‘बरे. तुम्ही सांगता तसे मी उद्या करीन.’
दुसर्या दिवशी कळी उजाडत बागेत गेली. हलक्या हातांनी ती खणीत होती; परंतु चुकून घाव मुळावर पडला. ती कोवळी मुळे तुटली, झाड मेले. ते कसे जगणार? ती रडू लागली. तिने वर पाहिले. ते डोळे तिच्याकडे बघत होते. ‘रडू नको’ अशी त्याने खूण केली.
तो मुशाफिर हिंडत तेथे आला, तो ते झाड नाही. आपल्यावर कोणाची तरी पाळत आहे अशी त्याला शंका आली. त्याने वर पाहिले, तो गजांतून फुला क्रोधाने त्याच्याकडे बघत होता. फुलाला पाहाताच पाहुणा काळवंडला. तो एकदम बगीच्यातून निघून गेला.
कळीच्या हालचालींवर तो पाहुणा पाळत ठेवू लागला. दुपारी कळी फुलाच्या खोलीकडे चालली. पाठोपाठ हळूच तो पाहुणा गेला. तो जिन्यात लपून त्यांचे बोलणे ऐकत होता.
‘मुळे तुटली. मला किती वाईट वाटले-’ कळी सांगत होती.
‘जाऊ दे. आता शेवटचा प्रयोग करू. हा तिसरा तुकडा घे. हा शेवटचा तुकडा. तुझ्या खोलीतच एका मोठया कुंडीत हा लाव. खिडक्यांना मी सांगेन त्या रंगाचे पडदे लाव. तसा-तसा प्रकाश झाडाला मिळू दे. झाड कसे-कसे वाढते, कधी खत घातले, प्रकाश-किरण कसे-कसे दिले, ते सारे रोजनिशीत लिहित जा. मी तुरूंगात असलो तरी ज्ञान जगाला कळू दे. ती रोजनिशी तू मग प्रसिध्द कर, अर्थात जर प्रयोग यशस्वी झाला तर, निळया रंगावर सोनेरी छटा उमटल्या तर आणि कळये, खोली कधी-कधी उघडी टाकू नकोस. कुलूप लावून बाहेर जात जा प्रयोग कस-कसा होत आहे ते मला सांगत जा! समजलीस ना?
‘हो. तुमच्यासाठी सारे करीन. तुमचा आनंद तो माझा.’
ती निघाली. तो पाहुणा पटकन् निघून गेला. कळीने सांगितल्याप्रमाणे सारे केले. तिने कुंडीत तो तुकडा लावला. एका मोठया घडवंचीवर ती कुंडी तिने ठेवली. खिडक्यांना तांबडे, हिरवे, निळे असे पडदे करण्यात आले. निरनिराळया वेळी निरनिराळया रंगाचा प्रकाश खोलीत पडे. खोलीला तिने एक भक्कम कुलूप केले. बाहेर जाताना ते ती लावी.
त्या पाहुण्याने त्यांचे सारे बोलणे ऐकले होते, त्याने एके दिवशी त्या कुलपाच्या तोंडाचा मेणावर ठसा घेतला. त्या तोंडाच्या आकाराची किल्ली त्याने घडवून घेतली. ती किल्ली त्या कुलपाला लागेल की नाही ते त्याने पाहिले. किल्ली लागली. कुलूप उघडले. आतील कुंडी पाहुण्याने पाहिली. ‘फुलू दे ते फूल. ते पळविल्याशिवाय मी राहाणार नाही. ते लाखाचे बक्षीस मी उपटीन. हा गब्रू मग गबर होईल. माझी किर्ती जगभर जाईल. हा बसेल येथे तुरुंगात रडत.’ असे पाहुणा म्हणला. तो पाहुणा म्हणला का तो गब्रू? हो. अजून नाही का तुमच्या ध्यानात आले?