२८२१

जें जें कर्म करावें या देहीं । भोगावें तेंही देहादेह ॥१॥

देहींचें कर्म देहींच भोगावें । वायां कां शिणावें हाव भरी ॥२॥

आपुलें संचित तैसा कर्मभोग । वाउगा उद्योग बोलून काय ॥३॥

एका जनार्दनीं कर्माची जे रेखा । न चुके सकळिकां भोग त्याचा ॥४॥

२८२२

विपरीत सुपरीत हा तो काळाचा विभाग । तेथें त्याग भोग करूनी काय ॥१॥

होणार तें होतें आपुलें न चले कांहीं । वायां दुःख पाहीं मानू नये ॥२॥

जी जी संचितीं लिहिलीसे रेखा । ती तों ब्रह्मादिकां न चुकेचि ॥३॥

एका जनार्दनीं वायां कां सायास । सुखदुःख लेश पूर्व कर्म ॥४॥

२८२३

सम आणि विषम हीं तो काळाची फळें । भोगिल्याविण बळें न सुटती कधीं ॥१॥

वाउगी कल्पना वाउगी कल्पना । वागविती मना परम मूर्ख ॥२॥

उसनें आणि ताना जीवा वाटे गोड । देतों तें लिगाड होय मग ॥३॥

एका जनार्दनीं हाही अनुभव । सुखदुःखा ठाव याचपरी ॥४॥

२८२४

जो कनकबीजें भुलविला । तो गाये नाचे उडे भला ॥१॥

शुद्धि नाहीं पा देहाचीं । सैरावैरा बोले वाचे ॥२॥

देह अभिमानें उन्मत्त । अतिकामें कामासक्त ॥३॥

ज्यासी विष चढलें गहन । तया करविती विष्ठापान ॥४॥

एका जनार्दनीं वर्म । हारपे तेणें कर्माकर्म ॥५॥

२८२५

आतां धर्माधर्म विचार । तो ऐका सविस्तर ॥१॥

शुद्र पतीत गृहींचें अन्न । एक रात्र पावन जाण ॥२॥

व्याघ्र - नख गज - दंत । अपवित्र जंव स्नेहयुक्त ॥३॥

पटतंतु स्वयें पुनीत । वायूनें शुद्ध उर्णावस्त्र ॥४॥

गोक्षीर पवित्र कास्यपात्रीं । तेंचि अपवित्र ताम्रपात्रीं ॥५॥

घृत पवित्र अग्नि संस्कारीं । अग्नि पवित्र ब्राह्मणमंत्री ॥६॥

वेद पवित्र गुरुमुखें । गुरुपवित्र निजात्मसुखें ॥७॥

पृथ्वी पवित्र जळ संस्कारी । जळ पवित्र पृथ्वीवरी ॥८॥

व्याघ्राजिन मृगाजिन । हें स्वाभाविक पवित्र जाण ॥९॥

एका जनार्दनीं निर्धार । मुख्य पवित्रता अंतर ॥१०॥

२८२६

गंगोदक तें पवित्र । येर कडु अपवित्र ॥१॥

दोनीं उदकें तंव सारखीं । शुद्ध अशुद्ध काय पारखीं ॥२॥

गंगा देवापासून जाली । येर काय मध्यवर्ती केली ॥३॥

शुद्धाशुद्ध हे वासना । शरण एका जनार्दना ॥४॥

२८२७

वेदान्त प्रतिपाद्य करावा हा धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥१॥

मुख्य चारी वर्ण यांचा पैं धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥२॥

जयां जे जे धर्म तयां तें तें कर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥३॥

ब्राह्माणांचा धर्म संध्या षट्‌कर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥४॥

शरणागताचें रक्षण क्षत्रियांचा धर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥५॥

वैश्यांचा धर्म वैव्हारिक कर्म । न करितां अधर्म सहज लागे ॥६॥

शूद्रांचा धर्म सर्वभावें पूजन । एका जनार्दन तृप्ती तेणें ॥७॥

२८२८

अधर्में अदृष्टांचें चिन्ह । विपरीत वचन तें ऐका ॥१॥

भांडारीं ठेविला कापूर उडे । समुद्रामाजीं तारूं बुडे ॥२॥

ठक येवोनि एकान्ती । मुलाम्याचें नाणें देती ॥३॥

परचक्र विरोध धाडी । खणीत लावूनी तळघरें फोडी ॥४॥

पाणी भरे पेंवा आंत । तेणें धान्य नासे समस्त ॥५॥

गोठण शेळ्या रोग पडे । निमती गाईम्हशींचें वाडे ॥६॥

भूमीनिक्षेप करूं जाती । ते आपुल्याकडे धुळी वोढिती ॥७॥

बुद्धी सांगे वाडोवाड । तेथोनी तोंडी घाला दगड ॥८॥

ऐशी कर्माची अधर्म स्थिती । एका जनार्दनीं सोशी फजिती ॥९॥

२८२९

फणस खातां लागे गोड । तेथें अधिक खाय तोंड ॥१॥

सूर्या पूजितां पुण्य घडे । तेथें जे बेलपत्रीं चढे ॥२॥

ऐसा कर्माकर्म विनाश । गुण तेचि होती दोष ॥३॥

एका जनार्दनीं जाण । वायां दोषाचें हें चिन्ह ॥४॥

२८३०

जेणें घेतलेंसे विख । तया सर्प लाविती देख ॥१॥

जें केलें आपुलें आपण । जें भोगितां दुःख कोण ॥२॥

एका जनार्दनीं कर्म । कर्मामाजी घडे वर्म ॥३॥

२८३१

ज्यासी करणें चित्तशुद्धी । कर्में आचरावीं आधीं ॥१॥

तरीच होय मनः शुद्धी । सहज तुटती आधि व्याधि ॥२॥

चित्ताची स्थिरता । होय उपासने तत्त्वतां ॥३॥

चित्त झालिया निश्चळ । सहज राहील तळमळ ॥४॥

एकाजनार्दनीं मन । होय ब्रह्मारूप जाण ॥५॥

२८३२

जया करणें आत्महित । स्वधर्म आचरावा सतत ॥१॥

कर्मे नित्य नैमित्तिक । ब्रह्माप्राप्ति लागीं देख ॥२॥

तींचि नित्य आचरावीं । चित्तशुद्धि तेणें व्हावी ॥३॥

एका जनार्दनीं कर्म । इश भक्तीचें हें वर्म ॥४॥

२८३३

आलिया द्विजासी द्यावें अन्नदान । नसतां अभ्युत्थान द्यावें त्यासी ॥१॥

तेणें जोडे यज्ञ सर्व धर्म जाण । विन्मुख गेलिया पतन घडतसे ॥२॥

एका जनार्दनीं घडतां नमस्कार । तेणे हरिहर संतोषती ॥३॥

२८३४

देवातळींचें वस्त्र तें म्हणती अपवित्र । उदके भिजविलें तें जालें पवित्र ॥१॥

देवापरीस जळ सबळ केलें । ज्ञान तें दुर्बळ होऊनीं ठेलें ॥२॥

नीचाचेनी स्पर्शे देवो विटाळला । पाणीये प्रक्षाळुनी सोंवळा केला ॥३॥

एका जनार्दनीं साच नाहीं भाव । संशयची देव नाहीं केला ॥४॥

२८३५

कर्म धर्म ऐसा आहे । ब्रह्मी शोदूनियां पाहें ॥१॥

स्नान करावें ते कैसें । संध्या आपरुप असे ॥२॥

कैसा आहे ब्रह्मायज्ञ । मन अर्जवा तें नमन ॥३॥

एका जनार्दनीं भजे । कर्म धर्म सहज बुजे ॥४॥

२८३६

विचारीं पां धडफुडें । देह तंव केवळ जडमूढे । कर्मसंबधन तयाकडे । केवीं लागे ॥१॥

आत्मनीं न रिघे कर्म । कर्म केवळ श्रम । थिल्लरी जेवी सोम । चळी कांपे ॥२॥

देह जगत्व न लगे देहीं । अथवा न लगे आत्म्याच्या ठायीं । आतां कर्म तें मिथ्या पाहीं ॥३॥

भ्रमरुप वाढवितां कर्मठपण । ठकलें सज्ञान जन । एका जनार्दनीं कर्म भ्रमण । बोळवण रया ॥४॥

२८३७

कर्म केवळ देहाच्या माथां । आत्मा देही असोनि विदेहता । शेखीं म्हणती तत्त्वतां । कर्में बांधला आत्मा ॥१॥

आकाश जातां दळे । तैं कर्मीं ब्रह्मा आतळे । कर्म अकर्मा नातळे । परब्रह्मा रया ॥२॥

कर्माचें न कळे वर्म । तंव केवीं फळे परब्रह्मा । म्हणोनि न सोडीं श्रम । साधकासी ॥३॥

कर्माकर्म विवंचना । न कळे पैं सज्ञाना । एका शरण जनार्दना । परि तुझीच कल्पना रया ॥४॥

२८३८

कर्माच्या पोटीं भ्रम । कीं भ्रमाच्या पोटीं कर्म । हें दोहींचे न कळे वर्म । जाणत्यासी ॥१॥

घटीं उदक भरिलें । तेणें घटाकाश नव्हे बोले । कर्मीं ब्रह्मा संचलें । कर्मातीत ॥२॥

वाढवितां कर्मभ्रम । न कळे परब्रह्मा । मीमांसक धर्म । अनश्वर ॥३॥

कर्माची कर्मगती । न सोडी पुनरावृत्ति । निशेष कर्म निश्चिती । ब्रह्माप्राप्ती ॥४॥

निष्कर्म लभ्यते सिद्धी । हे कृष्णें उपदेशिलें कृपानिधी । तरी कर्माची कर्मबुद्धी । न सोडी आत्मा ॥५॥

कर्माचें निजकर्म । केवळ परब्रह्मा । एका जनार्दनीं मिथ्या । कर्मश्रम ॥६॥

२८३९

करूं जातां निजकर्म । कर्मक्रिया अति दुर्गम ॥१॥

कर्म केवळ देहाचे माथां । आत्मा देहीं विदेहता ॥२॥

कर्म अकर्माचें सांकडें । कांहीं न घेडी आत्म्याकडे ॥३॥

एका जनार्दनीं कर्म । देहांचे देहीं परब्रह्मा ॥४॥

२८४०

उदयो अस्तु मावळलें भान । कर्माकर्मीं सहज समाधान ॥१॥

कर्म तें गेलें करणें हारपलें । सहजीं पारुषले धर्माधर्म ॥२॥

उदयो अस्तुभान न देखे समाधान । अवघा जनार्दन जनीं वनीं ॥३॥

एका जनार्दनीं एकपणें कर्म । देहींच देह धर्म एकरूप ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel