राम म्हणाला, ''श्याम, कुठलं काढलंस हे सारं? हे बंद कर. तुझी गोष्ट तू सांग. असल्या चर्चा नकोत गडया.''
''खरंच! मरणाचे विचार कधीही काढून नयेत!'' रघुनाथ म्हणाला.
मी म्हणालो,''बरं तर''
मी तळयातून जिवंत बाहेर आलो. स्नाने झाली, कपडे धुऊन झाले. मी व माझा मित्र घरी जायला निघालो. आम्हीही कपडे वगैरे वाळत घातले. नंतर मी बसलो. शाळेत नाव दाखल करायचे होते. दाखला, वगैरे काढून पाहिला. दापोलीच्या शाळेतील शिक्षकांनी शेरा चांगला दिला होता. मी माझ्या खिशात तो दाखला ठेवून दिला. पाकिटात पैसे वगैरे आहेत की नाही, ते पाहू लागलो. पाकीट उघडले. परंतु पाकिटातील एक दहा रुपयांची नोट नाहीशी झालेली! मी कोटाच्या खिशांत पुन्हा पुन्हा पाहिले. त्या पाकिटात सात-सातदा पाहिले. त्या पाकिटात पाचची एक नोट होती. दहाची नोटी गेली! त्या पाकिटात आणखी एक नोट होती. ती अमोल होती! तिची किंमत कोणालाही करता आली नसती. ती नोट कोठेही जगाच्या बाजारात वटवता आली नसती! ती कसली होती नोट?
ते रामचे पत्र होते. दापोली सोडताना रामने जी दोन ओळींची चिठ्ठी मला दिली होती, ती होती ती. ती सुरक्षित होती. ती माझी जीवनदायी नोट कोणी नेली नव्हती. मी ते लहान पत्रच कितीदा वाचीत बसलो. दहा रुपयांची नोट हरवली, ते विसरुन गेलो. ते रामचे पत्र मी पुन्हा-पुन्हा हृदयाशी धरीत होतो. पुण्यास रामला माझी आठवण येत असेल का? माझी जुनी पत्रे त्याने ठेवली असतील का? की त्याने फाडून टाकली असतील? अमोल माणिक मोत्यांप्रमाणे ती पत्रे त्याला वाटत असतील का? ती माझी पत्रे अशी प्रेमाने हृदयाशी धरुन त्यांवर अश्रूंचा अभिषेक करीत असेल का? राम काहीही करो. मी क्षणभर सारे विसरलो परंतु पुन्हा स्वर्गातून पृथ्वीवर आलो. दहा रुपये हरवले? दहा रुपये मला हजारांच्या बरोबर होते. विचारायचे कोणाला? कोणावर आळ घेणार? कोणावर आरोप घेणार? आपलीच चूक. मी कोटाच्या खिशात पाकीट ठेवून, तसाच गेलो का? ते पाकीट ट्रंकेत कुलूप लावून का ठेवले नाही? नाही तर अंगात कोट घालून, मी तळयावर का गेलो नाही?
खोलीत दोघे - तिघे इतर विद्यार्थी होते. माझी कावरीबावरी चर्या त्यांनी पाहिली. मी काही तरी हरवलेले शोधीत आहे, हे त्यांच्या ध्यानात आले.
''काय शोधता हो?'' एकाने विचारले
''पैसे वगैरे नाही ना हरवले?'' दुस-याने प्रश्न विचारला.
''जगात पैशांशिवाय दुसरं काय हरवायचं आहे? सर्वत्र पैशाची वाण आहे. पैसा म्हणजे विष आहे!'' तिसरा म्हणाला.
''खरंच का हो पैसे गेले?'' पहिला म्हणाला.
''हो!''मी उत्तर दिले.
''किती? दुस-याने विचारले.
''दहाची नोट गेली, पाचाची राहिली,'' मी म्हणालो.
''सारे नाही गेले. दयाळू दिसतो चोर!'' तिसरा म्हणाला.
''केव्हा होते?''पहिल्याने विचारले.
''ते मला आठवत नाही,'' मी म्हटले.
''का टोपी आणली, तेव्हा होते ना? दुस-याने विचारले.