याच सुत्तांत नव्हे, तर मज्झिमनिकायांतील उपलिसुत्तासारख्या दुसर्‍या सुत्तांत, आणि विनयपिटकांत अनेक ठिकाणीं हेंच वाक्य आलें आहे.  फरक एवढाच की, येथें हें पोक्खरसाति ब्राह्मणाला उद्देशून आहे आणि तेथे उपालि वगैरे गृहस्थांना उद्देशून आहे.  यावरून विनय-समुत्कर्ष याचा अर्थ असा होतो की, विनय म्हणजे उपदेश आणि त्याचा समुत्कर्ष म्हणजे ही सामुत्कर्षिका धर्मदेशना.  एका काळीं ह्या चार आर्यसत्यांच्या उपदेशाला विनयसमुक्कंस म्हणत असत, यांत शंका राहत नाही.  'धम्मचक्क-पवत्तन-सुत्त' हें नांव अशोकानंतर बर्‍याच काळाने प्रचारांत आलें असावें.  चक्रवर्ती राजाच्या कथा लोकप्रिय झाल्यानंतर बुद्धाच्या ह्या उपदेशाला असें भपकेदान नांव देण्यांत आलें.

'विनयसमुकसे' हेंच धम्मचक्कपवत्तनसुत्त आहे असें गृहीत धरलें, तर भाब्रू शिलालेखांत निर्देशिलेले सात उपदेश बौद्ध वाङ्‌मयांत सापडतात, ते येणेंप्रमाणे ः-

(१)  विनयसमुकसे - धम्मचक्कपवत्तनुसुत्त
(२)  अलियवसानि - अरियवंसा (अंगुत्तर चतुक्कनिपात)
(३)  अनागतभयानि - अनागतभयानि (अंगुत्तर पञ्चकनिपात)
(४)  मुनिगाथा - मुनिसुत्त (सुत्तनिपात)
(५)  मोनेयसुते - नाळकसुत्त (सुत्तनिपात)
(६)  उपतिसपसिने - सारिपुत्तसुत्त (सुत्तनिपात)
(७)  लाघुलोवाद - राहुलोवाद (मज्झिम, सुत्त नं. ६१)

या सातांपैकी धम्मचंक्कपवत्तन जिकडे तिकडे सापडतें.  तेव्हा त्याचें महत्त्व विशेष आहे हें सांगावयालाच नको; आणि त्याप्रमाणे तें अशोकाने अग्रभागीं दिलें आहे.  बाकीच्यांपैकी तीन एका लहानशा सुत्तनिपातांत आहेत.  त्यावरून सुत्तनिपाताचें प्राचीनत्व सिद्ध होतें.  त्याच्या शेवटच्या दोन वग्गांवर व खग्गविसाणसुत्तावर निद्देस नांवाची विस्तृत टीका असून तिचा समावेश ह्याच खुद्दकनिकायांस करण्यांत आला आहे.  सुत्तनिपाताचे हे भाग निद्देसापूर्वी एकदोन शतकें तरी अस्तित्वांत होते असें समजलें पाहिजे, आणि त्यावरुन देखील सुत्तनिपाताचें प्राचीनत्व सिद्ध होतें.  त्यांत सर्वच सुत्तें अतिप्राचीन असतील असें नव्हे.  तथापि त्यांतील बहुतेक सुत्तें निःसंशय फार जुनीं आहेत.  प्रस्तुंत ग्रंथांत बुद्धचरित्रासंबंधाने किंवा बुद्धाच्या उपदेशासंबंधाने जी चर्चा करण्यांत आली आहे ती अशाच प्राचीन सुत्तांच्या आधाराने.

आता आपण खास बुद्धचरित्राकडे वळूं.  त्रिपिटकांत एकाच ठिकाणीं सबंध बुद्धचरित्र नाही.  तें जातकठ्ठकथेच्या निदानकथेंत सापडतें.  ही अट्ठकथा बुद्धघोषाच्या समकालीं म्हणजे पांचव्या शतकांत लिहिली असली पाहिजे.  त्याच्यापूर्वी ज्या सिंहली अट्टकथा होत्या त्यांतील बराच मजकूर ह्या अट्टकथेंत आला आहे.  हें बुद्धचरित्र मुख्यत्वें ललितविस्तराच्या आधारें लिहिलें आहे.  ललितविस्तर इसवीसनाच्या पहिल्या शतकांत किंवा त्यापूर्वी कांही वर्षे लिहिला असावा.  तो महायानाचा ग्रंथ आहे; आणि त्यावरूनच जातकट्ठकथाकाराने आपली बुद्धचरित्राची कथा रचली आहे.  ललितविस्तर देखील दीघनिकायांतील महापदानसुत्ताच्या आधारें रचला आहे.  त्या सुत्तांत विपस्सी बुद्धाचें चरित्र फार विस्तारानें दिलें आहे; आणि त्या चरित्रावरून ललितविस्तरकाराने आपलें पुराण रचलें.  अशा रीतीने गौतम बुद्धाच्या चरित्रांत भलत्याच गोष्टी शिरल्या.

महापदानसुत्तांतील कांही भाग निराळे काढून ते गोतमबुद्धाच्या चरित्राला सुत्तपिटकांतच लागू केलेले दिसून येतात.  उदाहरणार्थ, तीन प्रासादांची गोष्ट घ्या.  विपस्सी राजकुमाराला राहण्यासाठी तीन राजवाडे होते,  ह्या कथेवरून गोतमबुद्धाला राहण्यासाठी तसेच प्रासाद असले पाहिजेत, अशी कल्पना करून गोतमबुद्धाच्या तोंडींच असा मजकूर घातला आहे की, त्याला राहण्याला तीन प्रासाद होते; आणि तो त्या प्रासादांत अत्यंत चैनीने रहात असे.  ह्या कथेची असंभवनीयता मी दाखवून दिलीच आहे (पृष्ठ १०४).  परंतु ती कथा अंगुत्तरनिकायांत आली आहे, आणि त्याच निकायांत अशोकाच्या भाब्रू शिलालेखांतील दोन सुत्तें येतात.  तेव्हा मला ती कथा एके काळीं ऐतिहासिक भासली.  पण विचारान्तीं असें दिसून आलें की, ह्या अंगुत्तरनिकायांत पुष्कळ भाग मागाहून घातले आहेत.  तीन वस्तूसंबंधाने ज्या गोष्टी असतील त्यांचा तिकनिपातांत संग्रह केला.  त्यांत अर्वाचीनतेचा आणि प्राचीनतेचा विचार करण्यांत आलेला दिसत नाही.*
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
*  महापदान सुत्तांतील विपस्सी बुद्धाच्या दन्तकथा गोतमबुद्धाच्या चरित्रांत खण्डशः कशा शिरल्या व त्यांपैकी सुत्तपिटकांत कोणत्या सापडतात, हें दुसर्‍या खंडाच्या शेवटीं पहिल्या परिशिष्टांत पाहावें.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel