त्याचा विकास त्यामुळें होईल. सौम्य माणसाला प्रखरतेची जोड मिळते. प्रखरतेला सौम्य वृत्तीची जोड मिळून मर्यादा व संयम येतात. नाग काय किंवा इतर कोणत्याहि जातिजमाती काय ! येऊं देत सा-या एकत्र. जो तो शक्य तों आपणांस योग्य त्याचीच निवड करीत. आणि शेवटीं मानवी जीवन हें अपूर्णच आहें, त्यामुळे आपण दृष्टि अधिक उदार ठेवली पाहिजे.  असो.  स्वत:च्या विकासाला जें हवें तें स्त्री-पुरुष एकमेकांत बघतील. एका दृष्टिक्षेपानें बघतील. एका कटाक्षांत सारीं उघडीं होतात. त्यांतील साधर्म्य व वैधर्म्य निघतें.  आपण जवळ येऊं तर आपलीं जीवनें सफल होतील, असे ते दोन जीव एकदम मुकेपणानें बोलतात. एका हस्तस्पर्शानें सांगतात. तुमचीं सारी शास्त्रें या जीवनशास्त्रासमोर फिकी आहेत. या महान् जीवनशास्त्राचा धर्म बनवाल तरच संस्कृति वाढेल. सजीवता नेहमीं राहील. चैतन्य व स्फूर्ति खेळत राहतील. समाजाचा संकोच होणार नाहीं. व्यवहार मोकळा राहील. सर्वत्र प्रकाश नांदेल. सागर कधीं आटत नाहीं. तो सर्वांना जवळ घेतो. तो सदैव उचंबळतो. आर्यांनी सागराप्रमाणे व्हावें. हजारो जाति-जमातींच्या लाटा येथील मानव-सागरांत उसळोत. उचंबळोत. हिमालयाचीं सहस्त्र शिखरें, सागरावर अनंत लाटा ! सारा हिमालय शुभ्र व स्वच्छ आहे; शेकडों जीवनदायी नद्यांना जन्म देत आहे, सर्व प्रकारच्या वृक्ष वनस्पति फुलवीत आहे. तसा होऊं दे भारतीय समाज. नाना विचारधारांना प्रसवणारा, शेंकडों प्रयोग करणारा, सहकार्य व सहानुभूति यांनी पुढें जाणारा, वर उंच जाणारा असा होऊं दे हा समाज.

राजा, मला सर्वत्र मांगल्यच दिसतें. एके दिवशीं झाडाची फांदी मी रात्री तोडीत होतों. एक वृध्द नागमाता म्हणाली, 'नको रे बाबा ! रात्री पानें झोंपतात, झाडें झोंपतात.' मी तिला हंसलों नाहीं. तिचे पाय धरले. तिची ती खोटीहि कल्पना असेल. परंतु सर्वत्र ती चैतन्य पाहते आहे. वृक्षालाहि सुखदु:ख असेल याचा क्षणभर विचार करते आहे. मीं मलाच क्षुद्र व हीन मानलें व त्या मातेला थोर मानलें. राजा, सर्वाच्या विकासाची वेळ येते. तीं तीं झाडें त्यांची त्यांची वेळ येतांच नवीन पल्लवांनी नटतात, नवीन फुलाफळांनी बहरतात. कोणाला कधीं बहर, कोणाला कधीं. कोणाला आज, कोणाला उद्यां, परंतु सर्वांचा विकास व्हावयाचा आहे. वांझ कोणी नाहीं. ही दृष्टि ठेवून आपण वागूं या. त्यांच्या त्यांच्या विकासाला सहाय्य करूं या. आपणांस स्वत:चा विकास करून घ्यावयाचा असेल तर दुस-याविषयीं आदरभाव दाखविल्याशिवाय तो होणार नाहीं. मी काय सांगू ? या तरुणांना मी हेंच शिकवीत असतों. या माझ्यासमोर काळयागो-या मूर्ति बसल्या आहेत. परंतु मला त्यांच्यांत एकच दिव्यता दिसत आहे. सारीं सुगंधी फुलें. त्यांच्या जीवनांतील अप्रकट वास प्रकट करणें एवढेंच माझें काम. गुरु नवीन कांही देत नाहीं. जें असेल तेंच प्रकट होण्यास मदत करतो. कोडलेल्या सुगंधाला बाहेर आणतो. जें बध्द आहे तें मुक्त करणें एवढेंच गुरूचें काम ! घर्षणानें ज्याप्रमाणें काष्ठांतील अग्नि प्रकट होतो, त्याप्रमाणें संस्कारांच्या घर्षणानें मानवीं मनांतील दिव्यता प्रकट होते. सुगंध अनेक प्रकारचा असतो. गोडी अनेक प्रकारची असते. ह्या छात्रांतील दिव्यताहि अनेक प्रकारची आहे. ह्याची दिव्यता त्याला दाखवतों, त्याची ह्याला दाखवतों. जें ह्या आश्रमांत चाललें आहें तें समाजांत सर्वत्र चालावें, तें वाढीस लागावें, असें मला वाटतें. परंतु अनेकांची अनेक मतें. शेवटीं ज्यानें त्यानें नम्रतापूर्वक परंतु निश्चयी वृत्तीनें स्वत:च्या हृदयांतील सत्याशीं एकरूपं राहिलें पाहिजे. स्वत:च्या सत्यावर शेवटी श्रध्दा. स्वत:च्या प्रयोगावर श्रध्दा. जेथें श्रध्दा नाहीं तेथें विकास नाहीं. श्रध्दा हें स्वयंप्रकाशी तत्त्व आहे. श्रध्देला श्रध्देचाच पुरावा. तिला तिचें स्वत:चेच प्रमाण. श्रध्देला तुच्छ नको मानूं, ती एक स्वतंत्र अशी निर्मात्री शक्ति आहे. श्रध्देचा नाश म्हणजे स्फूर्तीचा नाश.  म्हणून माझी श्रध्दा घेऊन मी जात आहे. माझा दिवा माझ्या हातांत. त्याने दुस-यास दिसेल कीं नाहीं मला माहित नाहीं, परंतु मला दिसत आहे ही गोष्ट खरी.'

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel