ग्रंथकारपरिचय

नवभारत ग्रंथमालेला आजवर लाभलेले ग्रंथकार आपल्या विद्वत्तेने व कर्तृत्वाने महाराष्ट्र समाजांत मान्यतेस पावलेले असेच होते; त्यांपैकी बरेच जण अखिलभारतीय कीर्ति संपादन केलेले आहेत, हेंही सहज लक्षांत येण्याजोगें आहे.  श्री. धर्मानंद कोसम्बींचा ग्रंथ मिळवून नवभारत ग्रंथमालेने ग्रंथकारांच्या कीर्तिमत्तेच्या बाबतींत उच्चांक गाठला आहे.  पालिभाषा व बौद्ध धर्म यांत निष्णात म्हणून त्यांचें नांव जगांतील विद्वन्मंडळास परिचित आहे.

धर्मानन्द कोसम्बी यांचें पूर्वायुष्य हें आधुनिक काळांत अत्यंत विरलत्वाने आढळणार्‍या धर्मजिज्ञासेचें सर्वोत्कृष्ट उदाहरण आहे.  केवळ तेवीस वर्षांच्या वयांत तरुण पत्‍नीला सोडून व संसाराला लाथ मारून कल्याणकारक अशा धर्माचें ज्ञान करून घेण्याच्या तीव्र तळमळीने घराबाहेर पडलेल्या धर्मानन्दाची हकीकत वाचली म्हणजे जगतांतील दुःखाचा नाश करणार्‍या धर्ममार्गाच्या संशोधनार्थ गृहत्याग करणार्‍या गोतमाचें चित्र डोळ्यांपुढे आल्याखेरीज राहत नाही.  सांसारिक आपत्ति कुणावर येत नाहीत ?  हजारों लाखों लोकांवर त्या येतात.  त्या प्रसंगी मनुष्य ज्या तर्‍हेने वागतो, त्यावरूनच त्याची किंमत ठरते.  गोवें प्रांतांत एका लहानशा गावी १८७६ सालीं जन्मलेल्या धर्मानन्दावर तरुणपणीं कांही सांसारिक आपत्ति आल्या आणि त्याचें ''चित्त प्रपंचांत रमेनासें झालें.''  ''बुद्धावर माझी आधिकाधिक श्रद्धा जडत चालली.  प्रपंचाचा जसजसा वीट येत गेला, तसतशी माझी श्रद्धा दृढ होत गेली.  माझें सर्वस्व बुद्ध आहे असें वाटूं लागलें.  कितीहि संकटें येवोत, कितीहि विपत्ति भोगाव्या लागोत, बुद्धोपदेशाचें ज्ञान मला झालें म्हणजे माझ्या जन्माचें साफल्य झालें असें मला वाटूं लागलें.''  असें धर्मानन्दांनीच त्या काळांतल्या आपल्या मनःस्थितीचें वर्णन केलें आहे.

प्रबल धर्मजिज्ञासेच्या पायीं इ.स.१८९९ सालच्या अखेरीस निष्कांचन स्थितींत गृहत्याग केल्यानंतर या तरुणाने जें पर्यटन केलें व ज्या अतर्क्य हालअपेष्टा सोसून बौद्धधर्माचें ज्ञान व त्याबरोबरच आत्मसमाधान संपादिलें, त्यांचा वृत्तांत अतीव अद्‍भुत व विस्मयकारक आहे.  धर्मज्ञान प्राप्‍त करून घेण्यासाठी आरंभी संस्कृत शिकण्याचें धर्मानन्दांनी ठरविले.  त्यासाठी प्रथम पुण्यास, तेथून ग्वालेरीस व तेथून काशीस त्यांनी गमन केलें.  संस्कृत विद्येच्या या माहेरघरांत त्यांची अध्ययनाची सोय सहज व चांगल्या रीतीने लागली.  जेवणाच्या सोयीसाठी मात्र अन्नछत्रच त्यांना पाहावें लागलें; व तेथे प्रवेशही कष्टानेच मिळाला.  सुमारें दीड वर्ष व्याकरण (कौमुदी) व साहित्य यांचें अध्ययन केल्यानंतर धर्मजिज्ञासेने धर्मानंदांना पेपाळांत जाण्यास प्रवृत्त केलें.  बुद्ध भगवानाच्या धर्माचे जिवंत अवशेष, भगवंताची जन्मभूमि असण्याचा मान ज्या राज्यास मिळाला आहे, त्या नेपाळच्या राज्यांत कांही तरी पाहावयास मिळतील या आशेने नेपाळांत गेलेल्या या आर्त व जिज्ञासु तरुणास तेथील विपरीत परिस्थिती पाहून अत्यंत विषण्णता प्राप्‍त झाली.  तेथून ते बुद्धगयेला गेले. बौद्धधर्मग्रंथांचे सम्यक ज्ञान सिंहलद्वीपांत गेल्याने होईल असें तेथील एका भिक्षूने सांगितल्यावरून धर्मानन्द तेथून तडक सिलोनास जाण्यास निघाले.  अपरिमित त्रास, कष्ट व संकटलें सोसून ते एकदाचे सिलोनास पोचले.  तेथे त्यांस अखेर जें पाहिजे होतें तें, म्हणजे बौद्ध धर्माचें ज्ञान मिळालें.  कोलम्बो शहराजवळ असलेल्या 'विद्योदय विद्यालय' नांवाच्या विहारांत भिक्षुधर्माने राहून त्यांनी महास्थविर सुमंगलाचार्य यांच्या हाताखाली पालि ग्रंथांचा अभ्यास केला.  परंतु सिलोनांत खाण्याची आबाळ होऊ लागल्यामुळे त्यांची प्रकृति नीट राहीना, म्हणून ते सुमारें एक वर्षानें परत फिरले व मद्रास येथे आले.  तेथे सहा महिने राहून अधिक अध्ययन करण्याच्या उद्देशाने ब्रह्मदेशांत गेले.  तेथे विहारांत राहून ध्यानमार्गाचा अभ्यास केला; परंतु तेथेही प्रकृति चांगली न राहिल्यामुळे ते पुनः हिंदुस्थानांत आले.  भिक्षुवेषांतच सारनाथ, कुसिनारा, लुम्बिनीवन, कपिलवस्तु इत्यादि भगवान गौतमाच्या आयुष्यांतील चिरस्मरणीय घटनांनी पावल झालेल्या बौद्ध क्षेत्रांच्या यात्रा त्यांनी केल्या.  नंतर पुनः ब्रह्मदेशांत जाऊन मंदाले शहराजवळ निरनिराळ्या विहारांत राहून एक वर्षभर बौद्ध धर्मग्रंथांचा व ध्यानमार्गाचा अभ्यास केला व तेथून १९०६ च्या आरंभी हें धर्मानन्द भिक्षु पुनः कलकत्त्यास आले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel