प्रणाम करून पायांशी बसला.

'राजा, कशाला बोलावलेंस ? काय काम ? दूर राहूनहि मी चराचराचें मंगलच चिंतीत असतों. मीं सर्वांजवळ आहें. जवळ आणि दूर हे शब्दच मजजवळ नाहींत --' शुक्राचार्यांनी आरंभ केला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel