कार्तिक वत्सलेच्या शेतावर राहिला होता. त्यानें आपलें घर सोडलें होतें. तो शेतावर काम करी. सुश्रुता आजींना तो फुलेंफळें, भाजीपाला, दूध सारें नेऊन देई. तो काम करतांना म्हणें, 'देवा, आर्य व नाग यांचे सख्य कर, नको युध्द, नको संहार. वत्सला व नागानंद यांच्या प्रचाराला यश दे. आस्तिकांसारख्या महर्षींचे हेतु पूर्ण कर.' त्याच्या डोळयांसमोर वत्सला येई. 'ध्येयवादी वत्सला ! सुखाचा संसार सोडून संकटाला मिठी मारणारी वत्सला ! वत्सलेला निर्भय नागानंदच योग्य ! मी नाहीं योग्य.' असें त्याच्या मनांत येई.

त्या गावांत एक नागकन्या होती. तिचें नांव कृष्णी. कृष्णी काळीसांवळी होती. मोठी खेळकर होती. परंतु तिची आई तिला बाहेर जाऊं देत नसे. तरीहि कृष्णी चोरून जाई. कार्तिकाला पाहावयाला कृष्णी जाई. दूर झाडींत उभी राही व त्याला पाही. एखादे वेळेस तो मोठयाने टाळी वाजवी, मोठयाने हंसे.  कार्तिक इकडे तिकडें बघे, परंतु त्याला कोणी दिसत नसे.

कृष्णी आतां धीट झाली. रात्री आई निजी की ती उठे. ती त्या शेतावर येई. प्रेमाचा दिवा हातांत घेऊन येई. कांटे बोंचत नसत. भीति वाटत नसे. ती कार्तिकाच्या झोंपडीला प्रदक्षिणा घालीत राही. पहांटेची वेळ होत आली, कोंबडा आरवला, कीं ती जायला निघे. परंतु जाण्याचे आधीं दोनचार फुलें झोपडीच्या आंत टाकी, प्रणाम करी व जाई.

कार्तिकाने एकें दिवशी तीं फुलें पाहिली. त्याच्या शय्येवर होती. कोठून आलीं फुलें, कोणी टाकलीं का, कीं वरून पडली, का वा-याने आलीं ? त्याला कळेना. ती फुलें हातांत घेऊन तो बसला. या कार्तिकाला कोणीं दिलीं फुलें ? कोणाचा आहें मी देव, कोणाचा आहें मी मित्र ?

एके दिवशीं कृष्णीनें सुंदर फुलांच्या माळा घरीं तयार केल्या. किती तरी हार, किती तरी माळा !

'कृष्णे, कशाला माळा, कशाला हे हार ? ' आईने विचारलें.

'माझ्या देवाला.' ती म्हणाली.

'कोठें आहे देव ? ' तिनें प्रश्न केला.

'नागांचा देव रानांत राहतों.' ती म्हणाली.

'केव्हां जाणार पूजेला ? राजपुरुष येतील व पकडतील. नागपूजा बंद  झाली आहे. उगीच संकट आणूं नकोस. पुढें काय काय होणार आहे. देवाला माहीत.' आई म्हणाली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel