‘मला नाही धैर्य.’ माधव म्हणाला. ‘भितुरडा.’ असे म्हणून सैतानाने

मधुरीच्या भावाच्या डोक्यता सोटा हाणला.

‘अरे, हा बघ तुझ्या बहिणीचा जार.’ बरोबरचा कामगार म्हणाला.

परंतु भाऊ खाली पडला होता. सैतान व माधव अंधारातून पसार झाले. भावाची किंकाळी मधुरीने घरातून ऐकली. ती दिवा घेऊन आली, तो भाऊ रस्त्यात पडलेला. डोक्यातून भळभळ रक्त वाहात होते. ती भावाचे डोके मांडीवर घेऊन बसली.

‘येथे रस्त्यात कोठे बसतेस? त्याला घरी नेऊ.’ शेजारी म्हणाले.

भावाला घरी नेण्यात आले. मधुरी वारा घालीत होती. डोक्याला तिने फडके बांधले. ‘भाऊ, भाऊ, ती हाका मारीत होती. तिला रडू आले. बराच वेळ झाला. भावाने डोळे उघडले. जवळ बहीण होती.

‘तू दूर हो. माझ्या अंगाला हात लावू नकोस. तू पापी आहेस. दुष्ट आहेस. तू व्यभिचारिणी आहेस. वेश्या आहेस. हो दूर. मरताना तरी पापी माणसाचे दर्शन नको. तुझ्या माकडचेष्टांसाठी आईला विष देऊन मारलेस. तू तुझ्या भावाच्या डोक्यात आज सोटा मारवलास. तू डाकिण आहेस. हो दूर. नको लावू हात.’ भाऊ त्वेषाने म्हणाला.

‘भाऊ, नको रे असे बोलू, मी नाही हो अपराधी. मी का वेश्या? मी फक्त एकाला प्रेम दिले. बघ हे हृद्य फाडून. बहिणीला वाटेल ते कसे रे बोलतोस? नाही आमचे अद्याप लग्न झाले; परंतु ते लावणार आहेत. त्यांचे प्रेम आहे माझ्यावर माझे त्यांच्यावर. निर्मळ प्रेम म्हणजे का व्यभिचार? म्हणजे का वेश्याव्यवसाय? भाऊ, कसे रे बोलतोस असे? का अशी आग पाखडतोस? कोण आहे मला?’

‘तू दूर हो सांगितले ना? माझ्याजवळ प्रेमाच वर्णन करतेस, लाज नाही वाटत? लग्न म्हणे लागेल. लागल्यावर मारायच्या होत्यास मिठया; परंतु आधीच? पापिणी, चांडाळणी, दूर हो. हात नको लावू मला. धर्म बुडवी. कुळाला काळिमा लावलास. घराची अब्रू दवडलीस. मला गिरणीत मान वर करू देत नाहीत; परंतु तुझी बाजू घेऊन मी भांडत असे. माझी बहिण निर्मळ म्हणत असे; परंतु तू तर नरकात बुडया मारीत आहेस. नाच आता पोटभर त्या नरकात. आईची अडगळ गेली. भावाची अडचणही दूर झाली. दाही दिशा तुला मोकळया. दूर हो. हो दूर.’

‘भाऊ, असेन मी पापी. असेन मी कुलटा. पाप्यावर प्रेम करील तोच खरा. चांगल्यावर सारेच प्रेम करतील. खरे प्रेम ते जे पाप्यावरही दया करील. भाऊ, सारे जग दूर लोटील; परंतु तू नाही लोटता कामा. तू माझे अपराध पोटात घातले पाहिजेस. तुझे प्रेम असे मोठे नाही? ते प्रेम का संकुचित, क्षुद्र आहे? बहिणीची सारी पापे विसरून जाण्याइतके तुझे प्रेम सहनशील नाही? भाऊ, ते मोठे प्रेम मला दे. मला कोणी नाही.’

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel