'बुडणारे काढण्यासाठीं, मरणारे वांचविण्यासाठी.' कार्तिक म्हणाला.

तो तरुण कांही बोलला नाहीं. कार्तिकाने त्याचा हात धरला. अद्याप तो ओलाचिंब होता. त्याचे कपडे गळत होतें. त्याचे केंस ओलें होते. हृदयांतील करुणा का ती बाहेर वाहत होती ?

'त्यानें हो, वांचविलें, त्यानें उडी घेतली. कसा दिसतो आहे ? कसें आहे सरळ सुंदर नाक ! कसे पाणीदार डोळे ! श्रीकृष्ण परमात्मा का असाच दिसत असेल ?' स्त्रिया दारांतून, वातायनांतून पाहात बोलत होत्या. इतक्यांत कांही मुलींनी वरून फुलें फेंकिलीं. त्या तरुणाने वर पाहिले.

'मी  नाग आहें, आर्य नाहीं. का फुकट दवडतां फुलें ?' तो म्हणाला.

'आम्ही आर्यकन्या हा भेद ओळखीत नाहीं. आम्ही उदारपणा ओळखतों, त्याग ओळखतों. आज तरी तुम्हीं सिध्द केलेंत कीं या गांवांतील सर्व आर्यांपेक्षां तुम्ही थोर आहांत. करूं द तुमची पूजा, हीं घ्या फुलें-' असें म्हणून एका मुलीनें आणखी फुले अर्पिलीं. कोणी तरी धैर्य दाखविण्याची जरुरी होती. रस्त्यांत मग गल्लीगल्लींतील मुलांमुलींनी त्या तरुणाच्या गळयांत हार घातले, त्याच्यावर फुलें उधळिलीं. नागद्वेषी मनांत चडफडत होते. परंतु तो प्रसंगच असा अपूर्व होता, कीं द्वेषाला बाहेर पडायला लाज वाटत होती. पावसाळयांत शेतांना उपळीं फुटतात. परंतु दगडहि जरा मऊ दिसतात, आद्रेसे दिसतात.

वत्सला पडलेली होती. कार्तिक त्या प्राणदात्याला घेऊन आला. सुश्रुतेनें दारांत स्वागत केलें. तिचे डोळे पाण्यानें भरून आले.

'तुम्हीं वांचविलें हिला. माझीं सारीं मेली. एवढी वांचली. आज तीहि जाणार होती. परंतु तुम्ही मृत्यूंजय भेटलांत. तुम्ही अमृत दिलेंत. या, बसा. तुमचे कसे उपकार फेडू, कशी उतराई होऊं ? बसा. दमलेत तुम्ही. हिला शूध्दीवर आणण्याच्या भरांत तुम्हांला मी विसरलें; पण कार्तिकाला म्हटलें, 'जा रे, त्यांना आण.' आलेत. बसा. तुमचंच हें घर. विश्रांती घ्या अंथरूण देऊं का घालून? कढत दूध घ्या आधीं. मीं तापवून ठेवलें आहे. आधीं कोरडें नेसा. थांबा,देतें हो वस्त्र.' असें म्हणून सुश्रुतेने एक स्वच्छ वस्त्र त्याला दिलें. तो तरुण तें नेसला. अंगावर पांघरूण घेऊन तेथें एका व्याघ्राजिनावर तो बसला. कढत कढत दूध तो प्याला. नंतर त्यानें आहार घेतला. शेवटीं तो झोपी गेला.

'आजी, अद्याप कसे होत नाहींत हे जागे ? कांही अपाय तर नसेल ना ? अति श्रमानें का ग्लानि आली आहे ? ही स्वस्थ झोंप आहे, का दुसरें कांही आहे ?' वत्सलेनें विचारिलें.
'होतील जागे. आतां सायंकाळचा गार वारा वाहूं लागला कीं होतील जागे. केवढे त्यांचे उपकार !' सुश्रुता म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel