सैतानाने माधवाला एका दूरच्या देशात नेले. त्या देशाच्या राजधानीतून ते हिंडत होते. त्यांच्या मूर्ती सर्वाच्या डोळयांत भरतील अशा होत्या. जो तो त्या दुकलीकडे बघे. जशी भीमार्जुनांची जोडी; परंतु सरकारी अधिकार्यांना त्यांचा संशय आला. पोलिसांनी त्यांना पकडून नेले. राजासमोर त्या दोघांना उभे करण्यात आले.
‘आपण कुठले?’ राजाने प्रश्न केला.
‘अमक्या ठिकाणाचे असे आम्ही नाही.’ माधवाने उत्तार दिले.
‘तुम्ही काय करता?’
‘सारे काही करतो.’
‘अशक्य गोष्टी शक्य कराल?
‘हो.’
थोडा वेळ विचार करून राजा म्हणाला, ‘सध्या आम्हाला फार अडचण आहे. देशातील चांदी, सोने सारे देशांतरी गेले. तिजोरी रिकामी आहे. काय करायचे अशा वेळी? सांगा उपाय.’
‘सोपा उपाय,’ सैतान हसून म्हणाला.
‘सांगा.’ राजा म्हणाला.
‘कागदी नाणे सुरू करावे. कागदाचे तुकडे घ्यावे. त्यांच्यावर शिक्के मारावेत.
हया तुकडयाची किंमत पाच रुपये, हया तुकडयाची पाचशे, असे करावे.’ सैतानाने सांगितले.
‘खरेच. आमच्या डोक्यात आले नाही. फुकट आहेत आमचे प्रधान. तुम्ही आम्हाला नेहमी सल्ला देत जा. तुम्हाला बंगला राहायला देतो. नोकर चाकर सेवेला देतो. जाऊ नका आम्हाला सोडून.’ राजा म्हणाला.
सैतान व माधव मोठया बंगल्यात राहू लागले. त्यांचा थाटमाट काय विचारता? सारे त्यांना भीत. सारे त्यांना सलाम करीत. ते दोघे रस्त्यातून ऐटीने फिरत जात.
एके दिवशी माधव राजाजवळ बसला होता. राजा म्हणाला, ‘माझ्या मनात एक विचित्र इच्छा उत्पन्न झाली आहे. ती तुम्ही पुरी कराल?’
‘हो!’ माधव म्हणाला.
‘इच्छा अशी आहे की, प्राचीन काळापासून तो आजपर्यत जितक्या सुस्वरूप अशा स्त्रिया हया पृथ्वीवर झाल्या, त्यांचे दर्शन मला व्हावे. माझ्या डोळयांसमोरून त्या सर्व जाव्यात’
‘ठीक. तुमची इच्छा पूर्ण करीन.’