आता काय करणार? गाडीवानाने गाडी वळविली. पुन्हा वेगाने हाकली; परंतु, ‘दगा, फितुरी, पकडा, अडवा गाडी!’ असे तो पहारेकरी ओरडून म्हणाला. रस्त्यातील लोकांनी ते शब्द ऐकले. एका क्षणात ते शब्द शहरभर पसरले. जनता खवळली. लाखो लोकांचे थवे जमा झाले. गाडी गर्दीतून वेगाने जाईना. लोकांनी घोडे धरले. गाडी थांबली.
‘कोण आहे गाडीत?’ लोक ओरडले.
‘अहो, विचारता काय? काढा ते पडदे-’ कोणी म्हणाले. गाडीचे पडदे ओढण्यात आले. तो आत तो दुर्दैवी प्रधान!
‘अरे देशद्रोही प्रधान! पळून जात होता. ओढा त्याला. ठेचा. हाणा. मारा. तुकडे करा. पळून जात होता. पापाला पळून जाता येत नाही. भरली त्याची घटका. भरला पापांचा पेला. मोठे देशभक्त! खरा असता तर पळू बघता ना. ओढा त्याला, खेचा.’
त्या प्रधानाला हाल-हाल करून मारण्यात आले. त्याच्या शरीराचा लहानसा तुकडाही कोठे सापडला नाही. तुकडयांचे तुकडे, तुकडयांचे तुकडे केले गेले. प्रत्येकाला सूड घेण्याची इच्छा होती. लोकांची माणुसकी मेली होती. क्रोधाने, सूडबुध्दीने माणसाचा पशू होतो. पशूही बरा. कारण त्याला फार बुध्दी नसते; परंतु बुध्दिमान मनुष्य पशू झाला तर फारच भयंकर ती गोष्ट. दुनियेला तो शाप असतो.
तो प्रधान, तो गाडीवान, ते घोडे सर्वांचा फन्ना उडाला. त्या गाडीला आग लावण्यात आली. राक्षसी आनंदाने लोक नाचू गर्जू लागले.
‘दोन्ही काटे निघाले.’
‘परंतु त्यांचे साथीदार आता शोधले पाहिजेत.’
‘बीमोड केला पाहिजे.’
‘तरच नवीन राजा सुखी होईल. नव्या राजाचा जयजयकार असो!’