‘मला देता हे पुस्तक? मरणालाही आनंदाने मिठी मारावयास शिकविणारे पुस्तक देता मला?’
‘घ्या हे पुस्तक. मरणार्याची जगणार्याला भेट.’
‘ही घ्या दोन फुले. हसत मरणार्याची मला पूजा करू दे.’
इतक्यात ढब्बूसाहेब तेथे आले. ते क्रोधाने लाल झाले होते. ते थरथरत होते. फाशी जाणार्या माणसाची खोली उघडी होती. भयंकर अपराध. तो कैदी पळून गेला तर? नोकरी जावयाची. जन्माचे वाटोळे व्हावयाचे. कदाचित् शिक्षाही व्हावयाची. आपणाच कैद्याला फरारी होण्यास साहाय्य केले असा आरोप यावयाचा. स्वत:च फाशी जावयाची पाळी यावयाची.
‘कळये, तू येथे कशाला आलीस? कैदी पळाला तर?’
‘बाबा. हा पळून जाणारा कैदी नाही. मरणाला न डरणारा हा महात्मा आहे.’
‘काय रे, मरण समोर आहे तरी मुलीजवळ गप्पा मारतोस? तुला लाज नाही वाटत? देवाचे नाव घेण्याऐवजी मुलीजवळ बोलत बसतोस? हरामखोर, निर्लज्ज आहे. पक्का बेरड आहे. मरता-मरता फुलपाखरासारखा हसतो खेळतो आहे. बदमाष।’ असे म्हणून फाशी जाणार्या त्या फुलाला मारण्यासाठी हात उगारुन ढब्बुसाहेब धावले; परंतु तेथे भिंतीत एक लांब खिळा होता. तो खिळा ढब्बूसाहेबांच्या डोक्याला एकदम लागला. ते खाली पडले. भयंकर जखम झाली. भळाभळा रक्त वाहात होते. शिपाई धावला. कळी घाबरली. फाशी जाणार्या कैद्याने आपला रूमाल फाडला व पट्टी बांधली आपल्या मडक्यातील पाणी त्यांच्या डोक्यावर तो ओतीत होता. साहेबांनी डोळे उघडले.
‘फाशी जाणार्याचा मला स्पर्श? दूर हो!’ पुन्हा साहेब ओरडले.
‘बाबा, त्यांनी तुमची जखम बांधली. डोक्यावर थंड पाण्याची धार धरली. तुम्ही त्यांना मारायला धावलेत, परंतु त्यांनी तुम्हाला प्रेम दिले. अशांना आणखी शिव्या का द्यायच्या? चला बाबा, मी हात धरून तुम्हाला नेते, उठा-’ कळी म्हणाली.
कैद्याकडे बघत व पित्याला धरून काळी निघून गेली. फुला तिच्याकडे बघत होता. ती दिसेनाशी झाली. फुलाने आजपर्यंत लाखो काळया फुलविल्या होत्या. त्यांच्यावर त्याने प्रेमाने प्रयोग केले होते. त्या कळयांचे रंग त्याने अधिक खुलविले होते. त्यांच्या गंधात भर घातली होती. कळयांचे आकार त्याने बदलले. त्यांच्या पाकळया मोठया केल्या; परंतु अशी काळी त्याला कधी भेटली नव्हती. अशी कळी त्याने कधी फुलविली नव्हती.
ही कळी अजून फुलली नव्हती. हया कळीच्या जीवनात किती तरी रंग ओतता आले असते. गंध भरता आले असते. हया कळीला जर शिक्षण दिले तर? हया कळीने सुंदर विचार ऐकले तर? हया कळीला निर्मळ व प्रेमळ सहवास घडला तर? मी जगलो असतो, तर हया मानवी कळीवर प्रयोग केले असते. तुरूंगात राहून प्रयोग केले असते.