'आकाशांत ढग आले म्हणजे मोर नाचतात. तया दिवशीं मी आईबरोबर गेलों होतें शेतावर. गडगडलें वरती. मला भीति वाटली. मी आईला मिठी मारली. परंतु मोर तर नाचूं लागले. त्यांना का ढग आवडतात ? तें गडगडणें आवडतें ? आई म्हणाली, 'वरती देवाची आई दळीत आहे. खरें का ग ?'' शशांकानें शंका विचारिली.

'देवाला नको का जेवायला ?' सुश्रुता म्हणाली.

'परंतु गडगडलें म्हणजे पाऊस पडतो. पीठ नाहीं पडत.' शशांक म्हणाला.

'मोराला पाऊस फार आवडतो.' सुश्रुता म्हणाली.

'मला सुध्दां. परंतु आई जाऊं देत नाहीं. त्या दिवशीं आईनें मला पटकन् उचलून घेतलें व माझ्या डोक्यावर पदर घातला. मला नाहीं आवडत असें.  पाऊस डोक्यावर पडला म्हणून काय झाले ?' त्याने विचारिलें.

'आपल्याला पाऊस बाधतो. मोराला नाहीं बाधत. मेघ मोराचे मित्र आहेत.' सुश्रुतेने सांगितलें.

'माझे सुध्दा ते मित्र आहेत. मी त्यांच्याकडे बघत असतों. ते घोडयासारखें दिसतात, तर एकदम हत्तीसारखें दिसू लागतात. आणि रंगसुध्दां छान दिसतात त्यांचे.  त्या डोंगरावर चढले कीं हात लागेल त्यांच्या अंगाला. त्यांचे अंग ओलें असेल का ग ? ' शशांकानें सुश्रुतेची मान हलवून विचारिलें.

'अरे, दुखेल माझी मान.' ती म्हणाली.

'मी जाऊं खेळायला, का शेतावर जाऊं ?  शेतावर जातों.  झाडांच्या आडून निरनिराळे आवाज काढीन. मोरासारखा, कोकिळेसारखा.' शशांक म्हणाला.

'जा शेतावर.' सुश्रुता म्हणाली.

'जातोंच.' असें म्हणून आपली रंगीत काठी घेऊन तो निघाला.

वत्सला व नागानंद शेतांत काम करीत होतीं. सूर्यास्ताची वेळ होत आली होती. एका बाजूला फारच सुंदर इंद्रधनुष्य पडलें होतें. आकाश रमणीय परंतु जरा गंभीर असें दिसत होतें.

'पाहा तरी ती शोभा ? अगदीं सबंध दिसतें आहे इंद्रधनुष्य. देवांच्या राज्यांतील कमानी. परमेश्वर का कोणाचें स्वागत करीत आहे ?  कोणासाठी उभारली आहे ही कमान ?  आणि तिकडे पाहा सोनें उधळलें आहे जणूं ! का सोन्यासारख्या वस्त्रांच्या बैठकी आहेत ? कोण बसणार त्या भरजरी बैठकांवरून ! देवाच्या घरीं किती वैभव असेल, कशी सुंदरता असेल.' वत्सला बघत म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel