३१७८
लक्ष चौर्यांयशीं फिरतां । अवचिता लाभ हातां ॥१॥
उत्तम पावला नरदेह । त्याचें सार कांहीं पाहे ॥२॥
नको श्रमूं विषयकामा । कांहीं तरी भजे रामा ॥३॥
मरणजन्मांच्या खेपा । निवारीं निवारीं रे बापा ॥४॥
एका जनार्दनीं गूज सोपें । रामनाम सदा जपे ॥५॥
३१७९
देह सांडावा न मांडावा । येणें परमार्थुची साधावा ॥१॥
जेणें देहीं वाढें भावो । देहीं दिसतसे देवो ॥२॥
ऐसें देहीं भजन घडे । त्रिगुणात्मक स्वयें उडे ॥३॥
त्रिगुणात्मक देहो वावो । एका जनार्दनीं धरा भावो ॥४॥
३१८०
देह ऐसें वोखटें । पृथ्वीमाजीं नाहीं कोठें ॥१॥
वोखटें म्हणोनि त्यागावें । मोक्ष सुखार्थ नागवावें ॥२॥
जैसें भाडियाचें घोडें । दिनु सरल्या पंथ मोडे ॥३॥
हेतु ठेवूनि परमार्था । एका जनार्दनीं ठेवीं माथा ॥४॥
३१८१
देह आहे तुम्हां आधीन । तोंवरी करा भजन ॥१॥
पडोनि जाईल शरीर । मग कराल विचार ॥२॥
यातना यमाची अपार । कोण तेथें सोडविणार ॥३॥
आला नाहीं अंगीं घाव । तंव भजा पंढरीराव ॥४॥
एका जनार्दनीं सांगे । वाउगे मागें नका जाऊं ॥५॥
३१८२
आलासी पाहुणा नरदेहीं जाणा । चुकवी बंधनापासूनियां ॥१॥
वाउगाची सोस न करीं सायासा । रामनाम सौरसा जप करीं ॥२॥
यज्ञायागादिका न घडती साधनें । न्युन पडतां सहज पतन जोडे ॥३॥
एका जनार्दनीं चुकवीं वेरझार । करीं तूं उच्चार अखंड वाचे ॥४॥
३१८३
काय मनुष्यदेहाचें होय । नाशिवंत जाय शेवटीं ॥१॥
हें तो काळाचें खाजें सहजी । कांहीं तरी राजी हरि करा ॥२॥
जाता आयुष्य न लगे वेळ । स्मरें घननीळ रामराणा ॥३॥
एका जनार्दनीं भाकी कींव । वायां हांव धरूं नका ॥४॥
३१८४
आयुष्य सरतां न लगे वेळ । यम काळ उभाची ॥१॥
म्हणोनियां लाहो करा । सप्रेम आळवावें ॥२॥
धरा संतासमागम । करा सप्रेम कीर्तन ॥३॥
जावें सुखें पंढरीसी । नाचा सरसें वाळुवंटीं ॥४॥
एका जनार्दनीं विठ्ठल भेटी । होतां लाभा नोहे तुटी ॥५॥
३१८५
काळाची ती ऐशी सत्ता । भरतां न पुरे एक क्षण ॥१॥
यांत कांहीं हित करा । राम स्मरा निशिदिनीं ॥२॥
नुमगे शेवट घडी येती । गुंतती तत्त्वतां देह आशा ॥३॥
शरण एका जनार्दनीं । करा सोडवणी देहाची ॥४॥
३१८६
काळें काय वायां जातु । तेणें होय आयुष्य अंतु ॥१।
जाणोनियां रक्षी कोण । सोडी देहाचा अभिमान ॥२॥
अभिमान सांडोनि झडकरी । एका जनार्दनीं दास्य करी ॥३॥
३१८७
अदृष्टी असेल जें जें वेळे । तें तें मिळेल तें तें काळें ॥१॥
ऐशी प्रारब्धाची गती । ब्रह्मादिकां न चुकतीं ॥२॥
जें जें होतें ज्या संचितीं । ते तयासवें चालती ॥३॥
जैशी जैशी कर्मरेषा । तैसें भोगणें सहसा ॥४॥
एका जनार्दनीं भोग । भोगविल्याविण न चुके सांग ॥५॥
३१८८
होणार जणार न चुके कल्पांतीं वाउगी । कुंथाकुंथी करुनी काय ॥१॥
लिहिलें संचितें न चुके कल्पांतीं । वाउगाचि भ्रांतीं फळ काय ॥२॥
एका जनार्दनीं प्रारब्धाचा भोग । करितां उद्वेग न टळेची ॥३॥
३१८९
नेणती ब्रह्मादिक ऐसें याचें कर्म । दृढादृढा वर्म सबळ मागे ॥१॥
न चुके न चुके भोगिल्यावांचुनीं । वायांचि तो मनीं शीण वाहे ॥२॥
एका जनार्दनीं शरण एकपणीं । गाय चक्रपाणी एकभावें ॥३॥
३१९०
प्रारब्ध क्रियमाण संचिताचा भोग । भोगिल्याची भोग तो न सुटे ॥१॥
ज्या जैसी कल्पना त्या तैशी भावना । अंती जे वासना जडोनी ठेली ॥२॥
एका जनार्दनीं वासना टाकुनी । हरीचे भजनी सावध होई ॥३॥
३१९१
स्वप्नीं चालतां लवलाही । आडामध्यें पडिला पाही ॥१॥
घाबरूनी म्हणे धांवा । तैसे भुलले जीवजीवा ॥२॥
मृगजळ भासे नीर । वायां मागें पसर ॥३॥
सावध होऊनि जंव पाहे । वायां स्वप्न मिथ्या आहे ॥४॥
एका जनार्दनीं भुलले । वायां गेले अधोगती ॥५॥
३१९२
आंबिया पाडुं लागला जाण । अंगीं असे आंबटपण ॥१॥
सेजे मुराल्याची गोडी । द्वैताविण ते चोखडी ॥२॥
टीकाळले सेजे घालिती । तयांसंगें दुजे नासती ॥३॥
अग्निपोटीं निपजे अन्न । वाफ न जिरतां परमान्न ॥४॥
एका जनार्दनीं गोडी । तोडा लिगाडीची बेडी ॥५॥
३१९३
मनासी खेचिलें मायेसी मोकलिलें । तें शस्त्र आपुलें सज्ज करी ॥१॥
यापरी सैरा होय कारणी । माया ममता दोन्हीं मारूनियां ॥२॥
जागृति स्वप्न निवटिलें पाहे । सुषुप्ति सळीयेली । सुखा धायें ॥३॥
एका जनार्दनीं मांडियेलें खळें । पुरेंचि जिंकलीं अंगीचेनी बळें ॥४॥
३१९४
जेथें पापपुण्यकर्माचरण । वाढविताहे जन्ममरण ॥१॥
जया पुण्याचीया गोडी । स्वधर्म जोडिताती जोडी ॥२॥
जय नाहीं हा विश्वास । असोनि न दिसे जगीं भाष ॥३॥
एका जनार्दनीं डोळा । असोनि देही तो अंधळा ॥४॥
३१९५
देहबुद्धी खुंटली येथें माया तुटली । देहाची स्थिती दैवाधीन ठेली ॥१॥
दैवाचेनी बळें देहींचे कर्म चळे । स्वसुखाचे सोहळे विदेह भावें ॥२॥
भोगी कां त्यांगी अथवा हो योगी । देहीं देहपण न लगे त्याच्या अंगीं ॥३॥
एका जनार्दनीं एकपणाच्या तुटी । सहज चैतन्यासी मिनला उठाउठी ॥४॥
३१९६
नरदेह परम पावन । तरी साधी ब्रह्माज्ञान ॥१॥
ब्रह्माज्ञानविण । वायां होत असे शीण ॥२॥
ब्रह्माज्ञान प्राप्ति नाहीं । वायां देहत्व असोनि देहीं ॥३॥
एका जनार्दनीं ज्ञान । तेणें होय समाधान ॥४॥
३१९७
नरदेहीं येउनीं करी स्वार्थ । मुख्य साधी परमार्थ ॥१॥
न होतां ब्रह्माज्ञान । श्वान सूकरां समान ॥२॥
पशुवत जिणें । वायां जेवीं लाजिरवाणें ॥३॥
सायं प्रातर्चिता । नाहीं पशुंसी सर्वथा ॥४॥
मरणा टेकलें कलीवर । परी न सांडी व्यापार ॥५॥
एका जनार्दनीं पामर । भोगिती अघोर यातना ॥६॥
३१९८
ब्रहमस्थितीचें हें वर्म । तुज दावितों सुगम ॥१॥
सर्वांभूतीं भगवद्भाव । अभेदत्वें आपणचि देव ॥२॥
संसार ब्रह्मास्फूर्ति । सांडोनियां अंहकृति ॥३॥
शरण एका जनार्दनीं । कृपें पावला परिपुर्ण ॥४॥
३१९९
लहानाहूनि लहान न धरी अभिमान । तेणें हो कारण सर्व बापा ॥१॥
उंचपणें पाहतां वेळुचीये परी । लोहाळा अंतरीं नम्र होये ॥२॥
भक्ति करतां मुक्ति संताचें संगतीं । मग मनीं विश्रांति हरी जोडे ॥३॥
एका जनार्दनीं संतांसी शरण । धरूनियां कान नाचूं द्वारीं ॥४॥
३२००
सानपणासाठीं गर्भवास सोसी जगजेठी ॥१॥
सानपण भलें सानपण भलें । सानपण भलें संतापायीं ॥२॥
एका जनार्दनीं सानपणावांचुनीं । कैवल्याचा धनी हातां नये ॥३॥