ह्या सुत्तांत एकंदरींत आठ गाथा आहेत.  पैकी दुसरी राहुलाची व बाकीच्या भगवंताच्या असें अट्ठकथाकाराचें म्हणणें आहे.  पहिल्या गाथेंत भगवंताने ज्याला पंडित म्हटलें आहे, तो सारिपुत्त होता, असेंही अट्ठकथाकार म्हणतो; आणि तें बरोबर असावें असें वाटतें.  राहुल अल्पवयस्क असतांनाच त्याच्या शिक्षणासाठी भगवंताने त्याला सारिपुत्ताच्या स्वाधीन केलें.  आणि एक दोन वर्षांनी राहुल वयांत आल्यावर त्याला भगवंताने हा उपदेश केला असावा.  कां की, ह्या सुत्तांत सांगितलेल्या गोष्टी अल्पवयस्क मुलाला समजण्याजोग्या नाहीत.  राहुल श्रामणेर झाला असता, तर त्याल, 'श्रद्धापूर्वक घरांतून बाहेर निघून दुःखाचा अन्त करणारा हो,' असा उपदेश करण्याची जरूरच नव्हती.

ब्राह्मण तरुण गुरुगृहीं जाऊन ब्रह्मचर्यापूर्वक वेदाध्ययन करीत आणि त्यानंतर यथारुचि गृहस्थाश्रम किंवा तपश्चर्येचा मार्ग अवलंबीत.  तसाच प्रकार राहुलाच्या बाबतींत घडून आला असावा.  त्याला सर्वसाधारण ज्ञान मिळावें या उद्देशाने भगवंताने सारिपुत्ताच्या स्वाधीन केलें आणि सारिपुत्ताबरोबर तो राहत असल्यामुळे त्याला ब्रह्मचर्य पाळणें आवश्चकच होतें.  वयांत आल्यावर त्याने पुनरपि गृहस्थाश्रमांत जाऊं नये म्हणून भगवंताने त्याला हा उपदेश केला.  आणि ह्या राहुलाच्या गोष्टीच्यापायावर महावग्गकाराने श्रामणेरांची विस्तृत कथा रचली.

इतर श्रामणेर


बुद्ध भगवंताच्या हयातींत अल्पवयांत संघांत दाखल झालेले श्रामणेर फारच थोडे होते.  पण दुसर्‍या संप्रदायांतून जे परिव्राजक येत, त्यांना चार महिने उमेदवारी करावी लागे; आणि अशा प्रकारच्या श्रामणेरांचाच भरणा जास्त होता असें दिसतें.  दीघनिकायांतील महासीहनाद सुत्ताच्या शेवटीं काश्यप परिव्राजक बुद्धाच्या भिक्षुसंघांत प्रवेश करूं इच्छितो, तेव्हा भगवान त्याला म्हणतो, ''काश्यपा, या संप्रदायांत जो प्रव्रज्या घेऊन संघांत प्रवेश करूं इच्छितो, त्याला चार महिने उमेदवारी करावी लागते.  चार महिन्यानंतर भिक्षूंची खात्री झाली, म्हणजे ते त्याला प्रव्रज्या देऊन संघांत दाखल करतात.  ह्या बाबतींत कांही अपवाद आहेत, हें मी जाणतों.''

त्याप्रमाणें काश्यपाने चार महिने उमेदवारी केली आणि भिक्षूंची खात्री झाल्यावर त्याला संघांत दाखल करून घेण्यांत आलें. 

श्रामणेरसंस्थेची वाढ

श्रामणेरांची संस्था भगवंताच्या परिनिर्वाणानंतर वृद्धिंगत होत गेली आणि होतां होतां लहानपणीं श्रामणेर होऊन भिक्षु होणार्‍यांचीच संख्या फार मोठी झाली.  त्यामुळे संघांत अनेक दोष शिरले.  खुद्द भगवान बुद्ध आणि त्याचा भिक्षुसंघ यांना प्रपंचाचा अनुभव चांगला होता आणि पुन्हा प्रपंचाकडे त्यांचें मन धावणें शक्य नव्हतें.  पण लहानपणींच संन्यासदीक्षा देऊन प्रपंचांतून ज्यांना बाहेर काढलें, त्यांचा ओढ संसाराकडे जाणें साहजिकच होतें.  पण रूढि त्यांच्या आड येऊं लागली आणि त्यांच्या हातून मानसिक दोष पुष्कळ घडूं लागले.  संघाच्या नाशाला जीं अनेक कारणें झालीं त्यांपैकी हें एक प्रमुख कारण समजलें पाहिजे.

श्रामणेरांच्या धर्तीवरच श्रामणेरींची संस्था उभारली गेली होती.  श्रामणेर भिक्षूंच्या आणि श्रामणेरी भिक्षुणींच्या आश्रयाने राहत, हाच काय तो फरक.

श्रावकसंघाचे चार विभाग

परंतु संघाच्या चार विभागांत श्रामणेरांची आणि श्रामणेरींची गणना केलेली नाही.  त्यामुळे भगवंताच्या हयातींत त्यांना मुळीच महत्त्व नव्हतें असें समजलें पाहिजे.  भिक्षु, भिक्षुणी, उपासक आणि उपासिका हेच काय ते बुद्धाच्या श्रावकसंघाचे विभाग आहेत.

भिक्षुसंघाची कामगिरी फार मोठी होती, यांत शंका नाही.  तथापि भिक्षुणी, उपासक आणि उपासिका यांनी देखील संघाच्या अभ्युन्नतींत पुष्कळ भर घातल्याचे अनेक दाखले त्रिपिटक वाङ्‌मयांत सापडतात.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Comments
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to भगवान बुद्ध (पूर्वार्ध)