फुलाला फाशीची शिक्षा
एके दिवशी फुला नित्याप्रमाणे आपल्या प्रयोगालयात काम करीत होता. इतक्यात गावात टापटाप असे घेडयांचे आवाज घुमू लागले. एक, दोन, तीन-किती हे घोडेस्वार! खंद्या घोडयावर शिपाई बसलेले होते. त्यांच्याजवळ शस्त्रास्त्रे होती. ते धिप्पाड होते. क्रूर दिसत होते. गावातील लोक घाबरले. घरांच्या दारांतून ते डोकावून बघत होते. का आले हे घोडेस्वार? काय पाहिजे त्यांना?

घोडेस्वारांनी फुलाच्या घराला गराडा दिला. काही बाहेर उभे राहिले. काही घोडयांवरून उतरून घरात घुसले. घरात आत्याबाई काम करीत होती. ते शिपाई धाडधाड जिना चढून वर जाऊ लागले.

‘अरे, काय पाहिजे तुम्हाला? मला सांगा. त्याच्या प्रयोगात नका त्रास देऊ. तो रागावेल हो. अरे, वर कोठे चाललेत? असे ताडताड काय जाता?’ ती म्हातारी आत्या बोलू लागली.

‘ए बुढ्ढये, गप्प बस त्या कोपर्‍यात. त्या कोपर्‍यातून हाललीस तर बघ. वटवट बंद कर.’ एक घोडेस्वार म्हणाला.

ते घोडेस्वार वर गेले. ते काचेच्या घरात गेले. त्यांच्या बुटांच्या जोरदार पावलांनी त्या काचा हादरल्या, थरथरल्या. फुला प्रयोगात तन्मय झाला होता. एकदम सभोवती त्याला छाया दिसल्या. त्याने वर पाहिले, तो क्रूर शिपाई उभे.
‘काय पाहिजे तुम्हाला?’ त्याने शांतपणे विचारले.

‘मोठा साळसूद. त्या देशद्रोही प्रधानांचे कागदपत्र तुझ्याजवळ आहेत की नाहीत? बर्‍या बोलाने सांग. ते कागदपत्र दे. ऊठ, तो मुख्य म्हणाला.

‘कोण देशद्रोही प्रधान?’ फुलाने प्रश्न केला.

‘ज्यांच्यावर विश्वास टाकून राजा प्रवासास गेला ते. ते प्रधानही दुनियेतून नष्ट झाले. जनतेने न्याय दिला. आता त्या प्रधानांच्या साथीदारांची वेळ आली आहे. तू फुले फुलवणारा असलास तरी काटा आहेस. काटे नष्ट केले पाहिजेत नाही तर केव्हा बोचतील हयाचा नेम नाही. ऊठ, ते कागद आधी दे.’ फुलाचा हात ओढून तो मुख्य म्हणाला.

‘कागदपत्र?’

‘हो. कागदपत्र.’

‘माझ्याजवळ कसले आहेत कागदपत्र? माझ्या घरात फुलांची पुस्तके आहेत. फुलांची मासिके आहेत. तपासा सारे घर. फुलांचे राजकारण मला माहीत. दुसरे राजकारण मला माहीत नाही.’

‘खाली चल. सारे उघडून दाखव.’

सारी मंडळी खाली गेली फुलाने त्यांच्यासमोर किल्ल्या टाकल्या. शिपाई सारे धुंडाळू लागले. टेबलाचे खण तपासून लागले. टेबलाच्या खणांत निरनिराळया प्रकारची बिले होती; परंतु एक खण जोराने ओढला गेला. तो सारा बाहेर आला. त्या खणात पुढे बियांच्या पुडया होत्या; परंतु पाठीमागे एक पुडके होते. कागदपत्रांचे पुडके!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel