ॠषिमुनींत जातिभेद नव्हता

तपस्वी ॠषिमुनींत जातिभेदाला मुळीच थारा नव्हता. कोणत्याही जातीचा मनुष्य तपस्वी झाला, तरी त्याचा सर्व समाजांत बहुमान होत असे. उदाहरणादाखल येथे जातकांत आलेली मातंग ॠषीची गोष्ट* संक्षेपाने देत आहें ः-
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* मातंग जातक (नं. ४९७)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मातंग वाराणसी नगराच्या बाहेर चांडालकुलांत जन्मला. तो वयांत आल्यावर एके दिवशीं त्याची व वाराणसी श्रेष्ठीच्या दृष्टमंगलिका नांवाच्या तरुण कन्येची रस्त्यांत गाठ पडली. तेव्हा मातंग एका बाजूला उभा राहिला. आपल्या परिवारांतील नोकरांना दृष्टमंगलिकेने विचारलें की, हा बाजूला उभा राहिलेला मनुष्य कोण ? तो चांडाल आहे, असें तिच्या नोकराने सांगितल्याबरोबर अपशकुन झाला असे समजून ती तेथूनच मागे फिरली.

दृष्टमंगलिका महिन्या दोन महिन्यांनी एकदा उद्यानांत जाऊन आपल्या बरोबरच्या व तेथे जमणार्‍या इतर लोकांना पैसे वाटीत असे. ती माघारी घरीं गेल्यामुळे त्या लोकांची निराशा झाली. त्यांनी मातंगाला झोडपून निश्चेष्ट करून रस्त्यांत पाडलें. मातंग कांही वेळाने शुद्धीवर आला आणि दृष्टमंगलिकेच्या बापाच्या दरवाजांत पायरीवर आडवा पडून राहिला. ''हा त्रागा कां करतोस ?'' असें जेव्हा त्याला विचारलें, तेव्हा तो म्हणाला, ''दृष्टमंगलिकेला घेतल्यावाचून मी येथून हलणार नाही.'' सात दिवस तसाच पडून राहिल्यावर श्रेष्ठीने निरुपाय होऊन आपल्या मुलीला त्याच्या स्वाधीन केलें. तिला घेऊन तो चांडालग्रामांत गेला.

दृष्टमंगलिका जरी त्याच्याशी पत्‍नीच्या नात्याने वागण्यास तयार होती, तथापि त्याने तिला तशा रीतीने न वागवतां अरण्यांत जाऊन घोर तपश्चर्या आरंभिली. सात दिवसांनी मातंग परत आला आणि दृष्टमंगलिकेला म्हणाला, ''तूं जाहीर कर की, माझा पति मातंग नसून महाब्रह्मा आहे; व तो पौर्णिमेच्या दिवशीं चन्द्रमंडळांतून खाली उतरणार आहे.'' त्याप्रमाणें दृष्टमंगलिकेने हें वर्तमान सर्वांना सांगितलें. पौर्णिमेच्या दिवशीं रात्री मोठा जनसमुदाय चांडालग्रामांत तिच्या घरासमोर जमला. तेव्हा मातंग ॠषि चन्द्रमंडळांतून खाली उतरला; आणि आपल्या झोपडींत शिरून त्याने दृष्टमंगलिकेच्या नाभीला आपल्या अंगठ्याने स्पर्श केला.

तेथे जमलेल्या ब्रह्मभक्तांनी हा अद्‍भुत चमत्कार पाहून दृष्टमंगलिकेला उचलून वाराणसी नगरींत नेलें आणि नगरीच्या मध्यभागीं एक मोठा मंडप उभारून तिची पूजा चालविली. लोक तिला नवस करूं लागले. नऊ महिन्यांनंतर त्याच मंडपांत तिला मुलगा झाला. मंडपांत जन्मल्यामुळे त्याचें नांव मांडव्य ठेवण्यांत आलें. लोकांनी त्या मंडपाजवळच एक मोठा प्रासाद बांधला, आणि या मातापुत्रांना त्या प्रासादांत ठेवलें. त्यांची पूजा चालू होती.

लहानपणापासून मांडव्यकुमाराला शिकविण्यासाठी मोठमोठाले वैदिक पंडित स्वच्छेने आले. तो तीनही वेदांत पारंगत झाला. आणि ब्राह्मणांना पुष्कळ मदत करूं लागला. एके दिवशीं मातंग ॠषि त्याच्या दारांत भिक्षेसाठी उभा राहिला असतां मांडव्य त्याला म्हणाला, ''चिंध्या पांघरून पिशाचासारखा येथे उभा राहणारा तूं कोण आहेस ?''

मातंग - तुझ्या घरीं अन्नपान पुष्कळ आहे. यास्तव कांही तरी खरकटें मला मिळेल, या हेतूने मी येथे उभा आहें.

मांडव्य - पण हें अन्न ब्राह्मणांसाठी आहे. तुझ्यासारख्या हलकटाला देण्यासाठी नाही.

दोघांचाही बराच संवाद झाल्यावर मांडव्याने मातंगाला आपल्या तीन द्वारपालांकडून धक्के मारून घालवून दिलें. पण त्यामुळे त्याची बोबडी वळली, डोळे पांढरे फटफटीत झाले आणि तो निश्चेष्टित होऊन पडला. त्याच्या बरोबरच्या ब्राह्मणांची देखील कांही कमी प्रमाणांत हीच स्थिति झाली. तोंडें वेडींवाकडीं करून ते गडबडा लोळूं लागले. हा प्रकार पाहून दृष्टमंगलिका घाबरून गेली. एका दरिद्री तपस्व्याच्या प्रभावाने आपल्या मुलाची व इतर ब्राह्मणांची ही स्थिति झाल्याचें जेव्हा तिला समजलें, तेव्हा त्या तपस्व्याचा शोध करण्यासाठी ती निघाली. मातंग ॠषि एका ठिकाणी बसून भिक्षाटनांत मिळालेली पेज खात होता. दृष्टमंगलिकेने त्याला ओळखलें आणि आपल्या मुलाला क्षमा करण्याची विनंती केली. आपल्या उष्ट्या पेजेचा कांही भाग त्याने तिला दिला आणि सांगितलें की, ही पेज मुलाच्या आणि इतर ब्राह्मणांच्या तोंडांत घाल म्हणजे ते बरे होतील. त्याप्रमाणे दृष्टमंगलिकेने केल्यावर ते सर्व ब्राह्मण पूर्वस्थितीवर आले. पण चांडाळाच्या उष्ट्याने ब्राह्मण बरे झाल्याचें वर्तमान सर्व वाराणसींत पसरलें. तेव्हा लोकांना लाजून ते मेज्झ (मेध्य) राष्ट्रांत गेले. मांडव्य मात्र तेथेच राहिला.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel