मायादेवीची माहिती

बोधिसत्त्वाच्या आईची माहिती फारच थोडी मिळते.  तिचें नांव मायादेवी होतें, यांत शंका नाही.  पण शुद्धोदनाचें लग्न कोणत्या वयांत झालें, आणि मायादेवी बोधिसत्त्वाला कोणत्या वयांत प्रसवली, इत्यादि गोष्टींची माहिती कोठेच सापडत नाही.  अपदान ग्रंथांत महाप्रजापती गोतमीचें एक अपदान आहे.  त्यांत ती म्हणते -

पच्छिमे च भवे दानि जाता देवदहे पुरे ।
पिता अञ्जनसक्को मे माता मम सुलक्खणा ॥
ततो कपिलवत्थुस्मिं सुद्धोदनघरं गता ।


'आणि ह्या शेवटल्या जन्मीं मी देवदह नगरांत जन्मलें.  माझा पिता अञ्जन शाक्य, आणि माझी माता सुलक्षणा.  नंतर (वयांत आल्यावर) मी कपिलवस्तूला शुद्धोदनाच्या घरीं गेलें.  (म्हणजे शुद्धोदनाबरोबर माझें लग्न झालें.)'

या गोतमीच्या म्हणण्यांत कितपत तथ्य आहे हें सांगतां येत नाही.  'कपिलवस्तूला शुद्धोदनाच्या घरीं गेलें' हें म्हणणें वर दिलेल्या विवेचनाशीं जुळत नाही.*  पण ज्या अर्थी अञ्जनशाक्याची आणि सुलक्षणेची ही मुलगी होती, ह्या म्हणण्याला बाध येईल असा मजकूर कोठेच सापडला नाही, त्या अर्थी ती व तिची वडील बहीण मायादेवी अञ्जनशाक्याच्या मुली होत्या व त्या दोघींचीही लग्नें शुद्धोदनाबरोबर झालीं, असें म्हणण्यास हरकत नाही.  पण तीं लग्नें एकदम झालीं की कालान्तराने झालीं हें समजण्यास मार्ग नाही.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  कारण भरण्डूच्या कथेवरून शुद्धीदन कपिलवस्तूंत राहत नव्हता असें ठरतें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
बोधिसत्त्व जन्मल्यावर सातव्या दिवशीं मायादेवी परलोकवासी झाली, ही गोष्ट बौद्धवाङ्‌मयांत सुप्रसिद्ध आहे.  त्यानंतर बोधिसत्त्वाची हयगय होऊं लागल्याकारणाने शुद्धोदनाने मायादेवीच्याच धाकट्या बहिणीशीं लग्न केलें असावें हें विशेष संभवनीय दिसतें.  एवढें खरें की, गोतमीने बोधिसत्त्वाचें लालनपालन आईप्रमाणें अत्यंत प्रेमाने केलें.  त्याला खर्‍या आईची कधीच वाण भासली नसावी.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel