कळी रोज त्या फुलझाडाची सारी हकिगत सांगे. नवीन पान फुटले, नवीन धुमारा आला, सारे सांगे. ती हकीगत ऐकून फुलाला अतोनात आनंद होई. एके दिवशी कळी म्हणाली, ‘एक लहानशी कळी आली आहे!’

‘कळी आली? छान. कळीच्या हाताचा गुण. कळीनं कळी आणली. आता ती फुलेल. तिच्या पाकळयांवर सोनेरी छटा दिसतील. प्रयोग यशस्वी होईल.’ फुला नाचत म्हणाला.

त्या दिवशी कळी मोठया उत्सुकतेने भेटण्यास आली होती. झाडावरची कळी अर्धवट फुलली होती. सोनेरी छटा दिसत होत्या. केव्हा एकदा ही बातमी देऊ असे तिला झाले होते.

‘कळये, तुझे तोंड आज फुलले आहे.’ फुला म्हणाला.

‘कारण कुंडीतील कळी फुलणार आहे, आज रात्री ती फुलेल. पूर्णपणे फुलेले. आत अर्धवट फुलली आहे. सोनेरी छटा दिसत आहेत. निळया ढगांवर सोनेरी किरण तशी ती कळी दिसत आहे.’

‘छान छान. माझा प्रयोग यशस्वी झाला. कळये, किती तू चांगली; किती हुशार. आता असं कर. ती कुंडी घोडयाच्या गाडीत घाल व घेऊन जा. त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी ने. ती तारीख जवळच आहे; हे फूल फुलंलं तरी दोन महिने कोमेजणार नाही. तू आपली रोजनिशी बरोबर ने. शास्त्रज्ञ विचारतील त्यांच्या हातात रोजनिशी दे.

‘परंतु बाबा कसे जाऊ देतील?’

‘त्यांना विचारू नकोस. माझ्याकडे येत होतीस ती का त्यांना विचारून? तू पाप थोडेच करीत आहेस?

‘बरे मी जाईन.’

‘परंतु कुंडी नेण्यापूर्वी मला दाखवशील का?’

‘दाखवीन. शिपाई माझे ऐकतील. रात्री बारानंतर घेऊन येईन. देईन कोणाच्या डोक्यावर. रात्री आणीन हो. जाते मी.’

तो पाहुणा सारे ऐकत होता. ‘आज रात्री फुलणार का?’ ठीक.’ असे म्हणत तो पटकन निघून गेला.
मध्यरात्र झाली. गस्तवाले गस्त घालीत होते. बाराचे ठोके पडले. ‘ऑल बेल बराबर है.’ अशा आरोळया तुरुंगाच्या सर्व भागांतून झाल्या. ढब्बूसाहेब झोपले होते; परंतु कळी उठली. तिने दोन शिपाई व दोन वॉर्डर बरोबर घेतले. तिने खोली उघडली. त्या दोन वॉर्डरांनी ती कुंडी धरली. शिपायांच्या हातात कंदील होते. फुला दारात उभा होता. ती कुंडी गजांबाहेर ठेवण्यात आली. सुंदर फूल फुलले होते. कृष्णवर्ण पाकळयांवर सोनेरी छटा फुला पाहात राहिला. त्याने बाहेर हात लांबविले. त्या फुलाला त्याची बोटे लागली. ते फूल नाचू लागले. ते वारा आला म्हणून नाचले. का त्या बोटांतील भावनामय स्पर्शाने नाचले?

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel