'आणि माझ्या मोराला जप रे. नागेशचें नांव घे म्हणजे तो नाचेल, पिसारा पसरील. त्याचीं पिसें नको कोणाला उपटूं देऊस. त्याच्या डोळयांतून पाणी येत आहे. त्यालासुध्दा समजें. जप हो त्याला.' नागेशानें सांगितलें.
'त्या रत्नीच्या वांसराला पोटभर दूध पिऊं देत जा.' रत्नकान्तानें सांगितलें.
अशी चालली होती निरवानिरव. झाडावरून टपटप पाणीं पडत होते. ते दंवबिंदु होते, की प्रेमबिंदु होते ? असा सुगंधआला वा-याबरोबर कीं कधीं असा आला नव्हता. आश्रमांतील फुलें का आपली सारी सुगंधसंपत्ति देऊन टाकीत होती ? आपले सुगंधी प्राण कां ती सोडीत होती ? मोर केकारव करीत होता. गाई हम्मारव करीत होत्या. मांजर आस्तिकांच्या पायांशी पायांशी करीत होतें. चपळ व अल्लड हरणें दीनवाणीं उभीं होतीं. पांखरे फांद्यांवर नि:स्तब्ध बसलीं होती. 'आतां कोण घालणार नीवारदाणें' असें का त्यांना वाटत ! होतें आस्तिकांचा तो प्रेमळ हात, त्या हातून पुन्हा मिळतील का दाणे ? असें का त्यांच्या मनांत येत होते ? तेथील सारी सृष्टि भरून आली होती. आश्रमांतील पशुपक्ष्यांच्या, वृक्षवनस्पतींच्या रोमरोमांत एक प्रकारची तीव्र संवेदना भरून राहिली होती.
आस्तिक आश्रमांतील वृक्षांना, फुलांना, उद्देशून म्हणाले,'जातों आम्हीं. तुम्हीं आमचे सद्गुरु. प्रेमळ वृक्षांनो, आम्हांला आशीर्वाद द्या. तुम्हीं आपलें सारें जगाला देतां, फुलें-फळें-छाया सर्व देता. तोडणा-यावरहि छाया करितां. दुष्ट असों, सुष्ट असो, जवळ घेतां. दगड मारणा-यांस गोड फळें देतां. तुमची मुळें रात्रंदिवस भूमीच्या पोटांत धडपडत असतात. परंतु या धडपडीनें मिळणारें सारें भाग्य तुम्ही जगाला देतां. तुम्ही आमच्यासाठीं थंडीवा-यांत-पावसांत-उन्हांत अहोरात्र उभे. आमच्यासाठीं तुम्ही जळतां. तुमचें सारें आमच्यासाठीं, तुमच्याप्रमाणें आगींत जाण्याचें आम्हांला धैर्य येवो. स्वत:चे सर्वस्व नम्रपणें व मुकाटयानें देण्याची इच्छा होवो.
आश्रमांतील फुलांनो, तुमच्याप्रमाणें आमचें जीवन निर्मळ, सुंदर व सुगंधीं होवों. तुमचें लहानसें जीवन. परंतु किती परिपूर्ण, किती कृतकृत्य ! सृष्टीचें तुम्हीं अंतरंग आहांत; सृष्टीचे मुकें संगींत आहांत. जातों आम्हीं. कांटयावरहिं तुम्ही उभीं राहतां व सुगंध देतां. आम्हांसहि आगीत शिरतांना हंसूं दे, जगाला सुगंध देऊं दे.
आश्रमांतील पशुपक्ष्यांनो, किती तुम्ही प्रेमळ ! आम्ही तुम्हांला मूठभर धान्य फेंकावें, परंतु तुम्ही दिवसभर आम्हांस संगीत ऐकवतां. आमच्या खांद्यावर येऊन बसतां. हांतांतून दाणे घेतां. तुम्हांला प्रेम समजतें. मानवाला कां समजूं नये ? आमची रत्नीं गाय आवाज ओळखतें. प्रेमळ हात तिच्या कासेला लागला तर अधिक दूध देते. ही हरणें किती प्रेमाने जवळ येतात ! मोर प्रेमळ माणूस पाहून पिसारा उभारतों. कशीं तुम्हां पशुपक्ष्यांची मनें ! आणि ही मांजरी सारखीं कालपासून म्यांव म्यांव करीत आहे. 'मी येऊं' 'मी येऊं' असें का विचारीत आहे ?