'तुम्हीं या शेतावर कां राहिलांत ? घरांतून तुमच्या वडिलांनी का तुम्हांला घालविलें ? तुमच्या आईला वाईट नाहीं वाटत तुम्ही एकटे दूर राहतां म्हणून ? ' कृष्णीनें वाटेंत प्रश्न केला.

'आईला वाईट वाटतें. परंतु ती काय करणार ? बाबांना मी नागांविषयीं सहानुभूति दाखवितों हें आवडत नाहीं. घरांत कटकटी सदैव असण्यापेक्षां निघून जाणें बरें असें मीं ठरविलें.  शिवाय तुला सांगू एक गोष्ट ?  वत्सलेविषयीं मला खूप वाटें. माझें तिच्यावर फार प्रेम आहे असें मला वाटें. तिनें आश्रम सोडला. हें ऐकून मीहि आश्रम सोडून घरीं आलों. मी तिच्याकडे बघें, तिच्याकडें जाई. परंतु तो नागानंद आला. त्यानें तिच्यासाठीं पुरांत उडी टाकली. त्यानें वाघाला मारलें. वत्सला त्याच्यासाठीं वेडी झाली. मला वाईट वाटें. मला वत्सलेंचें सारें आवडे. तिची सेवा करावी असें वाटे. या जन्मी नाहीं तर पुढील जन्मीं ती मिळेल असें मी मनांत म्हणें. तिच्या शेतावर खपावें, तिला फुलें नेऊन द्यावीं, तिला दुरून का होईना पण जीवनांत सांठवावें असें वाटे. मी वत्सलेसाठीं वेडा झालों होतों. परंतु ती माझी कींव करी. मी तिला माझ्या हातच्या सुताचीं वस्त्रें दिलीं. तिनें तीं नाकारलीं नाहींत. ती माझ्याविषयीं सहानुभूति दाखवी. माझा तिटकारा करीत नसे. परंतु प्रेम म्हणून कांही निराळें असतें. पुढें वत्सला व नागानंद गेलीं. तिची फुलांची परडीच मी हातांत प्रेमानें घेत असें. आणि आतां तूं आलीस नवी जादूगारीण ! जीवनांतील एक अंक संपला. दुसरा सुरू झाला . इतक्या वर्षांत तुझी आठवण झाली नाहीं. परंतु जीवनांत कोठें तरी होती. इतकं दिवस गुप्त रूपानें मागें राहणारी तूं एकदम पुढें येतांच तूं माझीच असें वाटलें. तूं माझ्या नकळत माझ्या जीवनांत हळूहळू वाढत होतीस. तूं येथें फुलें ठेवीस. मला वाटे, माझ्यासाठीं कोण ठेवतो फुलें ? मी एकदां वत्सलेला म्हटलें, 'मी तुझ्यासाठीं रडतों. परंतु माझ्यासाठीं कोण रडत असेल ? 'तूं तिकडे रडत होतीस. माझी आठवण काढीत होतीस. वत्सलेसाटीं मी तपश्चर्या करीत होतों. तूं माझ्यासाठी करीत होतीस. माझी तपश्चर्या फळली. जीवनाला परिपूर्ण करणारें कोणी तरी मिळालें. कृष्णे, पुष्कळ वेळां आपलें आपलें म्हणून जे मनुष्य आपणांस वाटतें तें आपलें नसतें. आपलें मनुष्य दूर असतें. त्याचाच वास जणूं आपण या जवळच्या माणसांत घेऊं पाहतों. आणि आपण फसतों. परंतु तें आपलें खरें माणूस दृष्टीस पडतांच मग आपली फजिती आपणांस कळतें. वत्सलेंत जणूं मी तुलाच बघत होतों. परंतु ते मला कळलें नाहीं. वत्सलेने हांक मारली, परंतु मी पुरांत जाऊं शकलों नाहीं. परंतु तुझ्याबरोबर मी वाटेल तेथें येईन. कारण तूं मला संपूर्णपणें माझी वाटत आहेस. तुझ्याबरोबर मी न येईन तर मरून पडेन. तुझ्याबरोबर रानांत आलों. तुझ्याबरोबर कोठे येणार नाहीं ? हें बोट भाजतें म्हणून मी कुरकुर करीत होतों. पण तुझ्याबरोबर मी आगींत शिरेन. थंड वाटेल ती आग.  खरेंच, तूं दिसलस व एकदम कांही नवीन वाटलें. मरगळलेल्या माझ्या मनांत अपार स्फूर्त आली. मरूं म्हणणा-या मला जगावें असें वाटूं लागलें. जीवनाला नवीन अर्थ, नवीन रंग, नवीन सौंदर्य, नवीन गोडी प्राप्त झाली. वत्सलेला पाहून मला बरें वाटे. वत्सलेच्या दर्शनानें मला आनंद होई. परंतु तो आनंद क्षणिक असें. तुला पाहून जो आनंद झाला, त्या आनंदाशीं वत्सलेला पाहून होणारा आनंद तुलतां येणार नाहीं. कृष्णे, इतके दिवस मला जिवंत असून मेल्याप्रमाणें कां ठेवलेंस ? लौकर कां नाहीं आलीस ?  सांग, कां नाहीं आलीस ? ' कार्तिक तिला दोन्हीं हातांनी धरून म्हणाला.

'हें काय हें ? मारतां का मला ? ' ती म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel