परंतु सर्वज्ञ माधव आज असमाधानी होता. इतक्या वर्षात असे असमाधान त्याला कधी वाटले नव्हते. तो नेहमी पुस्तकांत रंगलेला असावयाचा; परंतु आज पुस्तके नि:सार वाटत होती. जी पुस्तके वाचता-वाचता इतकी वर्षे तो घामाघूम झाला, त्या पुस्तकांत काडीमात्र राम नाही असे त्याला वाटले. तो शून्य दृष्टीने दिवाणखान्यातील त्या ज्ञानभांडाराकडे बघत होता.

शेवटी तो उठला. तो खिडीकजवळ गेला. खिडकी उघडावी असे त्याला वाटले; परंतु ती खिडकी उघडेना. बिजागरे गंजून गेली होती. बोलट गंजला होता. शेवटी सर्व शक्ती एकवटून त्याले बोलट ओढला. खिडकी उघडली. बाहेरच्या शुभ्र चांदण्याचा प्रकाश एकदम दिवाणखान्यात भरला. सूर्याच्या किरणांना, चंद्रकिरणांना आजपर्यत तो दिवाणखाना बंद होता. चंद्राच्या प्रकाशाला त्यात शिरावयास आज आनंद होत होता. आज पौर्णिमा होती. पूर्णचंद्र अनंत अशा काळयासावळया आकाशात शोभत होता. मध्यरात्र झाली होती. सर्व. सामसूम होते. मध्येच एखादे कुत्रे भुंके. वटवाघूळ फडफड करी. माधव त्या चंद्रप्रकाशाकडे पाहात राहिला. किती तरी वर्षात चांदणे त्याने पाहिले नव्हते. सर्व पृथ्वी दुधात न्हाल्यासारखी दिसत होती.

माधव उभा होता. अनिमिष नेत्रांनी तो चंद्रप्रकाश पीत होता. तेथे खिडकीत त्यांची तंद्री लागली. तो विचारमग्न झाला. तो मनात म्हणाला, ‘मी इतकी वर्षे सर्व विद्यांचा अभ्यास करीत आहे; परंतु मला काय मिळाले? विश्वाचे रहस्य उलगडले का? चंद्र, सूर्य, तारे हयांचा थोडा अभ्यास केला का? परंतु हया सर्वाचे आदिकारण काय? सारी कोडी सुटली का? मी नि:शंक झालो? काय मिळवले मी? विश्वाचे कोडेही मला सुटले नाही व सुखांचा उपभोगही मी घेतला नाही. माझे जीवन रिकामे आहे, शून्य आहे. उगीच इतकी वर्षे येथे अंधारात घालविली. फुले हुंगली नाहीत, पाण्यात डुंबलो नाही; टेकडीवर चढलो नाही, चांदण्यात फिरलो नाही; नीट खाल्ले नाही, नीट प्यायलो नाही; ना ज्ञान, ना सुख; ना मनाचे समाधान, ना देहाचे. फुकट, फुकट गेला सारा जन्म. फुकट गेली सारी वर्षे.’

किती तरी वेळ अशा विचारात तो उभा होता. तिकडे कोंबडा आवरला. पहाट झाली. कोणी तरी खाली येऊन हाका मारीत होते. कोण होते? माधवाकडे अभ्यासासाठी येणारा तो एक विद्यार्थी होता. त्याच्या हाकांनी माधव भानावर आला; परंतु तो रागावला. हया हाकांमुळे पुन्हा आपण प्रत्यक्ष सृष्टीत आलो म्हणून त्याला वाईट वाटले. ‘कसा विचारात रंगलो होतो, परंतु हा आला हाका मारीत!’ असे म्हणत माधव खाली गेला.

‘काय आहे रे? कशाला पहाटे बोंबलत आलास? मी विचारांच्या स्वर्गात होतो. तू माझी समाधी भंगलीस, तंद्री मोडलीस. जा. चालता हो जा. आज अनध्याय. आज नको वाचन. फुकट आहे हे वाचन-बिचन. काही अर्थ नाही,’ असे दारात उभा राहून माधव म्हणाला.


आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel