‘हे बघ कागदपत्र! पुढे बियांच्या पुडया ठेवून पाठीमागे दडवून ठेवले होतेस; परंतु सत्य बाहेर येते. पकडा हया हरामखोराला. बांधा मुसक्या, बांधा घोडयावर व घेऊन चला.’ तो प्रमुख गर्जला.
‘हे कागद मी विसरूनच गेलो होतो. त्या माझ्या मित्रांनी हे दिले होते. हे कागद जाळून टाक म्हणून त्यांनी सांगितले होते; परंतु मी विसरलो. फुलांच्या नादात राहिलो-’ फुला म्हणाला.
‘आपल्याच तोंडाने सांगतो आहे सारं. मूर्ख आहे बेटा. बघता काय, बांधा त्याला-’ तो शिपायांना म्हणाला.
‘जरा थांबा. मी वरून येतो. मग पकडा. माझे मित्र दुनियेतून गेले असतील तर मी तरी कशाला जगू? फुला म्हणाला.
‘जा, वरून ये.’ प्रमुख म्हणाला.
फुला वर गेला. त्या नवीन प्रयोगाची तीन कलमे त्याने आपल्या लांब कोटाच्या खिशात घातली. एका कुंडीतील थोडे अंकुरलेले रोपटे त्याने कागदात गुंडाळून घेतले. तो आपला ठेवा, तो प्रयोग घेऊन फुला खाली आला. शिपयांनी त्याच्या दंडाला दोर्या बांधल्या. ते सारे घोडेस्वार खाली आले.
‘अरे, त्याला कोठे नेता? मारू नका त्याला. फुलांसारखा गोड आहे तो. म्हातारीचा आधार आहे तो. अरे, नका नेऊ-’ म्हातारी आत्याबाई ओरडत रडत बाहेर आली.
‘गप्प बस थेरडये, का जीभ छाटू?’ एक उग्र घोडेस्वार म्हणाला.
‘आत्याबाई, घरात जा. देव सारे चांगले करील. माझी फुले फुलव. बागेतील फुलांना सांभाळ. त्या फुलांत मी आहे. त्या फुलांमध्ये मला बघ-’ फुला आत्याला म्हणाला.
फुलाला घोडयावर बांधण्यात आले. ते घोडेस्वार टापटाप आवाज करीत निघून गेले. भ्यालेला गाव आता बाहेर आला. त्या म्हातारीकडे गावातील सारे लोक आले. बायका तिचे सांत्वन करीत होत्या. सर्वांना हळहळ वाटली. फक्त एकालाच आनंद झाला होता. गब्रूला बरे वाटले. आता त्या काचेच्या घरात जाईन व ते प्रयोग चोरिन असे त्याने मनात म्हटले.
त्या दिवशी रात्र झाली. गब्रू उठला. त्या झाडावर चढला. त्या फांदीवरुन तो फुलाच्या घराच्या गच्चीवर उतरला. ते काचेचे घर उघडे होते. त्याने मेणबत्ती पेटवली; परंतु तेथे ते नवीन प्रयोग त्याला आढळले नाहीत, कोठे गेले ते प्रयोग? त्याने का बरोबर नेले? मरताना का ते प्रयोग जवळ ठेवणार?
गब्रूचा तडफडाट झाला. त्याने संतापाने दात-ओठ खाल्ले. निराशेने त्याने हात चोळले. तो पुन्हा घरी आला, परंतु त्याला झोप येईना. उजाडले नाही. तो गब्रू राजधानीचा रस्ता चालु लागला. फुलाच्या पाठोपाठ तो निघाला.