मुसलमानांनी सिंध आणि पंजाब देशाचा कांही भाग ताब्यांत घेतल्यानंतर शंभर वर्षांनी शंकराचार्य उदयाला आले.  त्यांच्या वेदान्ताचा सर्व रोख म्हटला म्हणजे शूद्रांनी वेदाध्ययन करतां कामा नये हा !  जर शूद्रांनी वेदवाक्य ऐकलें, तर त्याचे कान शिशाने किंवा लाखेने भरावे; वेदवाक्य उच्चारलें तर त्याची जीभ कापावी; आणि वेदमंत्र धारण केला तर त्याला ठार मारावें. हा त्यांचा वेदान्त !  मुसलमान जेत्यांपासून तरी हे आमचे सनातनी धडा शिकले काय ?  बुद्ध तर त्यांचा शत्रूच, त्याच्यापासून शिकण्यासारखें होतें काय ?

रजपूत लोक चांगले सनातनी.  ते अहिंसेला निखालस मानीत नसत.  प्रसंग पडेल, तेव्हा आपसांत यथेच्छ लढाया करीत.  हिंसेच्या ह्या शूर भक्तांना महमूद गझनीने घोड्याच्या पायाखालच्या धुळीसारखें उद्ध्वस्त कसें केलें ?  ते बुद्धाची अहिंसा मानीत होते म्हणून की काय ?

आमची पेशवाई तर खास ब्राह्मणांच्याच हातीं होती.  शेवटला बाजीराव कर्मठपणाबद्दल प्रसिद्ध आहे.  हिंसेची तर पेशवाईंत परमावधि झाली.  इतरांशीं लढाया तर राहूंच द्या, पण घरच्या घरींच एकदा दौलतराव शिंद्याने पुणें लुटलें, तर दुसर्‍यांदा यशवंतराव होळकराने लुटलें !  अशा या निस्सीम हिंसाभक्तांचें साम्राज्य सर्व हिंदुस्थानावर व्हावयास नको होतें काय ?  त्यांना त्यांच्यापेक्षा शतपटीने अहिंसक असलेल्या इंग्रजांना शरण कां जावें लागलें ?  एकामागून एक मराठे सरदार इंग्रजांचे अंकित कां झाले ?  ते बुद्धाचा उपदेश मानीत होते म्हणून काय ?

जपान आजला हजार बाराशें वर्षे बौद्धधर्मी आहे.  १८५३ सालीं त्यांच्यावर कमोडोर पेरीने तोफा रोखल्याबरोबर त्यांची जागृती होऊन एकी कशी झाली ?  बौद्धधर्माने त्यांना नेभळट कां बनविलें नाही ?

या प्रश्नांचीं उत्तरें लब्धप्रतिष्ठित टीकाकारांनी अवश्य द्यावींत.  'मिरविसि सुज्ञत्व वृथा अन्याला स्वकृत ताप लावूनि,' हें आर्यार्ध मोरोपंताने जणू काय ह्या लब्धप्रतिष्ठित लोकांना उद्देशूनच लिहिलें असावें !  यांनी आणि यांच्या पूर्वजांनी जीं पापें केलीं, त्यांचें सर्व खापर बुद्धावर फोडून हे खुशाल सोवळेपणाचा शहाणपणा मिरवीत फिरत आहेत !

(३)  बुद्धाच्या संबोधिज्ञानानंतर त्याच्या चरित्राचा कालक्रमपूर्वक आराखडा कां देण्यांत आला नाही ?

उत्तर - सध्या उपलब्ध असलेल्या प्राचीन वाङ्‌मयाच्या आधारें तसा आराखडा तयार करतां येणें शक्य नाही.  बुद्धाचे उपदेश कालक्रमपूर्वक दिलेले नाहीत.  इतकेंच नव्हे, तर जे उपदेश आहेत त्यांत पुष्कळ भर पडलेली आहे.  त्यांतून सत्य शोधून काढणें बरेंच अवघड जातें.  तो प्रयत्‍न मी या ग्रंथांत केलाच आहे.  पण कालक्रमानुसार बुद्धचरित्राचा आराखडा तयार करणें शक्य झालें नाही.

(४)  'वैदिक संस्कृति' आर्यांचें भरतखंडांत आगमन झाल्यानंतर उपस्थित झाली; त्यापूर्वी 'दासांची' म्हणजे ब्राह्मणांची संस्कृति होती; याला आधार कोणते ?

उत्तर - याचा विचार मी 'हिंदी संस्कृति आणि अहिंसा' या ग्रंथाच्या पहिल्या प्रकरणांत केला आहे.  तो ग्रंथ या पुस्तकाबरोबर वाचल्यास पुष्कळ गोष्टींचा नीट खुलासा होईल.  माझें म्हणणें सर्व लोकांनी स्वीकारावें असा मुळीच आग्रह नाही.  तें विचारणीय वाटल्यामुळे वाचकांसमोर मांडलें आहे.  ह्या दासांच्या आणि आर्यांच्या संस्कृतीचा बुद्धाच्या चरित्राशीं फार थोडा संबंध येतो.  त्या दोन्ही संस्कृतींच्या संघर्षाने उत्पन्न झालेली वैदिक संस्कृति बुद्धाच्या वेळी प्रतिष्ठित होऊन बसली होती, एवढें दाखविण्यासाठी पहिलें प्रकरण या ग्रंथांत घातलें आहे.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel