माधवचा आत्मा नेण्यासाठी देवाचे दूत आले व सैतानाचेही दूत आले. देवाचे दूत व सैतानाचे दूत हयांची लढाई सुरू झाली.

परंतु इतक्यात सैतान तेथे आला.

‘हा आत्मा माझा आहे. कराराप्रमाणे माझा आहे. सैतान म्हणाला.

‘करार नीट पाहा. हा क्षण सुंदर आहे, किती पवित्र आहे. हा क्षण माझ्या जीवनात अमर होवो असे त्याने म्हटले खरे; परंतु ज्या विचारांत मग्न असता हे शब्द उच्चारले गेले, ते विचार तुमचे आहेत का? तुमच्या पोतडीत तसले विचार आहेत का? आजपर्यत तुम्ही हया आत्म्यावर नाना प्रयोग केलेत; परंतु ‘हा क्षण अमर होवो. हे खरे सुख’ असे शब्द त्याच्या तोंडून तुम्हाला काढता आले का? खरे सांगा. जो क्षण अमर होवो असे हया आत्म्याने म्हटले तो क्षण दैवी होता. तो क्षण देवाचा होता. सैतानाने दिलेला नव्हता. म्हणून हा आत्मा देवाचा आहे.’ देवदूताचा नायक म्हणाला.

‘खरे आहे तुमचे म्हणणे. न्या त्याला.’ सैतान म्हणाला.

सैतानाचे दूत निघून गेले. देवदूतांनी माधवाच्या आत्म्याला सुंदर शरीर दिले. सुंदर वस्त्रे दिली. वाजतगाजत त्याला नेले. एका लढाईतील जणू तो विजयी वीर होता. शेवटी देवाचा झेंडा त्याने उंच केला.

माधवचे स्वागत करायला मधुरी तेथे उभी होती. किती पवित्र प्रसन्न व मधुर असे हास्य तिच्या तोंडावर होते! दोघे भेटली. दोघे प्रभूंच्या पाया पडली. प्रभूने दोघांना जवळ घेतले. त्याने त्यांच्या पाठीवरून, डोक्यावरुन मंगल हात फिरविला.

देवाचा दरबार पुन्हा भरला. माधव व मधुरी तेथे बसली होती. देवदूत स्तुतिस्तोत्रे गाऊ लागले. इतक्यात सैतान तेथे आला. स्तुतिस्तोत्रे थांबली.

‘सैताना, केलास प्रयोग?’ परमेश्वराने प्रश्न केला.

‘हो केला.’

‘काय निष्पन्न झाले?’

‘मनुष्याच्या कितीही अध:पात झाला तरी शेवटी तो वर येतो हे सिध्द झाले मनुष्य शेवटी चांगला होतो. नदी नागमोडी गेली, वाकडीतिकडी गेली, काटयाकुटयांतून गेली तरी शेवटी ती सागराला मिळेल. त्याप्रमणे मनुष्याने कितीही पाप कले तरी तो शेवटी सत्याकडे, मांगल्याकडे, कल्याणाकडे वळेल. मी हरलो. प्रभू, तू जिंकलेस.’

पुन्हा स्तुतिस्तात्रे झाली. मंगल वाद्ये वाजू लागली.

‘परमेश्वराची सृष्टी धन्य आहे,’ असे जयजयकार झाले!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel