अद्याप कोंबडा आरवला नव्हता. कोण येत आहे ते काळोखातून? मधुरी. ती मधुरी आहे. ती हळूच घरात शिरली. तिने कडी लावली. डोक्यावरुन पांघरूण घेऊन ती निजली, परंतु तिला झोप आली का!
भोंगा झाला. भाऊ उठला. आई घोरत होती. आईला आज झोप लागली आहे हे पाहून भावाला बरे वाटले. त्याने प्रातर्विधी केले. स्नान करून तो कामाला गेला. आता चांगलेच उजाडले. घरात उन्हे आली. मधुरीलाही झोप लागली होती; परंतु ती जागी झाली. ती उठली. आई अद्याप अंथरूणातच होती; परंतु आता घोरण बंद होते. मधुरीने तोंडंबिड धुतले. ती आईजवळ गेली. आईचा हात तिने हातात घेतला. तो तिला थंडगार लागला. मधुरी घाबरली. आई, आई तिने हाका मारल्या. आईला शुध्द ना बुध्द. सारी हालचाल थांबली होती. आई का मेली? तो विचार मधुरीच्या मनात आला. ती दचकली. तिने किंकाळी फोडली. शेजारचे लोक आले.
‘मेली म्हातारी. मिटला खोकला,’ ते म्हणाले.
‘आता आम्हाला झोप येत जाईल. म्हातारीचा खोकला सार्या आळीला झोपू देत नसे. देवाला दया आली.’ एक दुष्ट म्हणाला.
‘मधुरीची आता मजा आहे.’ कोणी तरी हसून बोलले.
मधुरीची आईची सारी क्रिया झाली. भाऊ व बहीण दोघे राहिली. एके दिवशी मधुरीची भाऊ कामावरुन येत होता. इतर कामागारांजवळ त्याचा वाद चालला होता.
‘अरे जा, माहीत आहे. घरोघर मातीच्याच चुली.’
‘घरोघर असतील; परंतु माझे घर अपवाद आहे. माझी बहीण तशी नाही. ती धुतल्या तांदळासारखी आहे.’
‘तू घरी नसतोस तिचे थेर पाहायला. तू कामावर असतोस व ती प्रियकराला मिठया मारीत असते. घरी आता आईचीही अडचण नाही.’
‘तोंड सांभाळून बोल, माझ्या बहिणीची अब्रू-तिचे का धिंडवडे मांडले आहेस?’
‘तुझ्या बहिणीची मात्र अब्रू. इतर मायबहिणींवर टीका करतोस तेव्हा रे? तेव्हा कसे तोंड चुरचुर चालते तुझे?’
असे भांडत ते जात होते. इतक्यात सैतान व माधव तिकडून आले. बाहेर काळोख पडला होता. मधुरीचे घर जवळ होते. सैतान माधवला म्हणाला. ‘हाच तिचा भाऊ मार सोटा. काढ काटा, हाण.’