‘होय, हे बरोबर आहे. हया दुसर्‍याची चौकशी करू या. सारी कृष्णकृत्ये बाहेर येऊ देत. त्यांचे इतर साथीदार कोण आहे हेही कळेल. त्यांचाही नायनाट करता येईल. असे लोक म्हणू लागले. हे दुसरे प्रधान कोठे पळून जाऊ नयेत म्हणून त्यांना तुरुंगात ठेवण्यात यावे व न्यायधिशांनी त्यांची चौकशी लवकर करावी अशाही मागण्या लोकांनी सभांतून केल्या.

त्या दुसर्‍या प्रधानास तुरुंगात ठेवण्यात आले. स्वदेशातील ही सारी घडामोड राजाला कळविण्यात आली. केव्हा येणार राजा? राजा येण्याच्या आतच पुन्हा जनता खवळणार तर नाही ना? खवळली तर हया प्रधानास कसे वाचविता येणार?

तो दुर्दैवी प्रधान तुरुंगाच्या कोठडीत होता. इतक्यात कोणी तरी तेथे आले. कोण होते ते? समजावयाला मार्ग नव्हता. त्या व्यक्तिच्या तोंडावरुन बुरखा होता. त्या अज्ञात व्यक्तीने  त्या प्रधानाच्या हातात चिठ्ठी दिली. काय होते त्या चिठ्ठीत?

‘आज रात्री आठ वाजता तुरुंगाच्या दाराबाहेर घोडयाची गाडी असेल. तीत तुम्ही बसा व शहराच्या दक्षिण दरवाजाकडे जा. तुम्ही तेथे पोचताच दरवाजा उघडला जाईल. आपण त्याच गाडीतून देशाबाहेर निघून जाऊ’. तो प्रधान विचार करू लागला. घोडयाच्या गाडीतून जाणे धोक्याचे होते. कोणी गाडी थांबवली तर? कोणाला संशय आला तर? पंतु प्राण वाचविण्याचा हाच एक मार्ग होता. आलेली संधी घ्यावी. पुढचे कोणाला कळणार?

तो प्रधान रात्र केव्हा होते व आठ केव्हा वाजतात हयाची वाट पाहात होता. शेवटी एकदाचे आठ वाजले. कोणी तरी कोठडीजवळ आले. प्रधानाला त्या अज्ञान व्यक्तीने तुंरुगाबाहेर नेले. तेथे पडदे सोडलेली गाडी होती. प्रधान तीत बसला. गाडी भरधाव निघाली. रात्रीची आठ-साडेआठची वेळ. रस्ते गजबजलेले होते; परंतु त्या गर्दीतून ही गाडी वेगाने जात होती. गाडी दक्षिणेकडच्या दरवाजाकडे वळली. तिकडे गर्दी कमी होती. रहदारी कमी होती. गाडी दरवाजाजवळ येऊन थांबली; परंतु दरवाजा बंद. तेथील पहारेकरी दरवाजा उघडीना.

‘अरे, दरवाजा लवकर उघड-’ गाडीवान म्हणाला.

‘तसा हुकूम नाही.’ पहारेकरी म्हणाला.

‘हुकूम नाही?’ गाडीतून प्रधानाने विचारले.

‘नाही. कोण आहे गाडीत?’ पहारेकर्‍याने प्रश्न केला.

‘त्याची तुला उठाठेव नको. आधी दरवाजा उघड. प्रत्येक क्षण मोलाचा जात आहे. देशाचे काम आहे.’ गाडीवान म्हणाला.

‘काही तरी फितुरी दिसते. कोण आहे गाडीत? मी दरवाजा उघडणार नाही,’ पहारेकरी जोराने म्हणाला.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel