हिंदुस्थानांत आल्यानंतर पत्‍नीला घेऊन त्यानीं सर्व क्षेत्रांच्या यात्रा केल्या व गुजरात विद्यापीठांत ते पूर्वीप्रमाणे राहूं लागले.  १९२९ सालीं लेनिनग्राड (रशिया) येथील बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासासाठी स्थापिलेल्या संस्थेंत काम करण्यास ते रशियांत गेले.  रशियांतील अनुभवांचा त्यांच्या अगोदरच साम्यवादी बनलेल्या मनावर बराच अनुकूल परिणाम झाला.  रशियांतील हवा, राहणी व अन्न न मानवल्यामुळे ते एका वर्षाच्या आंतच, म्हणजे १९३० च्या प्रारंभीं, हिंदुस्थानास परत आले.  येथे आले तों सर्व देश सत्याग्रहयुद्धासाठी सज्ज झालेला त्यांस दिसला.  मार्चमध्ये सुप्रसिद्ध दांडीकूच झालें.  धर्मानंदांनी या स्वातंत्र्ययुद्धांत उडी घेतली.  खेड्यापाड्यांतून प्रचार केला, शिरोडें, (रत्‍नागिरी) येथील मिठाच्या सत्याग्रहांत भाग घेतला व अखेर विलेपार्ले येथील सत्याग्रह-छावणीचें प्रमुखत्व स्वीकारलें.  तेथे त्यांना पकडल्यानंतर लवकरच हायकोर्टाने सोडून दिलें.  आक्टोबर १९३१ मध्ये ते डॉ. वुड्सच्या आग्रहावरून चवथ्यांदा अमेरिकेस गेले व तेथून १९३२ सालीं परत आले.  त्यानंतर ''१९३४ सालच्या ऑगस्ट महिन्यांत मी बनारसला जाऊन राहिलों.  तेथें सहा महिने हिंदु युनिवर्सिटीचा पाहुणा होतों.  त्यानंतर काशी विद्यापीठांत आठ नऊ महिने राहिलों.  विद्यापीठाच्या चालकांनी माझ्यासाठी एक लहानसें घर बांधून दिलें.  त्या घरांत राहून मी 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' हें पुस्तक लिहिलें.''

श्रमजीवी वर्गामध्ये बुद्धाच्या अहिंसा तत्त्वज्ञानाच्या प्रचाराने स्पृश्यास्पृश्य भेद नष्ट करून समता स्थापतां येईल की काय हें पाहण्याच्या हेतूने परळच्या वस्तींत एक आश्रम स्थापन करण्याचें कार्य कोसम्बींनी यानंतर हातीं घेतलें.  त्यांच्या हेतूनुसार १९३७ च्या जानेवारींत 'बहुजनविहारा'ची स्थापना झाली.  तेथे आपल्या उद्देशानुसार ते कार्य करीत असतात.

येणेप्रमाणें या महाभागाचें चरित्र आहे.  दुःखनिरोधक व कल्याणकारक असा मार्ग जो आपणास पराकाष्ठेच्या कष्टांनी व श्रमसायासांनी प्राप्‍त झाला, ज्यास आपल्या आयुष्यांतील विविध अनुभवांनी पुष्टि मिळाली, त्या मार्गाची शिकवण समाजबांधवांना देण्यासाठी त्यांनी आपले जीवित वाहिलें आहे.

फेब्रुवारी १९१० मध्ये सयाजीराव महाराजांच्या सांगण्यावरून बडोदें येथे बौद्ध धर्मावर कोसम्बींनी व्याख्यानें दिली.  त्यांचें पुस्तक लगेच 'बुद्ध, धर्म आणि संघ' या नांवाने प्रसिद्ध करण्यांत आलें.  पुढे १९१४ सालीं त्यांचें 'बुद्धलीलासारसंग्रह' हें पुस्तक प्रसिद्ध झालें.  या ग्रंथाचे तीन भाग असून गोतम हा बुद्ध होण्याच्या पूर्वीच्या जन्मांतील कांही कथा पहिल्या भागांत, खुद्द गोतम बुद्धाच्या कथा दुसर्‍या भागांत व बुद्धाचा उपदेश व परिनिर्वाण वर्णन करणार्‍या कथा तिसर्‍या भागांत दिलेल्या आहेत.  'समाधिमार्ग' (१९२५) व 'बौद्धसंघाचा परिचय' (१९२६) ही पुस्तकें गुजरात विद्यापीठांत असतांना लिहिली.  त्यानंतर 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' (१९३५) हें पुस्तक काशी येथे असतांना लिहिलें.  यांत त्यांनी प्राचीन भारतासंबंधीचे आपले परिणतावस्थेंतील विचार व आपले सामाजिक तत्त्वज्ञान प्रकट केलें आहे.  'विसुद्धिमग्गा'च्या संशोधनासंबंधी वर अनेकवार उल्लेख केलाच आहे.  या ग्रंथाचें संस्करण अंधेरी (मुंबई) येथील 'भारतीय विद्याभवन' या संस्थेने नागरी लिपींत नुकतेंच प्रसिद्ध केलें आहे.  गुजराती भाषेंतही त्यांचीं कित्येक पुस्तकें प्रसिद्ध झालीं आहेत.

धर्मानन्दजींनी आपल्या पूर्वायुष्याचा वृत्तान्त लिहिला, तो 'निवेदन' या नांवाने पुस्तकरूपाने १९२४ सालीं प्रसिद्ध झाला.  अगदी अलीकडे १९३७-३८ सालीं त्यांनी 'खुलासा' या नांवाने आपल्या उत्तर आयुष्याचा वृत्तांत लिहिला आहे, तो मुंबईच्या 'प्रकाश' पत्रांत क्रमशः प्रसिद्ध झाला आहे.  या दोन्ही आत्मचरित्रात्मक प्रबंधांवरून प्रस्तुत 'परिचय' लिहिला आहे.

-प्रकाशक.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel