श्रावकसंघ

प्रकरण सहावें
पंचवर्गीय भिक्षूंची माहिती


ज्या पंचवर्गीय भिक्षूंना बुद्ध भगवंताने पहिला धर्मोपदेश केला, त्यांची माहिती सुत्तपिटकांत फारच थोडी सापडते.  पहिल्या प्रथम ज्याला बौद्धधर्माचा तत्त्वबोध झाला, तो आज्ञात कौण्डिन्य चिरकालाने राजगृहाला आला, व त्याने बुद्धाला साष्टांग प्रणिपात केला, असा उल्लेख संयुत्तनिकायांतील वंगीस संयुत्तांत (नं. ९) सापडतो.  दुसरा पंचवर्गीय भिक्षु अस्सजि (अश्वाजित्) राजगृह येथे आजारी होता व त्याला भगवंताने उपदेश केला, अशी माहिती खन्धसंयुत्ताच्या ८८ व्या सुत्तांत आली आहे.  या दोघांशिवाय बाकी तिघांचीं नावें सुत्तपिटकांत मुळीच सापडत नाहीत.

जातकाच्या निदानकथेंत व इतर अट्ठकथांतून या पंचवर्गीय भिक्षूंची थोडीबहुत माहिती सापडते, तिचा सारांश असा ः-

रामो धजो लक्खणो चापि मन्ती
कोण्डञ्ञो च भोजो सुयामो सुदत्तो ।
एते तदा अट्ठ अहेसुं ब्राह्मणा
छळंगवा मन्तं व्याकरिंसु ॥

'राम, ध्वज, लक्खण (लक्ष्मण), मन्ती (मंत्री), कोण्डञ्ञ (कौण्डिन्य), भोज, सुयाम आणि सुदत्त हे आठ षडंग वेद जाणणारे ब्राह्मण होते, त्यांनी बोधिसत्त्वाचें भविष्य वर्तविलें.'

यांपैकी सातांनी बोधिसत्त्व गृहस्थाश्रमांत राहिला, तर चक्रवर्ती होईल, आणि गृहस्थाश्रम सोडून संन्यासी झाला तर सम्यकसंबुद्ध होईल, असें द्विधा भाकीत केलें.  या आठांत कौण्डिन्य अगदी तरुण होता.  त्याने बोधिसत्त्व निसंशय सम्यकसंबुद्ध होणार असें एकच भविष्य वर्तविलें.  द्विधा भविष्य वर्तविणार्‍या सात ब्राह्मणांनी घरी जाऊन आपल्या मुलांना सांगितलें की, ''आम्ही आता वृद्ध झालों आहोंत, आणि सिद्धार्थ राजकुमार बुद्ध झाला, तर तें पाहण्याचें आमच्या नशिबीं नाही.  तो जर बुद्ध झाला तर तुम्ही त्याच्या संघांत प्रवेश करा.''

बोधिसत्त्वाने गृहत्याग केला, तेव्हा एकटा कौण्डिन्य हयात होता.  बाकी सात ब्राह्मणांच्या मुलांपाशीं जाऊन तो म्हणाला, ''सिद्धार्थ कुमार परिव्राजक झाला आहे.  तो खात्रीने बुद्ध होणार.  त्याच्या मागोमाग आपणही परिव्राजक होऊं.''  त्या तरुणांपैकी चौघांनी कौण्डिन्याचें वचन मान्य केलें, व त्याच्या बरोबर प्रवज्या घेऊन ते बोधिसत्त्वाच्या मागोमाग गेले.  हे पांच जण पुढे पंचवर्गीय या नांवाने प्रसिद्धीस आले.  त्यांचीं नांवें महावग्गांत आणि ललितविस्तरांत सापडतात, तीं येणेंप्रमाणे ः-  कोण्डञ्ञ (कौण्डिन्य), वप्प (वाष्प), भद्दिय (भद्रिक), महानाम आणि अस्सजि (अश्वाजित्).

परंतु वर दिलेली पंचवर्गीयांची माहिती दंतकथात्मक दिसते.  गोतमकुमार बुद्ध होणार अशी जर कौण्डिन्याची खात्री होती, तर त्याला उरुवेलेंत सोडून कौण्डिन्य वाराणसीला कां गेला ?  बोधिसत्त्वाने शरीराला लागणारा आहार घेण्याला सुरवात केल्याबरोबर कौण्डिन्याची पूर्णश्रद्धा कशी नष्ट झाली ?  मला वाटतें की, हे पंचवर्गीय भिक्षु पूर्वी आळार कालामाच्या पंथांतील असून शाक्यांच्या किंवा त्यांच्या आसपासच्या प्रदेशांत राहत असत.  तेथे त्यांची व बोधिसत्त्वाची मैत्री जमली.  ते सर्वच ब्राह्मण होते, असेंही म्हणतां येत नाही.  आळार कालामाच्या आणि उद्दक रामपुत्ताच्या संप्रदायांत तथ्य न वाटल्यामुळे बोधिसत्त्व पुढील मार्ग शोधण्याच्या हेतूने राजगृहाला आला, तेव्हा त्याच्या बरोबर हे पंचवर्गीय भिक्षु देखील आले असावेत.  बोधिसत्त्वाला नवीन धर्ममार्गाचा बोध झाला तर त्याच मार्गाने आपण देखील जाऊं असा त्यांचा विचार होता.  पण बोधिसत्त्वाने तपस्या आणि उपोषणें सोडून दिलीं तेव्हा त्यांचा विश्वास उडाला आणि ते वाराणसीला निघून गेले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel