२८८७

मिथ्या भूतकाया मिथ्या भूतमाया । मिथ्या भूतछाया जेवीं वसे ॥१॥

मिथ्याभूत नाशिवंत जाण । मिथ्याभूत भान सर्व दिसे ॥२॥

मिथ्या भूत जन मिथ्या भूत वन । एका जनार्दन शरण वेगीं ॥३॥

२८८८

नाशिवंत धन नाशिवंत मान । नाशिवंत जाण काया सर्व ॥१॥

नाशिवंत देह नाशिवंत संसार । नाशिवंत विचार न करती ॥२॥

नाशिवंत स्त्रीपुत्रादिक बाळें । नाशिवंत बळें गळां पडती ॥३॥

एका जनार्दनीं सर्व नाशिवंत । एकचि शाश्वत हरिनाम ॥४॥

२८८९

नाशिवंत देह जाणार जाणार । हा तो निराधार स्वप्नत ॥१॥

अभ्रींची छाया क्षणिक साचार । तैसा हा प्रकार नाशिवंत ॥२॥

मृगजळाचें जीवन क्षणिक निर्धार । तैसा हा विचार व्यर्क्थ सर्व ॥३॥

एका जनार्दनीं नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी प्राणी करती ॥४॥

२८९०

रडती रांडापोरें नाशिवंतासाठीं । केवढी आटाआटी जीवीं होसी ॥१॥

कुडीसी मरण न कळेचि जाण । आत्मा अविनाश परिपूर्ण स्वयंज्योती ॥२॥

एका जनार्दनीं नाथिलाची भास । विठ्ठलनामें सौरस न घे कोणी ॥३॥

२८९१

भांबावले जन म्हणती माझें माझें । वाउगेंचि वोझें वाहताती ॥१॥

खराचिये परी उकरडा सेविती । नोहे तयां गती अधम जाणा ॥२॥

स्तंभ असोनियां चोर म्हणती आला । नसोनि प्रपंच खरा भासिला ॥३॥

मृगजळवत् जाणार सर्व । अभ्रीचें सावेव वायां जैसें ॥४॥

एका जनार्दनीं धरीका रे सोय । पुनरपि न ये गर्भवासा ॥५॥

२८९२

पांचा जाणाचें । आणिलें जयाचें । मिरवण तयाचें । कोण सुख ॥१॥

नवल विस्मयो कैसा । देखत देखत झांसा । मृगजळाची आशा । केवीं आहे ॥२॥

आतां नेती मग नेती । ज्याचें तें घेउनी जाती । मूढ जन म्हणती । माझें माझें ॥३॥

स्वप्नींचें निज भोज । कोल्हार मंडपीचें चोज । गंधर्व नगरीं राज्य । केवीं घडे ॥४॥

ऐसें जाणोनी अरे जना । भुललासि अज्ञाना । मी माझी कल्पना । करसी वायां ॥५॥

एका जनार्दनीं हरीं । व्यापक तो चराचरीं । तोची एक निर्धारी । वाउगे येर ॥६॥

२८९३

फुले झडे तंव फळ सोसे । तया पाठीं तेंहीं नासे ॥१॥

एक मागें एक पुढें । मरण विसरलें बापुडें ॥२॥

शेजारीं निमाले कोणाचे खांदी । लपों गेला सापें खादली मांदी ॥३॥

मरण ऐकतां परता पळे । पळे तोही मसणीं जळे ॥४॥

प्रेत देखोनी वोझाच्या जाती । वोझें म्हणती तेही मरती ॥५॥

मरण म्हणतां थूं थूं म्हणती । थुंकते तोंडें मसणीं जळती ॥६॥

पळेना चळे तोचि सांपडें । जाणतां होताती वेडे ॥७॥

एका जनार्दनीं शरण । काळवेळ तेथें रिगे मरण ॥८॥

२८९४

त्रिगुणात्मक देह पंचभुतीं खेळ । शेवटीं निर्फळ होईल रया ॥१॥

दिसती भूताकृति वाउगी ते मिथ्या । शेवटीं तत्त्वतां कांहीं नुरे ॥२॥

पंचभुतें विरती ठायींचे ठायीं । वाया देहादेहीं बद्धमुक्त ॥३॥

एका जनार्दनीं नाथीलाची खेळ । अवघा मायाजाळ जाईल लया ॥४॥

२८९५

गर्भवासीचें दुःख सांगतां आटक । मलमुत्र दाथरीं जननीं जठरीं अधोमुख ॥१॥

शिव शिव सोहं सोहं । कोहं कोहं सांडुई पाहे निज जीवन ॥२॥

गर्भवासीचें सांकडे सांगावें कवणापुढे । सर्वांगी विष्टालेपु नाकीं तोंडीं किडे ॥३॥

एका जनार्दनीं भेटी तैं जन्ममरणा तुटी । जननी पयपान पुढती न करणें गोष्टी ॥४॥

२८९६

उगम संगम प्रवास गती । ऐसी त्रिविध देहस्थिती ॥१॥

बाळत्व तारुण्य वृद्धत्व । ऐसें देहाचें विविधत्व ॥२॥

जरामरण नाश पावे । ऐसा देह व्यर्थ जाये ॥३॥

ऐसियाचा भरंवसा । एका जनार्दनीं ठसा ॥४॥

२८९७

एक एक योनी कोटी कोटी फेरा । नरदेह थारा अवचटा ॥१॥

मांडिलासे खेळ मांडिलासे खेळ । मांडियेला खेळ नरदेहीं ॥२॥

स्त्री पुत्र नातु बाहुले असती । नाचवितो पती त्रैलोक्याचा ॥३॥

एका जनार्दनीं मांडियेला खेळ । त्रैलोक्य सकळ बाहुलें त्याचें ॥४॥

२८९८

चौर्‍यांयशी लक्ष योनी फिरतां । अवचट नरदेह आला होतां ॥१॥

करीं याचें समाधान । वाचे गाई नारायण ॥२॥

सोडविता तुज कोणी । नाहीं नाहीं त्रिभुवनीं ॥३॥

भुलुं नको जासी वायां । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥

२८९९

कोटी कोटी फेरे घेऊनि आलासी अद्यापि पडसी गर्तैं रया ॥१॥

कोण तुज सोडी कोण तुज सोडी । पडेल जेव्हा बेडी पायीं रया ॥२॥

हाणिती मारिती निष्ठुर ते दूत । विचकुनियां दांत पडसी रया ॥३॥

एका जनार्दनीं मागील आठव । कांहीं तरी भेव धरी रया ॥४॥

२९००

ऐसे वेरझारी कोटी कोटी फेरा । वरी त्या पामरा समजेना ॥१॥

माझें माझें म्हणोनि झोंबतसे बळें । केलेंसे वाटोळें नरदेहा ॥२॥

फजितीचा जन्म मरावें जन्मावें । हें किती सांगावें मूढ जना ॥३॥

एका जनार्दनीं माझें माहें टाकुनीं । वैष्णव कीर्तनीं नाचे सुखें ॥४॥

२९०१

किती किती जन्म किती किती फेरे । किती किती अघोरें भोगिताती ॥१॥

न सुटे न सुटे न सुटे बंधन । याची आठवण धरा चित्तीं ॥२॥

किती किती विषय भोगिती वासना । यमाचे सदना जावयासी ॥३॥

एका जनार्दनीं न करी विचार । नरक तो अघोर भोगिताती ॥४॥

२९०२

इकडुनी तिकडे चालू जैसें माप । तैशी जन्ममरण खेप प्राणियांसी ॥१॥

भोगितां नूतन सांडिती ते जाण । तैसें जन्ममरण प्राणियांसी ॥२॥

पुष्पाचा परिमळ घेऊनी सांडिती जाण । तिसें जन्ममरण प्राणियांसी ॥३॥

देह धरूनी आला न करा स्वहित । करी अपघात आपणासी ॥४॥

एका जनार्दनीं दोषी तोचि जाणा । न भजे चरणा संताचिया ॥५॥

२९०३

मरणापाठीं जन्म जन्मापाठीं मरण । ही शिदोरी जाण पडती पदरीं ॥१॥

शतवर्ष कराल घेतां वाते गोड । कर्माकर्म सुघड न कळे कांहीं ॥२॥

मरणाची भ्रान्ती विसरुनी गूढ । वागवी काबाडे प्रपंचाचें ॥३॥

बाळ तरुणदशा वृद्धाप्य पावला । सवेंचि तो गेला अधोगती ॥४॥

एका जनार्दनीं मापाचिये परी । सवेंचि गोणी भरी सवें रिती ॥५॥

२९०४

माझें माझें म्हणोनि करितोसी कष्ट । उडाला तो हंस राहिलें फलकट ॥१॥

तनांचें बुजवणें तैशी देहस्थिती । चित्ता अग्नि उजळोनि मिळे मातीसी माती ॥२॥

स्वजन स्वगोत्र सारे करती विचार । काढा काढा म्हणती जाला भूमीभार ॥३॥

देहाची जनकें केवळ मातापिता । गेला गेला म्हणती तोचि देह असतां ॥४॥

अष्टही प्रहर भोगी देह गेह वित्त । सेजेची भार्या पळे म्हणे भुतभूत ॥५॥

यापरी जाणोनी सांडी देहाची खंती । एका जनार्दनीं राहिला विदेह स्थिती ॥६॥

२९०५

आयुष्य भविष्य हें तंव कवणा हातीं । वायांची वाहती कुंथाकुंथी ॥१॥

आयुष्याचा अंत आलिया जवळी । कोण तया वेळीं सांभळीत ॥२॥

गुंतुनीं संसारी पडती अघोरीं । न चुकेची फेरी येतां जातां ॥३॥

एका जनार्दनीं संतकृपेंविण । कोण वारी शीण जन्मामृत्यु ॥४॥

२९०६

नरदेहीं आयुष्य शत तें प्रमाण । अर्ध रात्र जाण जाय मध्यें ॥१॥

बाळत्व तारुण्य जरामय जाया । संपलें गणना होती त्याची ॥२॥

एका जनार्दनीं राहिलें भजन । सवेंचि मरण पावला वेगीं ॥३॥

२९०७

शत वरुषांची घेउनी आला चिठ्ठी । अर्ध रात्रीं खादलें उठाउठीं ॥१॥

केव्हां जपसील रामनाम वाचें । आयुष्य सरलीया पडतील यमफांसे ॥२॥

अज्ञानत्व गेलें वरुषें बारा । खेळतसे विटीदांडु भोंवरा ॥३॥

उपरी तारुण्य मदाचा ताठा । करी बैसोनि विषयाच्या चेष्टा ॥४॥

ऐशीं पन्नास वर्षे गेलीं भरोवरीं । एका जनार्दनीं पडला चौर्‍यांयशींचे फेरी ॥५॥

२९०८

शत वर्षाचा कउल घेउनी । आलासी योनी नरदेहा ॥१॥

गर्भ जठरीं सोहं सोहम् । जन्मतांची म्हणसी कोहं कोहम् ॥२॥

ऐसा ठकरा पापिष्ठा । पुढे कारिसी विषयचेष्टा ॥३॥

बाल तारूण्य गेलें । पुढें वृद्धाप्य वयही आलें ॥४॥

नाहें घडलें कीर्तन । तों पुढें आलें मरण ॥५॥

घेउनी जाती यमदुत । कुंभपाकीं तुज घालीत ॥६॥

नाना यातना ते करती । अग्निस्तंभा भेटविती ॥७॥

तेथें कोण सोडी तुज । आतां म्हणसी माझें माझें ॥८॥

ऐसा भुलला गव्हार । भोगी चौर्‍यांशीचा फेर ॥९॥

फेरे फिरूनी नरदेहीं आला । एका जनार्दनीं वायां गेला ॥१०॥

२९०९

येती नरदेहा गमाविती आयुष्य । प्रथम बाळदशेस । भोगिताती ॥१॥

वाचा नाहीं तया रडे आक्रंदोनी । जननीं तों स्तंनीं लावी बळें ॥२॥

क्षुधा लागलीया औषध पाजिती । उदर दुखतां देती स्तन बळें ॥३॥

संपता द्वादशा जालासे शहाणा । करुनी अंगना वेगीं देती ॥४॥

विषयाचे बळें मातलासे सर्व । सदा धुस् दर्प अंगीं वसे ॥५॥

सरलीया तारुण्य आला वृद्ध दशे । भोगितसे क्लेश नाना व्याधी ॥६॥

रामनाम वाचें सदा आठवणी नाहीं । धन दारा पुत्र पाही माझें माझें ॥७॥

शेवटील घडी परिपुर्ण भरली । माती जड झाली पापिष्ठाची ॥८॥

येउनी यमदूत नेताती बांधुन । नानापरी ताडन करिताती ॥९॥

यातना ती सर्व भोगुनी ढकलिती । पुनरपि येती गर्भवासा ॥१०॥

चौर्‍यांयशी लक्षा योनी फिरतां फिरतां । एका जनार्दनीं तत्त्वतां नरदेह ॥११॥

२९१०

जंव देहातें देखती तंव माझें म्हणती । निमालीया रांडा पोरें रडतीं ॥१॥

पहा कैसा अनुभव लौकिकाचा । देह निमाला कीं न कळे साचा ॥२॥

जीव आत्मा न मरे कोणे काळीं । निमाला देह चतुष्टयाची होळी ॥३॥

एका जनार्दनीं देहा देखती मरण । गेला आला नाहीं तो तैसाचि जाण ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel