ना ओळखीचा, ना प्रेमाचा
मी रहिमतपूर स्टेशनवर उतरलो. अगदी सकाळची वेळ होती. औंध गाव स्टेशनपासून सात कोस होता. दापोलीस असताना सहा कोस चालून माझ्या पालगडला मी शनिवार रविवारी जात असे. चालण्याची मला सवय होती; परंतु माझ्याबरोबर सामान होते. पुस्तकांनी व वहयांनी भरलेली ट्रंक होती, वळकटी होती, करंडी होती. एवढे सामान घेऊन मी थोडाच चालत गेलो असतो!
त्या वेळेस मोटारींचा, लॉ-यांचा फारसा सुळसुळाट झाला नव्हता. टपालसाठी औंध सरकारने घोडयाची व्हिक्टोरिया ठेवलेली होती. ती रोज येत असे, जात असे. वाटेत घोडे बदलीत असावेत, असे आठवते. स्टेशनवर टांगेही फारसे नव्हते, बैलगाडया होत्या शेवटी मी एक बैलगाडी ठरवली. गाडीत सामान ठेवले. बैलगाडी निघाली.
माझ्या मनात कितीतरी विचार येत होते. औंधला माझे कसे काय जमेल, ह्याची चिंता राहून राहून मनाला कष्टी करीत होती. माझ्या घरच्या सर्व मंडळींची आठवण येऊन डोळे भरुन येत होते. गाडीवानाने मध्येच गाडी थांबवून निंबाचे दातण तोडून घेतले. तो प्रकार मला अपरिचित होता. राखुंडीने दात घासण्याचा एकच प्रकार मला कोकणात माहित होता.
मी त्या गाडीवानास विचारले, ''हे काय करता तुम्ही?''
तो म्हणाला, ''दातण करीत आहे. निंबाची काडी, बाभळीची काडी, आंब्याची काडी, तरवडाची काडी, कसलीही चालते. सगळयांत बाभळीचं दातण उत्तम. निंबाच्या दातणने दात स्वच्छ होतातच, शिवाय घसाही स्वच्छ राहातो.''
मी म्हटले, ''कडू नाही का लागत?''
तो म्हणाला, ''आम्हांला सवय आहे. इकडे खेडयापाडयात तुम्हांला हा प्रकार सर्वत्र आढळेल.''
मी म्हटले, ''आमच्या कोकणात ही झाडं होतच नाहीत. समुद्राची हवा ह्या झाडांना मानवत नसेल. गुढीपाडव्याच्या दिवशी निंबाची चार पानं दुरुन आणावी लागतात. एखादयाच्या बागेत मुद्दाम ते झाड लावलेलं असतं. दुरून ते फार वाढत नाही. इकडे कसे त्याचे प्रचंड वृक्ष झाले आहेत!''
तो गाडीवान म्हणाला, ''तुम्ही कोकणात राहाता वाटंत? इकडे कुठे जाता!''
मी म्हटले, ''औंधला शिकायला जात आहे.''
गाडीवानाने विचारले, ''तुमचं गाव कुठं आहे?''
मी सांगितले, ''खेड.... चिपळूणच्या बाजूस, चिपळूणपासून बारा कोस आहे.''
गाडीवान म्हणाला, ''साता-याहून चिपळूणला माल घेऊन शेकडो गाडया जातात, तुम्ही मुंबईहून आला वाटतं?''
मी म्हटले, ''हो.''
गाडीवानाने विचारले, ''औंधला तुमचा सगासोयरा असेल?''
मी म्हटले, ''माझ्याच बरोबरीचा एक मित्र आहे. त्याच्या आधाराने जातोय.''
गाडीवान म्हणाला, ''तुमचे आईबाप तुम्हांला इतकं लांब कसं पाठवतात? तुम्ही बामणांनीच राजांनो विद्या करावी.''
मी म्हटले, ''जरुर पडली, म्हणजे सर्वांना सर्व काही करता येंत.''
गाडीवानाने विचारले, ''तुम्हांला देऊ का दातण काढून?''
मी म्हटले, ''दे''