‘हो.’ ती म्हणाली. ‘काय लिहिले ते सांग.’
‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे ना लिहिलेत?’ ‘नाही काही.’
‘मग काय लिहिलेत?’
‘तुला अद्याप वाचता येत नाही. तू वेडी आहेस.’
‘मी तुमच्या डोळयांवरून वाचले. तुमच्या स्पर्शावरून वाचले. तुमची बोटे थरथरत होती, त्यांवरून वाचले. अक्षरे मला वाचता येत नाहीत; परंतु डोळे वाचता येतात. मी तुम्हाला आवडत नाही?
‘आवडतेस.’
‘आता मला वेडी नका ठेवू. मला शहाणी करा. मी पाटी घेऊन येत जाईन. मला धडा देत जा. मी भराभर शिकेन. म्हणजे तुम्हाला अधिक आवडेन. खरे ना?’ असे म्हणून कळी निघून गेली. दुसर्या दिवसापासून ती तुरूंगातील शाळा सुरू झाली. कळीचे जीवन फुलू लागले. फुला खतपाणी घालू लागला. कळी पाटी आणी. फुला गजांतून ती घेई. तिच्यावर तो अक्षरे लिही. तो तिला उजळणी सांगे. ती अक्षरे वाचायला सांगे. मग कळी खाली जाई. ती खोलीत बसे व गिरवी. धडा पाठ करून ठेवी.
‘तुमचे नाव कसे लिहायचे ते मला शिकवा आज.’ ती म्हणाली.
‘आधी स्वत:चे नाव लिहायला शीक.’
‘माझ्या वस्तूंवर मी तुमचे नाव लिहिणार आहे. माझ्या रूमालावर, माझ्या उशीवर, माझ्या अंगातल्यावर.’
‘मग त्या वस्तू माझ्या होतील.’
‘मी तुमची आहे. म्हणून माझ्या वस्तूही तुमच्या नाहीत का? हसता काय? शिकवा ना तुमचे नाव. काय आहे तुमचे नाव?’
‘कळी फुलली म्हणजे काय होते?’
‘फूल.’
‘त्या फुलाला हाक कशी मारशील?’
‘फुला, अरे फुला, अशी.’
‘हेच माझे नाव. दोनदा घेतलेस माझे नाव.’
‘फुला का तुमचे नाव? किती छान नाव. सार्या जगाला ‘फुला’ असे सांगता वाटते? सर्वांना फुलवणारे, फुला असे सांगणारे. हया कळीला फुलवणारे. ‘फु’ कसा लिहायचा? सांगा ना.’ त्याने पाटीवर स्वत:चे नाव लिहून दिले; ‘फुला’ ‘फुला’ असे घोकित कळी निघून गेली.