दास
आर्य येण्यापूर्वी सप्‍तसिंधुप्रदेशांत (सिंध आणि पंजाब प्रांतांत) दासांचें राज्य होतें. दास या शब्दाचा अर्थ गुलाम असा होऊन बसला आहे, परंतु वेदांत दास् आणि दाश् या दोन धातूंचा प्रयोग 'देणें' या अर्थी होतो; आणि तसाच तो अलीकडच्या कोशांतही देण्यांत आला आहे. म्हणजे दास शब्दाचा मूळचा अर्थ, दाता, उदार (Noble) असा असला पाहिजे. आवेस्तांतील फर्वदीन यस्तमध्ये या दास देशांतील पितरांची पूजा आहे. त्यांत त्यांना 'दाहि' म्हटलें आहे. (We worship the Fravashis of the holy men in the Dahi countries.)

प्राचीन पर्शियन भाषेंत संस्कृत स चा उच्चार ह होत असे. उदाहरणार्थ, सप्‍तसिंधूला आवेस्तांत हप्‍तहिंदु म्हटलें आहे. त्यालाच अनुसरून दासी किंवा दास याचें रूपांतर दाहि असें झालें आहे.

आर्य
आर्य हा शब्द ॠ धातुपासून साधला आहे; आणि निरनिराळ्या गणांत जे ॠ धातु सापडतात, ते बहुतेक गत्यर्थ आहेत. म्हणजे आर्य या शब्दाचा अर्थ फिरस्ते असा होतो. आर्यांना घरेंदारें करून राहणें आवडत नसे असें दिसतें. मोगल लोक जसे तंबूमध्ये राहत असत, तसेच आर्य लोक तंबूंतून किंवा मंडप घालून राहत असावेत. एका बाबतींत त्यांची ही परंपरा अद्यापि कायम राहिली आहे. बाबिलोनियांत यज्ञयागाच्या जागा म्हटल्या म्हणजे मोठमोठ्या मंदिरांची आवारें असत. आणि हरप्पा व महिंजो-दारो या दोन ठिकाणीं जे प्राचीन नगरावशेष सापडले आहेत, त्यांत देखील दाहि लोकांचीं मंदिरें यज्ञयागाच्या जागा असत असें तज्ज्ञांना वाटतें. ही परंपरा आर्यांनी मोडून टाकली. यज्ञयाग करावयाचा म्हटला म्हणजे तो मंडपांतच केला पाहिजे अशी त्यांनी वहिवाट पाडली. आर्यांचे वंशज तंबूंतली राहाणी सोडून कालक्रमाने घरें बांधून राहूं लागले, पण यज्ञाला मंडपच पाहिजे ही प्रथा अद्यापि टिकून राहिली आहे.

दासांचा पराजय कां झाला ?
अशा या फिरस्त्या लोकांनी दासांसारख्या पुढारलेल्या लोकांचा पराजय केला कसा ? याचें उत्तर इतिहासाने- विशेषतः हिंदुस्थानच्या इतिहासाने - वारंवार दिलें आहे. एका राजवटीखाली लोक आरंभी सुखी आणि सधन झाले, तरी अखेरीला एका लहानशा वर्गाच्या हातांत सत्ता एकवटते, तो वर्ग तेवढा चैनींत राहतो, आणि आपसांत अधिकारासाठी भांडत असतो. त्यामुळे लोकांवर कराचा भार वाढत जातो; आणि ते या सत्ताधार्‍यांचा द्वेष करतात. अशा वेळीं मागासलेल्या लोकांना चांगलें फावतें. एकजुटीने असल्या साम्राज्यशाहीवर हल्ला चढवून ते ती पादाक्रांत करतात. तेराव्या शतकाच्या आरंभीं जगली मोंगलांना एकवटून झगिशखानाने किती साम्राज्यें लयाला नेलीं ? तेव्हा आर्यांनी आपसांत भांडणार्‍या दासांना अनायासें जिंकलें असल्यास त्यांत मुळीच नवल नाही.

शहरें तोडणारा इन्द्र
दास लहान-लहान शहरांतून राहत असत. आणि या शहरांचे एकमेकांत वैर चालत होतें असें दिसतें. कां कीं, दासांपैकी दिवोदास हा इन्द्राला सामील झाल्याचा उल्लेख ॠग्वेदांत अनेक ठिकाणी आढळतो. दासांचें नेतृत्व वृत्र ब्राह्मणाकडे होतें. त्याचाच नातलग त्वष्टा; त्याने इन्द्राला एक प्रकारचें यंत्र (वज्र) तयार करून दिलें. त्याच्या साहाय्याने इन्द्राने दासांची शहरें तोडलीं व अखेरीस वृत्र ब्राह्मणाला ठार मारलें. पुरंदर म्हणजे शहरें तोडणारा हें विशेषण इन्द्राला ॠग्वेदांत अनेक ठिकाणीं लावलें आहे.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
* विशेष माहितीसाठी 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' पृष्ठ १७-१९ पाहा.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
इन्द्राची परम्परा
इन् आणि द्र या दोन शब्दांच्या समासाने इन्द्र शब्द बनला आहे. इन् म्हणजे योद्धा. उदाहरणार्थ, 'सह इना वर्तते इति सेना'. द्र शब्द शिखर किंवा मुख्य अशा अर्थी बाबिलोनियन भाषांत सापडतो. तेव्हा इन्द्र म्हणजे सैन्याचा अधिपति किंवा सेनापति. होतां होतां हा शब्द राजवाचक बनला. जसें देवेन्द्र, नागेंद्र, मनुजेंद्र इत्यादि. पहिल्या इन्द्राचें नांव शक्र होतें. त्यानंतर त्याची परंपरा बरींच वर्षे चालली असावी. नहुषाला इन्द्र केल्याची दन्तकथा पुराणांत आलीच आहे. 'अहं सप्‍तहा नहुषो नहुष्टरः' असा उल्लेख ॠग्वेदांत (१०।४९।८) सापडतो. अर्थात् या दन्तकथेंत कांही तथ्य असलें पाहिजे.

इन्द्रपूजा
सार्वभौम राजांना यज्ञांत बोलावून आणून त्यांना सोम देण्याचा विधि बाबिलोनियांत होत असे. त्या प्रसंगी स्तुतीने भरलेलीं त्यांची स्तोत्रें गाण्यांत येत. इन्द्राचीं बहुतेक सूक्तें अशाच प्रकारचीं आहेत. इन्द्राची संख्या नष्ट झाल्यानंतर देखील ही स्तोत्रें तशींच राहिलीं आणि त्यांचा अर्थ भलताच होऊं लागला. इन्द्र आकाशांतील देवांचा राजा आहे, अशी कल्पना होऊन बसली; आणि ह्या सूक्तांचा अर्थ अनेक ठिकाणीं कोणाला कांहीच समजेनासा झाला. त्यांच्या नुसत्या शब्दांत मांत्रिक प्रभाव आहे असें लोक गृहीत धरून चालूं लागले.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel