'तेथें झाडाखालीं कोण आहे तो बसलेला ?' परीक्षितीनें विचारिलें.
'तो एक ऋषि आहे. नागजातीचा ऋषि आहे. तो या झाडाखालीं तपश्चर्या करीत असतो.' सेवकानें सांगितलें.
'त्यांना नागपूजा प्रिय आहे ना ! हा मृत नाग घाला त्यांच्या गळयांत ! जिवंत दैवत नाहीं जवळ घेतां येत, निदान मृत तरी असूं दे जवळ. यांच्या देवाच्या अंगावर साप असतात. नागोबांच्या दगडाच्या मूर्ति, आणि पशुपतीच्या दगडी मूर्तीच्या गळयांत साप, अंगावर साप ! त्याला ते महादेव म्हणतात ! यांचा सारा गोंधळ आहे. नाना दैवतें, विचित्र दैवतें ! कशीं आम्हीं हीं दैवतें एकत्र आणावयाचीं, कसा समन्वय करावयाचा ? आस्तिक करूं जाणत. आपण करावी जरा गंमत. आण तो मृत सर्प, बरा आहे लांबलचक. या ऋषीला महादेव बनवूं. साप गळयांत घालणारा महादेव. भुतांत नाचणारा महादेव, आण. ' परीक्षिति सेवकाला म्हणाला.
तो मृत सर्प काढण्यांत आला. राजानें तो ऋषीच्या अंगावर चढविला. जणूं ऋषीला त्यानें अलंकार लेवविले. बरोबरीचे सेवक हंसले. कोणी गंभीर झाले. 'राजाचा होईल खेळ, परंतु कठिण येईल वेळ' असें कांहींच्या मनांत आलें. परंतु स्पष्ट कोणी बोलेना.
राजा रथांत बसला. सेवक घोडयांवर बसले. वायुवेगानें ते निघून गेले.
नागतरुणांना त्या ऋषीबद्दल अत्यंत आदर होता. विशेषत: तक्षककुळांतील नागतरुणांची तर त्याच्या ठिकाणीं फार भक्ति. एक तरुण प्रत्यहीं सायंकाळीं तेथें येई. ऋषीच्या मुखांत दूध घाली. तेथें घटका दोन घटका बसे. प्रणाम करून जाई. त्या दिवशीं सायंकाळीं तो तरुण तेथें आला. तों तो बीभत्स प्रकार त्याला दिसला. नागांच्या दैवतांची ती विटंबना होती. नागजातीचे लोक सापाला मारीतच नसत असें नाहीं. परंतु सर्पाला मारल्यावर त्याची विटंबना करीत नसत. त्याला अग्नि देत. साप फार असत त्या काळीं त्या प्रदेशांत. ईश्वराची त्या स्वरूपांतच नाग मग पूजा करीत. 'हे नागस्वरूपी देवा, हे सर्पस्वरूपी देवा, आम्हांला या सर्पापासून, नागापासून वांचव.' अशी ते प्रार्थना करीत.
त्या तरुणाला सर्पाची ती विटंबना व त्या तपोधन ऋषीची विटंबना सहन झाली नाहीं. त्यानें तो मृत सर्प हळूच काढला. तेथें कशानें अग्नि देणार ? त्यानें त्याला पुरलें. त्याच्यावर फुलें वाहिली. नंतर ऋषीच्या अंगावर सर्पाचें रक्त सांडले होतें, तें त्यानें हलक्या हातानें पुसून काढलें. ऋषीचें अंग स्वच्छ केलें. मग ऋषीच्या मुखांत त्यानें दूध घातलें. त्यांच्याजवळ मग मन शांत करून बसला. प्रणाम करून निघून गेला.