'आपण सारीं नाचूं या. या रे मुलांनो, उठा.' वत्सला म्हणाली.
'तुम्ही दोघें मध्यें उभी राहा. तुमच्याभोंवती आम्ही फिरतों. तुम्ही जणू झाडें. आंब्यांचीं मोहरलेलीं झाडें. आम्ही जणूं गूं गूं करणा-या मधमाशा, तुम्ही जणूं कमळें, आम्ही जणूं भुंगे.' मुलें म्हणाली.
'आम्हीं मध्यें उभी राहतों. तुम्हीं नाचा व गाणें म्हणा.' वत्सला म्हणाली.
मुलांना अपार उत्साह आला. तो तरुण व वत्सला मध्यें उभीं होती. मुलांच्या तालांत त्यांच्याहि टाळया वाजत होत्या. त्या तरुणानें वत्सलेचा हात धरला. ती दोघें नाचूं लागलीं. मुलांमध्ये नाचूं लागलीं. नदीचें पाणी नाचत होतें. आकाशांत चांदण्या नाचूं लागल्या. दूर दिवे नाचूं लागले. मुलें दमलीं. थांबला खेळ. थांबला का सुरू झाला ? नाच थांबला. थाबला का कायमचा सुरू झाला ? वत्सला व तो तरुण यांचे हात सुटले. सुटले की एकत्र चिकटलें ?
'कशी मजा आली ! गंमत ! तो कसा छान नाचत होता. जणूं गोकुळां-तील कृष्ण ! असाच नाचत असेल तो कृष्ण.' असे म्हणत मुलेंमुलीं गांवांत चालीं. परंतु तो कोण होता दूर उभा ? हा महान् नाच चालू असतांना तो नव्हात का नाचत ? त्याला नाहीं का स्फूर्ति आली ?
'कोण कार्तिक ? असा रे कां उभा ? आज सोन्याचा पाऊस पडला. वेचींना तो भिकारी. तूं कां नाहीं आलास नाचायला ?' तिनें विचारिलें.
'नागांप्रमाणें आर्य नाचरें नाहींत--' तो म्हणाला.
'नागांना नाच प्रिय आहे. नागांचा देव गानप्रिय आहे, नृत्यप्रिय आहे. नाग-देवांच्या यात्रांतून आम्ही नागमूर्तीसमोर गातों व नाचतों. खरोखरचे नागहि येऊन तेथें डोलूं लागतात.' तो तरुण म्हणाला.
'आणि आर्य अर्जुन तर उर्वशीजवळ नृत्य शिकला. श्रीकृष्ण भगवान् तर नटराज होते. कार्तिक,नाचणें का वाईट? सारी सृष्टि नाचत आहे. वा-याची लहर येतांच पानें नाचूं लागतात, लतावेली डोलूं लागतात, पाणी उचंबळूं लागतें. ही आपली पृथ्वीसुध्दां म्हणे सूर्याभोवतीं नाचत आहे, आणि चंद्र पृथ्वीभोवतीं नाचत आहे. शिवाशिवीचा त्यांचा खेळ चालला आहे, असें आश्रमांत आचार्य एके दिवशीं सांगत होते. लपंडावाचा खेळ. पृथ्वीला सूर्य सांपडत नाहीं, चंद्राला पृथ्वी मिळत नाहीं. चालल्या आहेत प्रदक्षिणा.' वत्सला म्हणाली.
'प्रदक्षिणा फुकट नाहीं जात. पृथ्वीला प्रकाश मिळतो, चंद्रालाहि शोभा मिळते. प्रेमाची प्रदक्षिणा जीवनांत प्रकाशच जाणील.' तो तरुण म्हणाला.