'मीं त्यांची किंमत नाहीं कधीं केली. माझें हृदय त्यांच्याकडे गेलें, मीं त्यांच्या चरणीं जीवन वाहिलें. तराजूंत घालून मीं त्यांना तोललें नव्हतें. ते सद्गुणी की दुर्गुणी, पराक्रमी कीं दुबळे इकडे माझें लक्ष नव्हतें. प्रेम वजनमाप नाहीं करीत बसत. प्रेम प्रिय वस्तूंचा विक्रा नाहीं मांडीत.' ती म्हणाली.

'मग राहूं का तुझ्या शेतावरच्या झोपडींत  ? कामहि करीन.  तुला फुलें आणून देईन. दूध आणून देईन. घरीं निरुद्योगी किती दिवस राहूं ? ' त्याने विचारिलें.

'परंतु तुला भीति वाटेल. वाघ येतील, साप येतील, मग कसें करशील ?' तिनें विचारलें.

'वाघानें यावें व मला खावें; सापानें यावें व मला दंश करावा म्हणून तर मी येथें राहूं इच्छितों. तुझ्या शेतावर मरण येईल. तुझ्या केसांना शोभवणारीं फुलें जेथें फुलतात त्या मळयांत मरणेंहि भाग्य.' तो म्हणाला.

'मी आजीला विचारीन.' ती म्हणाली.

कार्तिक निघून गेला. तो जाऊन सूत कांतीत बसला.  सारखें सूत कातीत बसे. तो डोळयांना म्हणें, 'हात वत्सलेसाठीं सारखें कांतीत आहेत. मन सारखें तिचें चिंतन करीत आहे. तुम्ही अश्रूंची माळ गुंफा. परंतु वस्त्र नेऊन देता येईल. अश्रूंची माळ कशी गुंफूं, कशी नेऊन देऊं ? ' शेवटीं हिरवें पातळ तयार झालें. त्या दिवशीं वत्सला शेतावर गेली होती.  पाणी घालीत होती, तों कार्तिक तें वस्त्र घेऊन आला.

'वत्सले, हें घे हिरवें पातळ. त्या हिरव्या झाडाखलीं जाऊन नेस. डोहाळें लागले म्हणजे हिरवें पातळ नेसावें असें म्हणतात ना ?' तो म्हणाला.

'डाळिंबी पातळ, अंजिरी पातळ नेसावें व हिरवी कंचकी घालावी. कार्तिक, तूं जा. तूं माझ्यावर प्रेम करतोस. मला तुझी कींव येते.  परंतु आता जा. जपून बोलत जा, जपून वागत जा, नाहीं तर मी तुला जवळ येऊं देणार नाहीं, तुजजवळ कधीं बोलणार नाही.' ती रागानें म्हणाली.

'क्षमा कर. मी जातो.' त्याच्या डोळयांत पाणी आलें. तो निघून गेला. वत्सलेकडे त्यानें वळूनहि पाहिलें नाही.

वत्सला झाडाखालीं गेली. तें हिरवें हिरवें वस्त्र ती नेसली. नागानंद आले व चकित झाले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel