फुलाचा खटला सुरू झाला. न्यायमंदिरासमोर तुफान गर्दी झाली होती. ‘देशद्रोहयाला फाशीची शिक्षा द्या!’ अशा आरोळया लोक मारीत होते. स्वत: न्यायाधीश थरथरत होता. फाशीची शिक्षा तो न देता, तर लोक त्याच्याही जिवावर उठले असते. ते फुलाला सौम्य शिक्षा देता तर लोक रुद्रावतार धारण करते. न्यायाधिशाने शेवटी फाशीची शिक्षा फर्माविली. फुला शांत होता. लोकांनी टाळया पिटल्या.
संगिनीच्या पाहार्यात फुलाला तुरुंगात नेण्यात आले. फाशी- कोठयात त्याला ठेवण्यात आले. तेथे निजण्यासाठी पेंढा होता. पाणी पिण्याला मडके होते. फुला शांतपणे त्या पेंढयावर पडला व झोपी गेला. जवळ सर्प आला तरी फुले भीत नाहीत. जवळ मरण आले तरी फुला शांत होता.
फाशीची तारीख प्रसिध्द झाली. उद्याचा तो दिवस, फुले फुलवणार्या दिलदार फुलाचे प्राण उद्या जाणार होते. सृष्टीतील सारी फुले दु:खी दिसत होती. आत्याबाई बगीच्यात होती; परंतु सारी फुले सुकली असे तिला वाटले.
‘का रे फुलांनो? माना का खाली घालता? फुलाच्या जिवाला का धोका आहे? परंतु देव सारे बरे करील असे नाही का तो म्हणाला?’ असे ती म्हातारी फुलांना म्हणत होती.
फुलाच्या खोलीच्या खिडकीसमोर वधस्तंभ उभारण्यात येत होता. ज्या खांबावर फाशी देणार तो खांब उभारण्यात येत होता. सुताराची ठोकाठोक ऐकू येत होती. त्या खांबाकडे फुला शांतपणे बघत होता. फुलाला समोर सारखे मरण दिसावे म्हणून दुष्टांचा तो प्रयत्न होता; परंतु पवित्र आत्म्याला मरणाची का भीती असते?
त्या तुरुंगाच्या अधिकार्याचे नाव ढब्बूसाहेब असे होते. त्याचा स्वभाव तामसी होता. त्याच्या शरीराचा तोल जसा त्याला सांभाळता येत नसे, त्याप्रमाणे मनाचाही तोल त्याला सांभाळता येत नसे. मोठी करडी असे त्याची शिस्त. कैद्यांकडे तो नेहमी साशंकतेने बघत असे. कैद्यांशी गोड बोलणे म्हणजे गुन्हा असे त्याचे मत होते.
ढब्बूसाहेबांना एका मुलगी होती. त्या मुलीचे नाव कळी. कळीची आई लहानपणीच वारली. आईवेगळया मुलीवर पित्याचे फार प्रेम. ढब्बूसाहेब रागीट होते; परंतु मुलीसमोर त्यांचा राग पळे. त्यांचा निश्चय कळीसमोर राहत नसे. कळी त्यांना हसवी.
कळी आता मोठी झाली होती. चौदा - पंधरा वर्षाची ती असेल. ती सुंदर होती. तिचे केस फारच सुंदर होते. तुरुंगातील बगीच्यामधील फुले ती केसांत घाली. आकाशात तारे शोभावे तशी ती फुले तिच्या काळयाभोर केसांत शोभत आणि कळीचे हसणे किती गोड होते! त्या गोड हसण्याने तिन सार्या जगाला जिंकून घेतले असते.